Grievance Redressal Cell : पालकमंत्र्यांचा तक्रार निवारण कक्ष : जनते ऐवजी भाजपच्याच पदाधिकाऱ्यांची होतात कामे

दीड महिना उलटूनही लोढा यांच्या कार्यालयात सामान्य माणूस तक्रार घेऊन येत नाही याचाच अर्थ लोढा सामान्य जनतेपर्यंत पोहोचले नाहीत किंवा त्यांना सामान्य जनतेच्या समस्या सोडवायच्या नाही असाच याचा अर्थ होत असल्याच्या प्रतिक्रिया आता ऐकायला मिळत आहेत

103
Grievance Redressal Cell : पालकमंत्र्यांचा तक्रार निवारण कक्ष : जनते ऐवजी भाजपच्याच पदाधिकाऱ्यांची होतात कामे
Grievance Redressal Cell : पालकमंत्र्यांचा तक्रार निवारण कक्ष : जनते ऐवजी भाजपच्याच पदाधिकाऱ्यांची होतात कामे

विशेष प्रतिनिधी,मुंबई

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासाठी तक्रार निवारण कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले आहे. जनतेच्या महापालिके संदर्भातील तक्रारी सोडवण्यासाठी हे कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात जनतेच्या कामात ऐवजी भाजपच्या माजी नगरसेवकांची अधिक कामे या कार्यालयाच्या माध्यमातून होत असल्याचे आता दिसून येत आहे.  महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून ज्या लोकांची कामे होत नाहीत, त्या लोकांची कामे या पालकमंत्र्यांच्या तक्रार निवारण कक्षाच्या माध्यमातून केली जाणे अपेक्षित मानली जातात, परंतु प्रत्यक्षात केवळ त्यांच्याच पक्षातील माजी नगरसेवकांची यापूर्वीची रखडलेली विकास कामे प्रशासनाच्या माध्यमातून पुढे रेटून नेण्याचीच अधिक कार्यवाही होत असल्याने नक्की हे तक्रार निवारण कक्षाचे कार्यालय जनतेसाठी आहे की भाजपसाठी आहे असा सवाल उपस्थित होत आहे.

शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर आणि उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयात जनता दरबार आयोजित करून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. यातील काही तक्रारी या महापालिकेच्या वरिष्ठ स्तरावर सोडवणे आवश्यक असल्याने आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सह आयुक्त, उपायुक्त तसेच खातेप्रमुख, प्रमुख अभियंता स्तरावर बैठका घेता याव्यात, तेथे जनतेचे हे प्रश्न मांडून त्यांना न्याय देता यावा म्हणून उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना महापालिका मुख्यालयात कार्यालय उपलब्ध करून देत त्यांच्यात आणि प्रशासनात समन्वय राखता यावा म्हणून समन्वय अधिकारी म्हणून सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या अधिकाऱ्याच्या हाताशी एक स्टेनो, एक हेड क्लार्क, एक क्लार्क तसेच एक शिपाई वर्ग देण्यात आला. शिवाय या समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक होण्यापूर्वी एका स्टेनोची व शिपाईची आधीच नियुक्ती करण्यात आली होती.

महापालिका मुख्यालयात पालकमंत्र्यांना सहज भेटता याव्या आणि त्यांना आपल्या मांडता याव्यात यासाठी हा कक्ष सुरु करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात याठिकाणी भाजपच्या माजी नगरसेवकांचीच अधिक कामे होताना दिसत आहेत. सामान्य जनतेची कामे कमी आणि आपल्याच पक्षाच्या माजी नगरसेवकांची आणि पदाधिकाऱ्यांची अधिक कामे होत असल्याचे प्रशासनाकडे वर्ग झालेल्या पत्रांच्या नोंदीवरून स्पष्ट होते. सुरुवातीचा एक महिना त्यांच्या पक्षातील पदाधिकारी व माजी नगरसेवकांच्या तक्रारी समजून घेतल्या. पण आता दीड महिना होत आला तरी सामान्य जनता या कार्यालयात दिसत नसल्याने नक्की हे कार्यालय कुणासाठी असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे याठिकाणी पालकमंत्र्यांकडून सर्व पक्षांच्या माजी नगसेवकांसह पदाधिकारी यांना आवाहन करून पालकमंत्री हे उपनगराचे आहेत, ते एका पक्षाचे नाहीत. त्यामुळे आपली कोणतीही समस्या असल्यास मला या कार्यालयात भेटावे आपली समस्या शक्यतो प्रशासनाशी पाठपुरावा करून सकारात्मक अभिप्रायसह निकालात काढण्याचा प्रयत्न करेन अशाप्रकारचे आवाहन केले पाहिजे होते . परंतु लोढा यांना जनतेपेक्षा आपली पक्षाच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागातील रखडलेली कामे करायची आहे. त्यामुळे दीड महिना उलटूनही लोढा यांच्या कार्यालयात सामान्य माणूस तक्रार घेऊन येत नाही याचाच अर्थ लोढा सामान्य जनतेपर्यंत पोहोचले नाहीत किंवा त्यांना सामान्य जनतेच्या समस्या सोडवायच्या नाही असाच याचा अर्थ होत असल्याच्या प्रतिक्रिया आता महापालिकेतच ऐकायला मिळत आहेत.

(हेही वाचा-Asian Games Football Team : आशियाई क्रीडास्पर्धेसाठीच्या फुटबॉल संघात छेत्री एकमेव ओळखीचा चेहरा, स्टायमॅकविषयी निर्णय नाही)

लोढा फाऊंडेशनचाही सहभाग

पालकमंत्र्यांच्या या तक्रार निवारण कक्षात लोढा फांऊंडेशनच्या एका कर्मचाऱ्याला नियुक्त करण्यात आले असून हा कर्मचारी कार्यालयातील दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवून असतो. त्यामुळे एकप्रकारे सर्वांना आपल्या इशाऱ्यावरच काम करायला सांगत असल्याने हे कार्यालय पालकमंत्र्यांचे की लोढा फाऊंडेशनचे असा प्रश्नही उपस्थित होत आहे. यापूर्वी महापालिकेच्या डी विभाग कार्यालयातील प्रभाग समिती कार्यालयातही लोढा फांऊंडेशनचा कर्मचारी अशाच प्रकारे बसून या समिती कार्यालयाचा ताबा त्यांनी घेतला होता. त्यावेळी समिती कार्यालयाच्या शिपाई वर्गाआधी हे कर्मचारी स्वत: उपस्थित राहून स्वत:च सुरक्षा रक्षकांकडून चावी घेऊन कार्यालय उघडत असल्याची बाब तेव्हा उघडकीस आली होती.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.