माहीमपाठोपाठ नवी मुंबई विमानतळानजीक मजार, दर्गा; राष्ट्रीय सुरक्षिततेला धोका

106

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीम समुद्र किनाऱ्याजवळ अवैध मजार बांधण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणल्यानंतर हलकल्लोळ माजला. सरकारने तातडीने त्यावर कारवाई केली. मात्र आता माहीम पाठोपाठ नवी मुंबई विमानतळानजीक पारगाव-दापोली गावाच्या जवळ जे.एन्.पी.टी. महामार्गाच्या डाव्या बाजूला असलेल्या टेकडीवर १ एकर भूखंडावर मजार, दर्गा, खोल्या आदींचे अवैध बांधकाम करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. गंभीर गोष्ट म्हणजे या दर्ग्याच्या ठिकाणाहून नवी मुंबई विमानतळ आणि भाभा अणुशक्ती केंद्र टेहाळणीच्या टप्प्यात आहे. हे अनधिकृत बांधकाम  सिडकोच्या कार्यक्षेत्रात आहे. वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार सिडकोकडून या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात नोटीस पाठवण्यात आली आहे; परंतु हे अनधिकृत बांधकाम अद्यापही तसेच आहे. नोटीस पाठवूनही अनधिकृत बांधकाम हटवले जात नसेल, तर सिडकोने पोलिसांच्या साहाय्याने हे अनधिकृत बांधकाम तोडावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने सिडकोकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अवैध बांधकाम वक्फच्या स्वाधीन करण्याचा कट  

काही महिन्यांपूर्वी या दर्ग्याच्या येथून दुर्बिणीने टेहाळणी करणार्‍या काही संशयितांना स्थानिक ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. यापूर्वी महाराष्ट्रासह देशभरात झालेल्या राष्ट्रविरोधी घटनांची पार्श्वभूमी पहाता या अनधिकृत दर्ग्यावर वेळीच कारवाई व्हावी. अन्यथा भविष्यात या ठिकाणाहून कोणतीही राष्ट्र आणि समाज विघातक घटना घडल्यास या अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई न करणारी आपली यंत्रणा त्यासाठी तितकिच जबाबदार ठरेल, याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी माहीम समुद्रातील दर्ग्याच्या बाजूला असलेले अवैध बांधकाम प्रशासनाने हटवले. त्याप्रमाणे हे अनधिकृत बांधकामही तत्परतेने निष्कासित करण्यात यावे. हे अनधिकृत बांधकाम हटवण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आपणाकडे यापूर्वीच लेखी तक्रार केली आहे; पंरतु राष्ट्रीय सुरक्षिततेशी संबंधित असूनही अद्यापही यावर कारवाई झालेली नाही. अवैध बांधकाम असलेली ही जागा वक्फ बोर्डाकडे हस्तांतरित करण्याचे षड्यंत्र चालू असल्याचे आम्हाला खात्रीशीर सूत्रांकडून कळले आहे. या जागेचा ताबा एकदा वक्फ बोर्डाकडे गेल्या तर हे अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी न्यायालयात जाऊन लढा द्यावा लागेल. हे वेळ आणि पैसा खर्च करणारे ठरेल, तसेच विमानतळाच्या सुरक्षिततेचा प्रश्नही तोपर्यंत तसाच राहील. त्यामुळे या अवैध बांधकामावर तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.

सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी बेकायदेशीर बांधकामे उभारणे ही एक चुकीची परंपरा सुरु झाली आहे. हे बेकायदेशीर बांधकाम आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील सरकारी जमिनीवर असून त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.नुकतेच माहीम समुद्रकिनाऱ्याकडील पाडलेल्या बेकायदेशीर मजारबाबत तो 600 वर्षे जुना असल्याचा दावा केला जात होता. खरेतर 2018 च्या सॅटेलाइट छायाचित्रांमध्ये तिथे मजार नव्हता. त्या ठिकाणी 2018 नंतर ६०० वर्षे जुना मजार असल्याचा प्रचार होत आहे.
– रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदू जनजागृती समिती.

भ्रष्टाचार झाल्याचा आरोप 

या अवैध बांधकामाविषयी समाजात अशी चर्चा चालू आहे की, ‘संबंधित दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष करण्यासाठी काही अधिकार्‍यांनी आर्थिक गैरव्यवहार केला आहे. त्याच आर्थिक हिंतसंबंधांमुळे या अवैध दर्ग्याच्या बांधकामाकडे आताही सिडकोकडून दुर्लक्ष केले जात आहे.’ समाजातून होणार्‍या या आरोपांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. भ्रष्टमार्गातून मिळणार्‍या पैशासाठी राष्ट्रीय सुरक्षेला धोक्यात घालणे अतिशय गंभीर आहे. ‘या आरोपांची सत्यता पडताळून त्यात काही भ्रष्टाचार आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी’, अशी आमची मागणी आहे. या अनधिकृत बांधकामाविषयी स्थानिकांसह समस्त राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे हे अवैध बांधकाम त्वरित हटवावे, अन्यथा हिंदु जनजागृती समितीसह समस्त राष्ट्रप्रेमी संघटना आणि नागरिक यांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

(हेही वाचा आव्हाडांचे पूर्वीचे अंगरक्षक वैभव कदम यांचा मृत्यू म्हणजे मनसुख हिरेन २.०)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.