मुर्शिदाबाद (बंगाल) येथील बेलडांगामध्ये आमदार हुमायू कबीर (Humayun Kabir) यांच्या उपस्थितीत ६ डिसेंबरला बाबरी मशिदीची (Babri Masjid) पायाभरणी करण्यात आली. यासाठी सौदी अरेबियातून (Saudi Arabia) दोन धार्मिक विद्वान उपस्थित होते. यासह बंगाल आणि अन्य राज्यांतून आलेले हजारो मुसलमानही उपस्थित होते. अनेकांनी डोक्यावरून विटा आणल्या. कबीर यांनी गेल्या वर्षीच या संदर्भात घोषणा केली होती. या वेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
(हेही वाचा – SIR controversy: एसआयआर वादानंतर संसदेत मंगळवारी निवडणूक सुधारणांवर चर्चा होणार? केंद्रीय कायदा मंत्री यांनी दिली माहिती)
हुमायूं कबीर यांचा काँग्रेस, भाजपा आणि नंतर तृणमूल काँग्रेस असा राजकीय प्रवास राहिला आहे. तृणमूलने नुकतेच त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. कार्यक्रमासाठी १५० फूट लांब आणि ८० फूट रुंद असा मंच उभारण्यात आला होता. संपूर्ण कार्यक्रमाचा खर्च अनुमाने ६० ते ७० लाख रुपये झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हा सगळा तृणमूल काँग्रेसचा दिखावा आहे. बंगालमध्ये (Bengal) भाजपचे सरकार येणार आहे. बाबरच्या नावाने एकही वीट ठेवली गेली, तर ती भाजप उखडून टाकेल, असा इशारा उत्तरप्रदेशाचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी दिला आहे.
उत्तरप्रदेशातील काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांनी आरोप केला की, हुमायू कबीर हा भाजपाचाच माणूस आहे. त्यांनी वर्ष २०१९ मध्ये भाजपाकडून निवडणूक लढवली होती. ते देशात वैमनस्य पसरवू पहात आहेत. मशीद ही उपासनेसाठी असते. जर तुम्ही (कबीर) इतके धर्मनिष्ठ असाल, तर वर्ष २०१९ मध्ये भाजपकडून निवडणूक का लढवलीत ? भाजपच्या भूमिकांची तुम्हाला तेव्हा जाण नव्हती का ?, असा प्रश्न मसूद यांनी विचारला.
बाबरच्या नावाने मशीद उभारणे, हे राजकीय उद्दिष्ट !
‘इंडो-इस्लामिक सांस्कृतिक फाऊंडेशन’चे सचिव अतहर हुसेन यांनी म्हटले की, मशीद योग्य जागेवर असेल आणि तिचा नकाशा संमत असेल, तर धार्मिक लोक तिथे बांधकाम करू शकतात; मात्र केवळ बाबरच्या नावावर मशीद उभारणे, हे राजकीय उद्दिष्ट आहे. अशाने श्रद्धेची खरी भावना अल्प होते. हुमायू कबीर मशीद (Babri Masjid) उभारू इच्छित असतील, तर नावाच्या संदर्भात आग्रह धरू नये.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

