पुणे : प्रतिनिधी
सालाबादप्रमाणे यंदाही कानसे (ता. आंबेगाव) गावात श्रीकाळभैरवनाथ महाराजांच्या यात्रा(Kalbhairavnath Maharaj Yatra)महोत्सवानिमित्ताने गुरूवारी १९ ते २६ मार्च दरम्यान हरीभक्तीचा मळा फुलणार आहे. यात्रेच्या निमित्ताने येत्या गुरूवारपासून बुधवारपर्यंत सायंकाळी ७ ते रात्री ९ यावेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रबोधन करणार आहेत. तर स्थानिक तरूणाईच्या कला-गुणांना वाव देण्याकरिता नृत्य स्पर्धा, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसह कुस्त्यांचा जंगी आखाडा हे यात्रा महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे.(Kalbhairavnath Maharaj Yatra)
गुरूवारी १९ मार्च रोजी हभप विश्वंभर महाराज कोल्हे (उमरा/परभणी), शुक्रवारी २० मार्च रोजी हभप गणेश महाराज काळे (आळंदी), शनिवारी २१ मार्च रोजी हभप महादेव महाराज तौर (आळंदी), रविवारी २२ मार्च रोजी हभप वैभव महाराज शिंदे (जवळे), सोमवारी २३ मार्च रोजी हभप प्रभाकर महाराज कराळे (सातगाव पठार), मंगळवारी २४ मार्च रोजी हभप चेतन महाराज माथेफोड (आळंदी), बुधवारी २५ मार्च रोजी हभप कृष्णा महाराज राऊत (बीड), तर गुरूवारी २६ मार्च रोजी सकाळी १० ते १२ दरम्यान हभप किशोर महाराज दिवटे (जालना) यांचे काल्याचे, तसेच रामनवमीचे कीर्तन होणार आहे. अखंड हरीनाम सप्ताहाच्या कालावधीत पहाटे काकडा आरती/भजन, सकाळी नामस्मरण, ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ, रात्री भंडारा (भोजन) आणि हरिजागर अशा आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.(Kalbhairavnath Maharaj Yatra)
यात्रेच्या निमित्ताने गावाला नवी झळाळी प्राप्त झाली आहे. डोळ्यांचे पारणे फिटेल अशा विद्युत रोषणाईसह भैरवनाथ मंदिराची सजावट करण्यात आली आहे. सप्ताहादरम्यान अनेक दानशूरांतर्फे बासुंदी-पुरी, मसालेवडी-भाकरी, आमरस-पुरी, श्रीखंड-पुरी सारख्या मराठमोळ्या स्वादिष्ट पक्वान्नांचे अन्नदान करण्यात येणार आहे. गुरूवारी दुर्गाष्टमीला ग्रामदैवत काळभैरवनाथांच्या यात्रेनिमित्ताने हारतुरे, कालाप्रसाद, कीर्तन, भजन, झेंडा-काठी नाचवत निघणारी दंडवते, रात्री भैरवनाथांची पालखी, तसेच श्रीकाळभैरवनाथ धर्मदाय संस्था, ग्रामविकास मंडळ आणि श्रीकाळभैरवनाथ ट्रस्ट यांच्या सौजन्याने रात्री ११ वाजता लक्ष्मी प्रॉडक्शन निर्मित “एकापेक्षा एक अप्सरा” हा मनोरंजनाचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.(Kalbhairavnath Maharaj Yatra)
(हेही वाचा – Crime : शिक्षण क्षेत्रात खळबळ! १५३० बोगस शिक्षक, कर्मचाऱ्यांचे रॅकेट उद्ध्वस्त; १५० कोटींचा घोटाळा )
कुस्त्यांच्या दंगलीत पारितोषिकांची लयलूट
शुक्रवारी २७ मार्च दरम्यान दुपारी ३ वाजल्यापासून देवाच्या आखाड्यात कुस्त्यांची जंगी दंगल होणार आहे. महाराष्ट्रातील नामवंत मल्ल या आखाड्यात उतरणार आहेत. विजयी मल्लांना रोख रकमांसह आकर्षक पारितोषिकांद्वारे गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी कुस्ती शौकिनांनी आपापल्या परीने रोख रकमेसह पारितोषिके (ट्रॉफी) जाहीर केली आहेत. या पारितोषिकांची लयलूट करण्यासाठी मल्लांची पावले कानसे गावाकडे वळणार आहेत.(Kalbhairavnath Maharaj Yatra)
तरूणाईसाठी धमाल नजराणा
गाव आणि वाड्या-वस्त्यांतील छोट्या-मोठ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या हेतूने नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी २७ मार्च रोजी रात्री ८ वाजता १५ वर्षांखालील लहान आणि १५ वर्षांवरील मोठ्या गटात ही स्पर्धा होणार आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेसह आकर्षक पारितोषिकांनी सन्मानित करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.(Kalbhairavnath Maharaj Yatra)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

