Mazgaon Tadwadi BIT Chawl : माझगाव ताडवाडीचा पुनर्विकास होणार नव्याने

भाडेकरुंचे स्वप्न प्रत्यक्षात साकाराला येणार

3038
Mazgaon Tadwadi BIT Chawl : माझगाव ताडवाडीचा पुनर्विकास होणार नव्याने

माझगाव येथील बहुचर्चित आणि बहु प्रतीक्षेत असलेला तथा रखडलेल्या ताडवाडी येथील बीआयटी चाळींचा आता पुनर्विकास केला जाणार आहे. यापूर्वी नेमलेल्या विकासकाला हटवण्यात आल्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने निविदा पध्दतीने विकासकाची नेमणूक केली आहे. त्यामुळे ताडवाडीच्या पुनर्विकासासाठी आता वायएम अँड मॅकवाइज रियल्टी एलएलपी या विकासकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे हा पुनर्विकास प्रकल्प पुढील सात वर्षांत पूर्ण केला जाणार असून सुधार समिती आणि महापालिकेच्या मंजुरीने हा प्रस्ताव दोन महिन्यापूर्वीच शासनाच्या पुढील मंजुरीसाठी पाठवण्यात आला. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने ताडवाडीतील भाडेकरुंचे स्वप्न साकाराला येणार आहे. (Mazgaon Tadwadi BIT Chawl)

यापूर्वी ग्रेस अँड रबरवाला सिटी डेव्हलपर्सची निवड…

ताडवाडी येथील बीआयटी चाळ (BIT Chawl) क्रमांक १ ते १६ तसेच ए, बी, सी ब्लॉक आणि समाजकल्याण केंद्र, दुकाने, महापालिका चौकी, व्यायाम शाळा, धार्मिक बांधकामे, झोपडपट्टी आदी महापालिकेच्या मालमत्तांचा पुनर्विकास करण्यासाठी मे २००८मध्ये माझगाव ताडवाडी सहकारी गृहनिर्माण संस्थेने नियुक्त केलेल्या मेसर्स ग्रेस अँड रबरवाला सिटी डेव्हलपर्स यांच्या निवडीला सुधार समितीसह महापालिकेने मान्यता दिली होती. हा पुनर्विकास प्रकल्प ३ वर्षांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. (Mazgaon Tadwadi BIT Chawl)

२२० भाडेकरुंना पाठवले होते माहुल येथील महापालिकेच्या संक्रमण शिबिरात…

रेल्वे, अग्निशमन दल, वन व पर्यावरण विभागाची मान्यता विकासकाने प्राप्त केल्यानंतर महापालिकेच्या इमारत व प्रस्ताव विभागाने ऑगस्ट २००९मध्ये आयओडी दिली. त्यानंतर या विकासकाने १३ इमारतींपैंकी मोडकळीस आलेल्या बीआयटी चाळ क्रमांक १३, १४, १५ व १६ या चार इमारती पाडून त्या भागावर तळ अधिक ४ मजल्यांच्या तीन संक्रमण शिबिराच्या इमारती बांधल्या आणि त्यात १८० कुटुंबांचे पुनर्वसन केले. तसेच चारही इमारतींमधील उर्वरीत २२० भाडेकरुंना माहुल येथील महापालिकेच्या संक्रमण शिबिरात स्थलांतरीत केले. परंतु त्यानंतर विकासकाने कामाला विलंब केल्याने सन २०१२मध्ये विकासकाविरोधात न्यायलायात याचिका दाखल केली. (Mazgaon Tadwadi BIT Chawl)

(हेही वाचा – CAA : राजस्थान सरकार नरमले; मागे घेतली सीएए विरोधातील याचिका)

न्यायालयाचे निर्देश

प्रत्यक्षात पुनर्विकासाला विलंब होत असल्याने महापालिकेच्या मालमत्ता विभागानेही प्रशासकीय मान्यता घेऊन मे २०१८मध्ये संबंधित विकासकाला निलंबित करण्याची नोटीस बजावली. परंतु त्यानंतर भाडेकरूंच्या संघटनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मे २०२३ रोजी आदेश दिनांकापासून ४ महिन्यांच्या कालावधीत निविदा मागवून नवीन विकासकाची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले होते. (Mazgaon Tadwadi BIT Chawl)

त्यानुसार महापालिकेने निविदा मागवून नवीन विकासकाची नियुक्ती करण्याची प्रक्रिया राबवली, यामध्ये वाय एम अँड मॅकवाईझ एलएलपी ही कंपनी पात्र ठरली आहे. यासाठी विकासकाच्या माध्यमातून महापालिकेला अधिमुल्यापोटी अर्थात प्रिमियम म्हणून १०६ कोटी ७८ लाख रुपये भरले जाणार आहे. (Mazgaon Tadwadi BIT Chawl)

(हेही वाचा – Billiards Hall of Fame : पंकज अडवाणीचा बिलियर्ड्सच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश)

निवासस्थानाचे भाडे विकासक हे महापालिकेकडे जमा करेल

महापालिकेच्या सर्व भाडेकरु, सेवा निवासस्थान, झोपडपट्टी तसेच या पुनर्विकासातील इतर पात्र घटकांना देय असलेली भाडे रक्कम ही या प्रकल्पाच्या भोगवटा प्रमाणपत्रासह पुनर्वसन होईपर्यंत दिली जाईल तसेच सेवा निवासस्थानाचे भाडे विकासक हे महापालिकेकडे जमा करेल असे नमुद केले आहे. (Mazgaon Tadwadi BIT Chawl)

विकासकाच्या निवडीवर बचाव समितीचा आक्षेप

महापालिकेने ताडवाडीच्या पुनर्विकासाबाबत निविदा काढून विकासकाची नेमणूक केल्याने याला माझगाव ताडवाडी  बीआयटी चाळ निवासी वसाहत बचाव कृती समितीने विरोध केला आहे. ही निविदा प्रक्रियाच चुकीच्या पध्दतीने काढली असून यातील निविदा अटी या केवळ मर्जीतील विकासकालाच नेमण्याच्या दृष्टीकोनातून टाकल्या होत्या. त्यामुळे या निविदा प्रक्रियेलाच आमचा विरोध होता. परंतु या विकासकांची निवड करताना रहिवाशांना विश्वासात घेतले जावे तसेच कॉर्पस फंड हा पाच लाख रुपये मिळावा तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली हा प्रकल्प व्हावा अशीच आमची मागणी असून याबाबत महापालिकेला वारंवार निवेदन देऊनही त्यांच्याकडून दखल घेतली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केला. ज्या कंपनीची निवड केली आहे त्या कंपनीची स्थापनाच ऑगस्ट २०२३मधील आहे, तर मग निविदेतील दहा वर्षांचा अनुभव असलेल्या अटीत ही कंपनी कुठे बसते असा सवाल समितीचे अध्यक्ष कैलाश बद्रिके यांनी केले आहे. गाळे खाली करून देण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याने भविष्यात ते रहिवाशांना बाहेर काढू शकतात अशी भीती त्यांनी व्यक्त केली. (Mazgaon Tadwadi BIT Chawl)

नवा विकासक काय देणार
  • प्रति सदनिका किमान चटई क्षेत्रफळ ५९. ०६ चौरस मीटर.
  • दोन महापालिका दवाखान्यांसाठी २१८.११ एवढे बांधीव क्षेत्र.
  • अभ्यासिकेसाठी ३ सदनिका.
  • दोन समाज कल्याण केंद्रासाठी १०५ चौरस मीटर एवढे बांधीव क्षेत्र.
  • दोन व्यायामशाळांसाठी ४१२.५० चौरस मीटर एवढे बांधीव क्षेत्र.
  • मनोरंजन मैदानासाठी विकसित केलेले ७३८ चौरस मीटरचे क्षेत्रफळ.
  • खेळाच्या मैदानासाठी विकसित केलेला १०१७ चौरस मीटरचे क्षेत्रफळ. (Mazgaon Tadwadi BIT Chawl)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.