आता एसटीचे चालक-वाहक ठरवू शकतात बसचे वेळापत्रक

चालक-वाहकांनी दिलेल्या सूचनांची योग्य नोंद ठेवली जाणार असून, त्याआधारे वेळापत्रक निश्चित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

150

एसटीच्या प्रवासी वाहतुकीसंदर्भात नवीन वेळापत्रक तयार करणे, नवीन बस मार्ग सुरू करणे, सध्या सुरू असलेल्या मार्गांमध्ये प्रवासी मागणीनुसार बदल करणे, मार्गावरील थांब्यांची संख्या निश्चित करणे, विशिष्ट मार्गासाठी विशिष्ट वाहनांचा प्रकार अवलंबणे यांसारख्या उत्पन्न वाढीच्या नियोजनामध्ये चालक-वाहकांच्या अनुभवाचा फायदा व्हावा या उद्देशाने महामंडळाने आगार पातळीवर चालक, वाहक, वाहतूक नियंत्रक यांना प्रवासीभिमुख वाहतुकीच्या नियोजनासाठी आपल्या सूचना लेखी स्वरुपात देण्याचे आवाहन केले आहे.

काय आहे योजना?

एसटी महामंडळामध्ये चालक-वाहक हे प्रमुख घटक आहेत. एसटीच्या सर्व बस फेऱ्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी त्यांच्यामार्फत केली जाते. १२ महिने, २४ तास चालक-वाहक एसटीच्या माध्यमातून रस्त्यावर प्रवास करत असतात. साहजिकच प्रवाशांचा सततचा संपर्क यामुळे विविध बस फेऱ्या सुरू करणे, त्यावरील थांबे निश्चित करणे, कोणत्या प्रकारची बस वापरावी याबद्दल माहिती देणे. अशा उत्पन्न वाढीच्या अनेक सूचना चालक-वाहक आपल्या एसटी प्रशासानाकडे करत असतात. परंतु त्यांची दखल घेतली जातेच असे नाही. परंतु या वेळेला महामंळाने एक परिपत्रक काढून प्रवासी वाहतुकीच्या नियोजनात चालक-वाहकांच्या सूचना तक्रारी लेखी स्वरुपात नोंदवून त्यांचा सहभाग वाढवण्याची योजना आखली आहे.

(हेही वाचाः विनातिकीट प्रवाशांविरोधात एसटीची तपासणी मोहीम)

वेळापत्रक निश्चित करण्यासाठी होणार विचार

यापूर्वी गेली अनेक वर्ष विभागीय स्तरावर काही मोजक्या अधिकाऱ्यांमार्फत प्रवासी वाहतुकीचे नियोजन केले जात होते. परंतु अनुभवाअभावी या नियोजनातून अपेक्षित प्रवासी संख्येमध्ये वाढ होत नाही हे महामंडळाच्या लक्षात आले. त्यामुळे प्रत्यक्ष रस्त्यावर काम करणाऱ्या चालक-वाहकांना सहभागी करुन घेण्याचा एक चांगला उपक्रम महामंडळाने राबवला आहे. विशेष म्हणजे आगार पातळीवर लेखी स्वरुपात दिल्या जाणाऱ्या या सूचनांची योग्य नोंद ठेवली जाणार असून, त्याआधारे वेळापत्रक निश्चित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

महामंडळाला विश्वास

विशेष म्हणजे चालक-वाहकांनी दिलेल्या सूचनांची पोच, पत्राद्वारे आगार प्रशासनाने त्यांना द्यायची आहे. सध्या एसटी महामंडळामध्ये सुमारे ३७ हजार चालक व ३७ हजार वाहक कार्यरत आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी निश्चित होईल यात शंका नाही, असा विश्वास महामंडळाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

(हेही वाचाः रडगाणे सुरुच… एसटी कर्मचाऱ्यांना वेतनासाठी पुन्हा मिळणार ‘थांबा’?)

प्रवासी वाहतूक नियोजनात चालक-वाहकांच्या सूचना विचारांत घेतल्यास एसटी महामंडळाला प्रवासी व उत्पन्न वाढीसाठी निश्चित फायदा होईल. अशा सर्वसमावेशक उपक्रमांचे आम्ही स्वागतच करतो.

 

-श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी कॉंग्रेस

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.