कर्नाक पूलाच्या पुनर्बांधणीसाठी समन्वयक ‘राईट्स’च

96

मस्जिद बंदर लोकमान्य टिळक मार्ग येथील १४५ वर्षे जुना असलेला कर्नाक बंदर हा उड्डाणपूल धोकादायक ठरल्यामुळे मागील २०१६पासून अवजड वाहनांच्या वाहतूकीसाठी हा पूल बंद आहे. या पुलावरून सध्या हलक्या दर्जाच्या वाहनांना वाहतुकीची परवानगी असून आता लवकरच या पूलाचा भाग तोडून नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे. या पूलाच्या बांधकामासाठी यापूर्वीच कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली असून आता या पूलाच्या कामाला गती देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून रेल्वेशी समन्वय साधण्यासाठी राईट्स लिमिटेड या कंपनीची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या समन्वयकासाठी ३ कोटी १० लाख रुपये मोजले जाणार आहे.

( हेही वाचा : भारतरत्न लतादिदींच्या अंत्यविधीवर १ कोटींचा खर्च)

हे पूल धोकादायक बनल्याने याची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला. एकूण १५० मीटर लांबी आणि २६.५ मीटर रुंदीच्या या उड्डाणपूलाची पाच स्पॅनमध्ये उभारणी केली जाणार आहे. स्टील गर्डर, पी.एस.सी. गर्डर व आर.सी.सी. डेक स्लॅबचे बांधकाम केले जाणार होते. सन २०१६मध्ये हे पूल धोकादायक ठरल्याने महापालिकेच्या माध्यमातून हे पूल तोडण्यास रेल्वेने यापूर्वीच परवानगी दिली. या पूल तोडण्याचा खर्च यापूर्वीच रेल्वेला अदा करण्यात आला आहे. रेल्वेच्या हद्दीतील भागाचे पाडकाम रेल्वे प्राधिकरणामार्फत करण्यात येणार असून त्यानंतर संपूर्ण रेल्वेवरील पूल व पोहोचमार्ग बांधणीचे काम महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे.

कर्णाक पूलाच्या पुनर्बांधणीकरता कंत्राटदाराची नियुक्ती यापूर्वीच करण्यात आलेली असल्याने या पूलाच्या रेल्वे भागावरील बांधकामाचे आराखडे रेल्वे प्राधिकरणामार्फत अंशिक मंजूर करण्यात आला आहे. या मंजुरीच्या प्रक्रीया अंतिम टप्प्यात असून त्यानंतरच रेल्वे हद्दीतील पूलाच्या गर्डर बांधणीकरता रेल्वे प्रशासनाने सूचवलेल्या संस्थेची देखरेख व आभियांत्रिकी सेवा आदी बाबीकरता रेल्वे प्राधिकरणाच्या आवश्यकतेनुसार सक्तीची आहे.

या रेल्वे हद्दीतील देखरेख व अभियांत्रिकी सेवा करता महापालिकेच्यावतीने राईट्स लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या पुलाचे बांधकाम ३६ महिन्यांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित असल्याने राईट्स लिमिटेड यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून यासाठी ३ कोटी १० लाख ५० हजार रुपये शुल्क मोजले जाणार आहे. पूल विभागाचे प्रमुख अभियंता सतीश ठोसर यांनी या पूलाच्या पुनर्बांधणीला लवकरच सुरुवात होईल,असा विश्वास व्यक्त केला आहे. या पूलाच्या पुनर्बांधणीकरता समन्वयक म्हणून राईट्स लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.