10वी व 12वीच्या परीक्षांबाबत राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय, 2023 च्या परीक्षा ‘या’ पद्धतीने होणार

116

10वी आणि 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. 10 वी आणि 12वी च्या परीक्षा या जुन्याच पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आला आहे. कोविड काळात विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सवलती रद्द करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाकडून घेण्यात आला असून, 2023 ची बोर्डाची परीक्षा ही 100 टक्के अभ्यासक्रमावर होणार असल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

मार्च 2020 पासून आलेल्या कोरोना संकटामुळे 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा पद्धतीत राज्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने थोडे बदल करुन विद्यार्थ्यांना काही सवलती दिल्या होत्या. या सर्व सवलती रद्द करुन संपूर्णपणे 100 टक्के अभ्यासक्रमावर 2023 च्या बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

(हेही वाचाः दरमहा 210 गुंतवून 5 हजार रुपये देणा-या सरकारी पेन्शन योजनेत सरकारने केला मोठा बदल, नक्की जाणून घ्या)

‘या’ सवलती रद्द होणार

कोरोना काळात ऑनलाईन शाळा सुरू असल्याने तसेच शाळेपासून दूर राहणा-या विद्यार्थ्यांना परीक्षा काळात अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाने 2022 च्या बोर्डाच्या परीक्षा शाळा तिथे परीक्षा केंद्र तसेच परीक्षेसाठी वाढीव वेळ, अभ्यासक्रमात कपात अशा सवलती 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना दिल्या होत्या. या सर्व सवलती रद्द करुन, पूर्वीच्याच पद्धतीने फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये बोर्डाच्या परीक्षा घेण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.