Ganesh Visarjan 2023 : गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला…

72

मागील दहा दिवसांपासून लाडू, मोदकांसह पंच पक्वानांच्या आस्वादासह पाहुणचार घेत अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पा आपल्या गावाला निघाले आहे. बाप्पांचे आगमन झाल्यापासून त्यांची मनोभावे सेवा करणाऱ्या भक्तांनी वाजत गाजत मिरवणूक काढत त्यांना निरोप दिला. अधून मधून येणाऱ्या मुसळधार पावसाच्या सरींमध्ये भिजतच भक्तांनी ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करत, गुलालांची उधळण करत गणपती बाप्पा मोरयाsss, गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला अशा जयघोषात पुढच्या वर्षी लवकर या… अशी आर्जवी करत त्यांचा निरोप घेतला.

पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, अशा जयघोषात वाजत-गाजत आज राज्यभरात लाडक्या ‘बाप्पा’ला निरोप देण्यात येत आहे. मागील दहा दिवसांपासून मनोभावे सेवा अर्चा केल्यानंतर गुरुवारी सर्वत्रच बाप्पांना निरोप देण्यात येत असून दक्षिण मुंबईसह उपनगरातील काही महत्वाच्या रस्त्यांवर मोठ्या गणेश मंडळांच्या मुर्तीच्या मिरवणुका पाहण्यासाठी लोकांनी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी केली होती. परंतु पावसाच्या अधून मधून होणाऱ्या हजेरीमुळे बाप्पांना पाहण्यासाठी होणारी गर्दी पांगली जात होती. मात्र, आपल्या लाडक्या बाप्पांना शेवटचे पाहण्यासाठी लोक त्या पावसातही भिजत उभे राहिलेले पाहायला मिळत होते. लालबाग राजासह, गणेश गल्लीचा गणपती, चिंचपोकळीचा चिंतामणी तसेच खेतवाडीतील सर्व गल्लीतील गणपती आदी सार्वजनिक गणपती एका रांगेत विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीच्या दिशेने, तर उपनगरात जुहू चौपाटी, माहुल जेटी आदी विसर्जना स्थळांच्या दिशेन पुढे सरकत होते.

(हेही वाचा Ganesh Visarjan : विसर्जन मिरवणुकीत जाताय तर खबरदार)

मुंबई महापालिकेच्यावतीने गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटी, मार्वे, गोराई आदी समुद्र चौपाटींसह इतर नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि १९८ कृत्रिम तलावांच्या ठिकाणी विविध स्वयंसेवी संस्था, सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून सेवा सुविधा पुरवली होती. सायंकाळी साडेपाच पर्यंत ओहोटी असल्याने गणपती विजर्सनासाठी मूर्ती उशिराने विसर्जन स्थळांवर पोहोचल्या जात होत्या. रात्री अकरावाजता पुन्हा भरती असल्याने रात्री उशिरा मूर्ती विसर्जनात भाविकांना समुद्रात जावू नये यासाठी विसर्जन स्थळांवर जीवरक्षक तैनात करण्यात आले होते आणि ठराविक अंतरावरून जीवरक्षक मूर्तींचा ताबा स्वत: घेऊन मूर्तींचे विसर्जन करत होते. त्यामुळे भाविकांना ठराविक अंतरावरच अडवले जात होते. समुद्रातील पाण्यात मत्सदंश होण्याची भीती लक्षात घेता महापालिकेने ही विशेष काळजी घेत भाविकांना समुद्राच्या पाण्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलेला पहायला मिळत होता.

गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत घरगुती आणि सार्वजनिक अशाप्रकारे एकूण ७,९५० गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले. यामध्ये ३२९ सार्वजनिक तर ७,५१३ घरगुती गणपती आणि १०८ गौरींचे विसर्जन पार पडले. तर मुंबईतील १९८ कृत्रिम तलावांमध्ये २,९९९ गणपतींचे विसर्जन पार पडले. त्यामध्ये ६३ सार्वजनिक आणि २८६९ गणपतींचे विसर्जन तसेच ४० गौरींचे विसर्जन पार पडले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.