Marathi : मराठी महिला उद्योजकाला गुजराती वस्तीत घर नाकारले, पितापुत्रविरुद्ध गुन्हा दाखल

68
पूर्व उपनगरातील एका मराठी (Marathi) महिला उद्योजिकेला कार्यालयासाठी जागा नाकारणाऱ्या गुजराती पिता पुत्राविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. मुलुंड पश्चिम येथे घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पडले असून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर या गुजराती पितापुत्राविरोधात मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहे.
प्रविनचंद रतनसिंग तन्ना (८०) आणि निलेश प्रविनसिंग तन्ना (५०) असे अटक करण्यात आलेल्या गुजराती भाषिक पितापुत्राचे नाव असून या दोघांना जामिनावर सोडण्यात आले आहे. मुलुंड पूर्व भोईर नगर येथे राहणाऱ्या तृप्ती देवरुखकर या महिला उद्योजक असून पती पत्नी दोघे डिजिटल मार्केटिंगचा त्या व्यवसाय करतात. त्यांना त्यांचे कार्यालय दुसरीकडे हलवायचे असल्यामुळे त्या भाडेतत्वावर कार्यालय शोधत असताना मुलुंड पश्चिम डॉ.आर.पी.रोड बीएमसी कॉलनी  येथील शिवसदन सोसायटी तळमजला येथील परेश अनम यांचा फ्लॅट रिकामा असून त्यांना तो भाड्याने द्यायचा असल्याचे कळाले. दरम्यान बुधवारी दुपारी तृप्ती देवरुखकर आणि तिचे पती सागर हे फ्लॅट बघण्यासाठी मुलुंड पश्चिम येथे गेले होते, परेश यांच्या घराची चावी तळमजल्यावरील एका टेलर(शिंपी) यांच्याकडे ठेवण्यात आल्याचे त्याना सांगण्यात आले. देवरुखकर दाम्पत्यांनी चावी घेऊन फ्लॅट बघितला आणि पुन्हा चावी टेलरकडे देण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी शिवसदन सोसायटीचे ८० वर्षाचे सेक्रेटरी प्रविनचंद तन्नाहे आले व त्यांनी टेलरला गुजराती भाषेत ओरडले.
तृप्ती देवरुखकर यांनी प्रविनचंद तन्ना यांना काय झाले म्हणून विचारले  असता “हमारे यहा महाराष्ट्रीयन लोगो को जगह नही देते” असे म्हणाला देवरुखकर दाम्पत्यानी हा सोसायटीचा नियम आहे का  असे विचारले असता त्याने उद्धटपणे” हा हमारे सोसायटी का रुल है, असे उत्तर दिले. तृप्ती देवरुखकर यांनी तन्नाकडे लेखी दाखवा असा सवाल केला असता  प्रविनचंद तन्ना याने नही दिखाता जा, क्या करने का कर लो, जिधर जाना है जा, पुलीस मे कम्प्लेट करो असे बोलून देवरुखकर दाम्पत्यासोबत वाद घालू लागला, त्यावेळी त्याचा मुलगा निलेश तन्ना त्या ठिकाणी आला व दादागिरीची भाषा करून देवरुखकर दाम्पत्यांना धक्काबुक्की करू लागले.
हा सर्व प्रकार तृप्ती देवरुखकर यांनी मोबाईल कॅमेरात टिपून तेथून निघून गेल्या व त्यांनी व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून मराठी माणसाला महाराष्ट्रात नाकारले जात असल्याचे पोस्ट टाकून व्हिडीओ व्हायरल केला. दरम्यान स्थानिक मनसे पदाधिकारी सत्यवान दळवी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह देवरुखकर दाम्पत्यांना संपर्क साधुन सायंकाळी शिवसदन सोसायटीत आले व तन्ना पितापुत्रांना याचा जाब विचारून त्यांना माफी मागायला लावली. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होताच त्याच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमठु लागल्या व अखेर या घटनेची दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेत या प्रकरणाची चौकशी करण्याची करण्याची मागणी केली.
अखेर या व्हिडीओची आणि प्रकरणाची दखल मुलुंड पोलिसांनी घेतली असून तुप्ती देवरुखकर यांची गुरुवारी तक्रार दाखल करून तन्ना पितापुत्रावर मारहाण करणे, धमकी देणे,चुकीचा प्रतिबंध करणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून पितापुत्राला अटक करण्यात आली. दोघांविरुद्ध लावलेले कलम हे जामीनपात्र  असल्यामुळे त्यांना पोलीस ठाण्यात जामीन देण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.