Vikhroli Railway Bridge : विक्रोळी रेल्वे पुलाचा ४५.७७ कोटींचा खर्च गेला ९७.३७ कोटींच्या घरात

वाढीव कामांमुळे दोन वेळा खर्चात झाली वाढ

154
Vikhroli Railway Bridge : विक्रोळी रेल्वे पुलाचा ४५.७७ कोटींचा खर्च गेला ९७.३७ कोटींच्या घरात
Vikhroli Railway Bridge : विक्रोळी रेल्वे पुलाचा ४५.७७ कोटींचा खर्च गेला ९७.३७ कोटींच्या घरात

मागील चार वर्षांपासून सुरु असलेल्या विक्रोळी रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाच्या खर्चानेही मोठी उडी मारली आहे. रेल्वे मार्गावरील पूल उभारणीचे काम रेल्वे आणि महापालिका संयुक्तपणे करत असून हे काम जलदगतीने करण्याच्या नावाखाली या पूलाचा खर्च तब्बल १०० टक्क्यांनी वाढवला गेला आहे. या पुलाच्या बांधकामासाठी ३७ कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी दिली होती, परंतु प्रत्यक्षात या पूलाच्या कामाचा वाढीव खर्च दोनदा वाढवला गेला, त्यामुळे कंत्राट कामांचा खर्च ७९ कोटी २० लाख ३९ हजार रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. तर विविध करांसह हा खर्च ४५.७७ कोटींवरून तब्बल ९७.३७ कोटींवर पोहोचला आहे

विक्रोळी रेल्वे स्टेशन येथील लेवल क्रॉसिंग क्रमांक १४ सी येथे रेल्वे उड्डाणपूल बांधण्याबाबत स्थायी समितीच्या मंजुरीने १४ मार्च २०१८ मध्ये विविध करांसह ४५.७७ कोटींचे कंत्राट देत यासाठी एच. व्ही. कन्स्ट्रक्शन कंपनीची निवड केली होती. मार्च महिन्यात मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्ष कामाला २ मे २०१८ पासून सुरुवात झाली होती. हे काम पावसाळा वगळून १८ महिन्यांमध्ये करणे बंधनकारक होते. त्यामुळे हे काम पावसाळा वगळून १८ महिन्यांमध्ये म्हणजे डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते, परंतु पावसाळा वगळून ३२ महिन्यांचा कालावधी मागील मे महिन्यांमध्ये लोटल्यानंतरही हे काम अद्याप पूर्ण झाले नाही.

उलट पूल विभागाने या पुलाचा खर्च १०० टक्क्यांनी वाढवून वाढीव कामांच्या खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. पूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पुलाच्या जलद बांधकामासाठी सुपर स्ट्रक्चरच्या डिझाईनमध्ये बदल करत सुधारीत तांत्रिक कार्यपध्दतीची अवलंब केला. त्यामुळे हा खर्च वाढल्याचे सांगितले. या रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम हे रेल्वे व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. रेल्वे स्टिल गर्डर वापरणार आहेत. यासाठी आय. आय. टीकडून नव्याने अभिप्राय घेण्यात आला. त्यानुसार पी. एस. सी गर्डर ऐवजी स्टील गर्डर वापरण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

(हेही वाचा – Nanded : नांदेड जिल्ह्यात धो-धो पाऊस; किनवटमधील 7 मंडळात अतिवृष्टीची नोंद)

यामध्ये विविध करांसह ४५.७७ कोटी रुपयांचे मंजूर असून त्यामध्ये ४२.६७ कोटी रुपयांची अतिरिक्त वाढ झाली असून या पुलाचा खर्च आता ८८.४५ कोटी रुपयांवर पोहोचला होता. आता त्यात आणखी ८.९२ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे या पुलाचा एकूण खर्च ९७ कोटी ३७ लाख ३९ हजार २२१ रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. म्हणजे प्रथम विविध करांसह ४२.६७ कोटींची वाढ आणि आता विविध करांसह ८.९२ कोटींची वाढ अशाप्रकारे एकूण खर्च ९७.३७ कोटींच्या घरांमध्ये म्हणजे दुप्पट पेक्षा अधिक वाढला गेल्याचे दिसून येत आहे.

या कामांचा ४२ महिने अर्थात १३ मे २०२३ पर्यंत होता, परंत आता या वाढीव कामांमुळे अधिक ०९ महिने वाढवून दिले असून या पुलाचे बांधकाम आता पावसाळ वगळून २ जून २०२४ पर्यंत होणे अपेक्षित असल्याचे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार स्टील गर्डर बाबत नवीन आराखडे तयार करून फेरतपासणी सल्लागार कंपनी असलेल्या आयआयटी मुंबईने केंद्रीय संस्थेकडून पडताळणी केली असता मुख्य गर्डरचे तळाच्या प्लेटची जाडी २५ मी. मी वरून ३६ मी. मी व ब्रेसिंग ऍगलची जाडी १० मी. मी ने वाढवण्याबाबत सुचवले. त्यामुळे वाढीव कामांमध्ये बदल झाल्यामुळे खर्चातही वाढ झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.