-
जयेश शत्रुघ्न मेस्त्री
बऱ्याचदा हिंदुत्व आणि हिंदू धर्म हे वेगळे असल्याचं सांगितलं जातं. खरोखर हिंदुत्व आणि हिंदू धर्म वेगळे आहे का? हिंदू धर्म असताना हिंदुत्वाची मांडणी कशासाठी होते? नेमका अर्थ काय आहे? हिंदू धर्माचा आपण विचार करतो तेव्हा त्या धर्मातील उपासना पद्धती आणि परंपरा यांचा समावेश होतो. दुसरीकडे हिंदुत्व ही एक ‘व्यापक परिपूर्ण’ अशी राजकीय संकल्पना आहे. धार्मिक हिंदू हिंदुत्ववादी असेलंच असं नाही आणि हिंदुत्ववादी धार्मिक असेलच असे नाही. धार्मिक हिंदू हा हिंदू धर्माचं किंवा कोणत्या तरी एका उपासना पद्धतीचं आचरण करणारा असतो आणि हिंदुत्वामध्ये धार्मिक माणूसही येऊ शकतो किंवा अगदी हिंदू नास्तिकही येऊ शकतो. हे जरी खरं असलं तरी या दोन्ही संकल्पना परस्परपूरक आहेत. आपण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हिंदुत्व ही केवळ राजकीय संकल्पना नाही. ती ‘व्यापक परिपूर्ण’ अशी राजकीय संकल्पना आहे. त्यात धर्म देखील आला, धार्मिकताही आली. हिंदुत्वाला धार्मिकता मान्य नाही असे नव्हे. हिंदुत्व म्हणजे सगळ्या उपासना पद्धतींचे, संप्रदायाचे, जैन, बौद्ध, शिख किंवा या सर्व गोष्टी न मानणारे सुद्धा – ज्यांचे मूळ हिंदुस्थानाशी संबंधित आहे अशा सर्व लोकांचे एकत्रीकरण.
हा हिंदुस्थान (India) आपला आहे, हिंदुंचा आहे. हिंदुंचे म्हणावे असे एकमेव प्राचीन राष्ट्र हिंदुस्थान आहे आणि इथे आज संवैधानिक राज्य असलं तरी इथलं भावविश्व हिंदू राहिलं पाहिजे, असं मानणारे सुधारणावादी सज्जन म्हणजे हिंदुत्ववादी.
आता कुणी म्हणेल या गोष्टी हिंदू धर्म (Hinduism) म्हणूनही मांडता येतील, त्यासाठी हिंदुत्व अशी वेगळी संकल्पना कशासाठी? ज्यावेळी परकीय आक्रमणे आली, त्यावेळी अगदी चाणक्यांच्या काळापासून अनेक हिंदू राजांनी याविरुद्ध लढा दिला. पुढे जाऊन ख्रिस्ती आणि इस्लामी अशी धार्मिक आक्रमणं आली. ही आक्रमणे केवळ देशाच्या सीमा वाढवण्यासाठी नव्हती तर मूळ संस्कृती नष्ट करुन त्यांची संस्कृती लादण्याचा हा प्रयत्न होता.
(हेही वाचा – Pet Waste : मुंबईत आता पाळीव प्राण्यांची विष्ठाही महापालिका करणार जमा)
सावरकरांनी ‘धर्मांतर हे राष्ट्रांतर’ असे शब्द वापरले आहेत. पहलगाममध्ये (Pahalgam) स्थानिकांनी अतिरेक्यांना ज्याप्रकारे मदत केली, यावरून धर्मांतर हे राष्ट्रांतर या सावरकरांच्या संकल्पनेचा आपल्याला प्रत्यय आला. बरं हा धोका अनेकांनी ओळखला होता. त्याविरुद्ध अनेकांनी लढा देखील दिला. पण त्यात दूरदॄष्टीचा अभाव होता. पण योजनाबद्ध पद्धतीने, व्यापक दृष्टीकोन ठेवून हा लढा महाराष्ट्राच्या भूमीतून उभारला गेला आणि तो लढा उभारला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी. म्हणूनच शिवरायांच्या राज्याचे नाव हिंदवी स्वराज्य होते. स्वराज्य म्हणजे हिंदुंचे स्वतःचे राज्य आणि हे व्यापक राज्य एका महाराजाच्या छत्रछायेखाली असलं पाहिजे म्हणूनच शिवाजी महाराज हे छत्रपती झाले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी (Chhatrapati Sambhaji Maharaj) तडजोड न करता बलिदान का दिलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतशी आपल्याला शिवरायांच्या तत्त्वाचा विसर पडत गेला. पुढे तर छद्म अहिंसेचं युग आलं आणि हिंदूंचा मूळचा लढवय्या बाणा गाडला गेला. यावेळी जातीजातीतील भेद टोकाला गेले होते. कर्मकांड करणाऱ्या सनातनी लोकांना देश स्वातंत्र्यापेक्षा त्यांचं वर्चस्व अबाधित राहणं आवश्यक वाटू लागलं. आपल्या धर्मातला मूळ गाभा हरवला. अशा वेळी आपलं मूळ न सोडता एका व्यापक परिपूर्ण राजकीय विचारांची गरज होती. तेव्हा हिंदुत्व आकाराला येऊ लागले. सावरकर व त्यांच्या काळातील हिंदू पुढाऱ्यांनी या शब्दाचा सर्वाधिक प्रचार केला.
लक्षात घ्या, मिर्झा राजे जयसिंह हे प्रचंड धार्मिक होते, सनातनी होते. पण आपला देश स्वतंत्र व्हावा, या देशातील परकीय मुघल निघून जावेत असं त्यांना वाटत नव्हतं. उलट हिंदुंचं संघटन करणाऱ्या शिवरायांचं राज्य बुडवायला ते आले होते. औरंगजेबाचं जिहादी राज्य वाढवायला आले होते. असे अनेक लोक आजही आपल्यात आहेत. हिंदू माणूस केवळ देव देव करणारा नको, केवळ धार्मिक असून उपयोग नाही. त्याला जगाचं, इतर धर्मांचं, त्यांच्या अत्याचारी प्रवृत्तीचं भान असायला हवं. त्याला राजकीय दृष्टी असायला हवी. स्थानिकांकडून नागपूर दंगल घडल्यानंतरही, बंगालमध्ये हिंदूंवर स्थानिकांनी अत्याचार केल्यानंतरही, पहलगाममध्ये धर्म विचारुन हिंदू पुरुष संपवण्यासाठी हल्ला झाल्यानंतरही अनेक हिंदू गंगा-जमना तहजीब, काश्मिरीयत, कोणत्याही धर्माचा द्वेष करु नका वगैरे वगैरे पुड्या सोडतच आहेत. हे हिंदू धार्मिक आहेत. देवळात जाणारे आहेत, पूजा करणारे आहेत. हिंदू धर्मावर (Hinduism) श्रद्धा असणारे आहेत. पण यांचा वैचारिक गोंधळ झालेला आहे, यांना राजकीय दृष्टी नाही. यांचा इतर धर्मांचा अभ्यास नाही. म्हणून हिंदुत्व आहे. जिहादी प्रवृत्तीचा सामना करायचा असेल तर केवळ राजकीय दृष्टीकोन पुरेसा नाही हेही खरं. इस्लाम हा केवळ राजकीय विचार नाही. तो कडवट धार्मिक विचार आहे, राजकीय विचार आहे, त्यांचा प्रत्येक माणूस हा सैनिक आहे. जसं युरोपमध्ये, ख्रिस्तींमध्ये पूर्वी धर्मसत्ता आणि राजकीय सत्ता यांच्यात संघर्ष झाला. त्यातून स्वेक्युलरिझ्मचा जन्म झाला. तसं इथे नाही. इथे राजकीय आणि धर्मसत्ता वेगळी नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात हिंदुत्व घराघरात पोहोचवावं लागणार आहे. पण हिंदुत्वाचा प्रचार करत असताना त्यास उगाच धर्म-विरहित किंवा नास्तिक रुप देण्याची गरज नाही. ‘सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे। परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे।।’ असं समर्थ म्हणून गेलेत. ते नाकारणारे तुम्ही आम्ही कोण? थोडक्यात भैरवनाथांच्या साक्षीने हिंदुत्वाचा प्रवास करायचा आहे!
हेही पहा –
Join Our WhatsApp Community