-
कल्याण : प्रतिनिधी
सध्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) क्षेत्रात पावसाळ्याच्या काळात झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी परिसरात या पावसाळ्यात जवळपास १५ झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या दुर्घटनांमध्ये काही वाहनांचे तसेच इमारतींच्या संरक्षक भिंतीचे नुकसान झाले आहे. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Hindusthan Post Impact)
या घटनांचे सविस्तर वृत्त हिंदुस्थान पोस्टने ‘डोंबिवलीमध्ये झाडे कोसळण्याचे सत्र सुरूच : शाळेच्या संरक्षक भिंतीवर कोसळले भलेमोठे झाड’ या मथळ्याखाली सोमवारी ३ ऑगस्ट रोजी सचित्र वृत्त प्रसारित केले होते. या वृत्ताची केडीएमसीच्या उद्यान विभागाने तातडीने दखल घेतली आहे. मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव (Sanjay Jadhav) यांच्या मार्गदर्शनाखाली एक तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये डॉ. श्रेया भानप, उमेश मुंडल्ये, रूपाली शाईवाले, अविनाश पाटील आणि महेश देशपांडे यांचा समावेश आहे. समितीच्या सदस्यांनी कोसळलेल्या काही झाडांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे. ही झाडे नेमकी कोणत्या कारणांमुळे कोसळली, मातीची धूप, मुळांची कमजोरी की इतर काही कारण आहे याचा अभ्यास करण्यात येत आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतील, धोकादायक झाडांची ओळख, छाटणी आणि निगा याबत सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार आहे. हा अहवाल तज्ज्ञ समिती थेट केडीएमसी आयुक्तांना सादर करणार असून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुढील उपाययोजना आणि अंमलबजावणी महापालिका करणार आहे. (Hindusthan Post Impact)
(हेही वाचा – Dombivli मध्ये झाडे कोसळण्याचे सत्र सुरूच; शाळेच्या संरक्षक भिंतीवर कोसळले भलेमोठे झाड)
हिंदुस्थान पोस्टचे रहिवाशांकडून आभार
डोंबिवली एमआयडीसीच्या (Dombivli MIDC) निवासी परिसरातील रहिवासी गेल्या काही दिवसांपासून झाडे कोसळण्याच्या घटनांमुळे भयभीत झाले आहेत. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे वाहनांचे आणि मालमत्तेचे नुकसान होत आहे. आता केडीएमसीने तज्ज्ञ समिती स्थापन करून पाहणी सुरू केल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. उशीरा का होईना पण प्रशासनाने लक्ष दिले आहे. लवकरात लवकर धोकादायक झाडांची छाटणी होऊन अशी दुर्घटना टळावी, अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे. उशीरा का होईना पण केडीएमसीने या विषयावर ठोस पाऊल उचलल्याने रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही समिती आणि त्यांचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. या कार्यवाहीसाठी केडीएमसीचा उद्यान विभाग, तसेच हिंदुस्थान पोस्टचे रहिवाशांकडून आभार मानण्यात येत असल्याचे या भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे (Raju Nalawade) यांनी सांगितले. (Hindusthan Post Impact)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

