chhatrapati shivaji maharaj : शिवराज्याभिषेक दिनासाठी सावरकर स्मारकातून पालखीचे रायगडाकडे प्रस्थान 

ही पालखी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यासमोर सादर करून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि वीर सावरकर यांचा जयजयकार करण्यात आला.

132

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे यावर्षी २ जून रोजी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला ३५०वे वर्ष असून ते दिमाखाने साजरे करण्यात येत आहे. यासाठी श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीच्यावतीने दुर्गराज रायगड ही संस्थाही तेथे गेल्या अनेक वर्षांपासून हा सोहळा साजरी करीत आहे. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्याभिषेक सोहळ्यासाठी खास पालखीची मागणी केली आणि ती पालखी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना दिली. चांदीच्या पत्र्याने सुशोभित केलेल्या या पालखीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्याभिषेकदिनी किल्ले रायगडावर नेले जाणार आहे. त्यापूर्वी मंगळवारी, ३० मे २०२३ या दिवशी ही पालखी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यासमोर सादर करून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि वीर सावरकर यांचा जयजयकार करण्यात आला. त्या ठिकाणी पालखीमध्ये छत्रपती शिवरायांची प्रतिमा ठेवून यथासांग पूजा केल्यानंतर पालखीचे रायगडाच्या दिशेने प्रस्थान झाले.

समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की, आम्ही राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे या पालखीची मागणी केली. गेली अनेक वर्षे संस्थेच्या पुढाकाराने रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जातो. यावेळी ३५०वे वर्ष आहे. त्या निमित्ताने आम्ही केलेली मागणी मंत्री मुनगंटीवार यांनी मान्य करून ही पालखी तयार करून दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारे भक्त होते, अशा या स्वातंत्र्यवीरांच्या स्मारकापुढे आम्ही अभिमानाने ही पालखी सादर केली आहे.  छत्रपती शिवरायांसाठी असे काम केलेले महाराष्ट्रातील हे पहिलेच सरकार असेल असेही, त्यांनी सांगितले.

(हेही वाचा Veer Savarkar : वीर सावरकरांचे विचार आचरणात आणणे हीच त्यांना खरी मानवंदना – रणजित सावरकर)

यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी पालखी आणि त्यातील शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन केले, तसेच कार्यवाह राजेंद्र वराडकर, सह कार्यवाह स्वप्निल सावरकर यांनी पालखी वाहून नेण्याचा प्रातिनिधीक अभिमानास्पद असा मानही भक्तिभावाने स्वीकारला. स्मारकाचे कर्मचारी, सदस्यही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच समितीचे कार्यकर्ते, पदाधिकारीही यावेळी होते. पालखीवर छत्र धरून भगवा झेंडा फडकावत अतिशय भक्तिभावाने पालखीचे स्वागत केले गेले. महाराष्ट्र सरकारनेही  यासाठी खास पुढाकार घेतला असून त्यासाठी सर्व प्रशासनही तेथे येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या लाखो मावळ्यांचे स्वागत करण्यास सज्ज झाले आहे. लाखो मावळे रायगडावर येतील मात्र एक लाख लोक येऊ शकतील अशी जागा तेथे नाही, कडाक्याचे ऊनही आहे, तेव्हा राज्यातील विविध गावांमध्ये गुढीपाडव्याप्रमाणे लोकांनी गुढ्या, ध्वज उभारून शिवपाडवाच या दिवशी साजरा करावा, असे आवाहन यावेळी सुनील पवार यांनी केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.