Oxytocin injectionचा बेकायदेशीर वापर, शासनाकडून बंदी तरीही छुप्या मार्गाचा अवलंब

76
Oxytocin injectionचा बेकायदेशीर वापर, शासनाकडून बंदी तरीही छुप्या मार्गाचा अवलंब
Oxytocin injectionचा बेकायदेशीर वापर, शासनाकडून बंदी तरीही छुप्या मार्गाचा अवलंब

Oxytocin injection जनावरांच्या दुधाला असलेली मोठी मागणी लक्षात घेऊन दुभत्या जनावरांकडून हवे तेव्हा व हवे तेवढे दूध काढून घेण्यासाठी बंदी घातलेल्या ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा पाचोडसह पैठण तालुक्यात (Paithan Taluka) सर्रास वापर सुरू असून, किराणा दुकानांतदेखील ही बेकायदा इंजेक्शने सहज उपलब्ध होत आहेत. विशेष म्हणजे या इंजेक्शनच्या वापरामुळे मिळणारे दूध जनावरांसाठीच नव्हे, तर माणसांसाठीदेखील घातक ठरत आहे.

‘ऑक्सिटोसिन’ या इंजेक्शनवर राज्यात आठ-दहा वर्षांपूर्वी बंदी घालण्यात आली असली, तरी दुभत्या जनावरांना कृत्रिमरीत्या पान्हा फोडून अधिक दुधाच्या हव्यासापोटी या इंजेक्शनचा शहरांसह ग्रामीण भागात वापर करण्यात येत आहे. या इंजेक्शनमुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन शासनाने बंदी घातली असली, तरी त्याचे लोण छुप्या मार्गाने ग्रामीण भागात पोहोचले आहे.

हेही वाचा –  Devendra Fadnavis अन् उद्धव ठाकरेंमध्ये मध्यरात्री चर्चा? नाशिकमधून मुख्यमंत्र्यांनी केला मोठा खुलासा!

इंजेक्शनचा बेकायदेशीर वापर…
दुभत्या जनावरांकडून पाहिजे त्या वेळी दूध काढून घेण्यासाठी बेकायदेशीरपणे वापरण्यात येणाऱ्या या इंजेक्शनमुळे सर्वत्र दुभती जनावरे भाकड होताना दिसत आहेत. दूधाची गरज लक्षात घेऊन असंख्य दुग्ध उत्पादकांनी दुभत्या जनावरांकडून मायेचा पान्हा चोरण्यासच सुरुवात केली आहे. या इंजेक्शनमुळे पाहिजे त्यावेळी दूध काढता येते. केवळ ५ मि.ली.चे हे इंजेक्शन किरकोळ दरात सुमारे पाच रुपयांना मिळते, तर ठोक दरात ५०० इंजेक्शनची बाटली सुमारे २५० रुपयांना मिळते.

कृत्रिम वासरांचे भयाण वास्तव…
दुभत्या जनावरांना हे इंजेक्शन टोचताच जनावर पान्हावते व आपल्या वासरांसाठी चोरलेला पान्हा त्यांच्या स्तनात साठवून ठेवता येत नाही. एकंदरीत, या इंजेक्शनमुळे कृत्रिम पान्हा सुटतो. या कृत्रिम पान्हा फोडण्याच्या हव्यासापोटी दुभती जनावरे लवकर भाकड होताना दिसतात. एवढेच नव्हे, तर गाई-म्हशी आपल्या वासरांसाठी दूध चोरून ठेवत नसल्याने असंख्य वासरांचा मृत्यू होत असून, गाई-म्हशींसमोर वासरांच्या कातडीमध्ये भुसा भरून बनवलेली कृत्रिम वासरे ठेवली जात असल्याचे वास्तवही पाहावयास मिळते.

ऑक्सिटोसीन इंजेक्शनचे दुष्परिणाम…
‘राज्यात ऑक्सिटोसिन इंजेक्शनच्या वापरावर पूर्णतः बंदी आहे. हे इंजेक्शन प्रामुख्याने प्रसूतीकळा येण्यासाठी वापरले जाते. मात्र अधिक दुधाच्या लालसेपायी हे इंजेक्शन देऊन काढण्यात येणाऱ्या दुधाच्या सेवनामुळे हार्मोन्सची वाढ होऊन दुष्परिणाम होतात. दुधात इंजेक्शनचा अंश उतरल्याने दूध प्यायल्यानंतर छातीत धडधड होणे, पोटाच्या विकारात वाढ होणे, स्नायू कमकुवत होणे यांसारखे त्रास होऊ शकतात. मुलांमध्ये लठ्ठपणा, तर मुलींमध्ये लवकर वयात येण्यासारखे धोके संभवतात. त्यामुळे ऑक्सिटोसिन इंजेक्शनबाबत आवश्यक ती दक्षता घेणे गरजेचे आहे. यावर नियंत्रण ठेवण्याचे काम अन्न व औषध प्रशासनाचे आहे.’, अशी माहिती पशुधन विकास अधिकारी, डॉ. दत्तात्रय गांधले यांनी दिली.

हेही पाहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.