Cabinet Decision : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १५०० कोटींची मदत

100

राज्यात गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १ हजार ५०० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सुमारे १५.९६ लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील २७ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार आहे.

राज्य सरकारने सततचा पाऊस ही नवीन आपत्ती घोषित करुन मदत देण्याचा निर्णय ५ एप्रिलच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता. त्याप्रमाणे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने आणि निकषानुसार मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने  राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर सुधारित केले आहेत. त्यानुसार जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर ८ हजार ५००  रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी १७  हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी २२ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर अशी दोन  हेक्टरच्या मर्यादेत ही मदत मिळेल.

(हेही वाचा Maharashtra Cabinet decision : कंत्राटी ग्रामसेवकांसाठी खुशखबर, आता १६ हजार मानधन मिळणार)

शिर्डीत अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या दोन्ही कार्यालयांसाठी प्रत्येकी सहा पदे निर्माण करण्यात येतील. अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा जिल्हा असून नागरिकांना महसूलशी संबंधित सर्व कामांकरिता जिल्हा मुख्यालयी जावे लागते. त्यामुळे शिर्डी येथे देखील अतिरिक्त  जिल्हाधिकारी कार्यालयाचा निर्णय घेण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, सिंदेवाही, नागभिड, ब्रम्हपुरी हे तालुके चंद्रपूर पासून दूर अंतरावर आहेत.  त्याचप्रमाणे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा हरितपट्टा देखील असल्यामुळे चंद्रपूर जिल्हा दोन भागात विभागला गेला आहे.  यामुळे जनतेची शासकीय कामासाठी पायपीट होते. तसेच विकास कामांनाही विलंब होतो. त्यामुळे चिमूर येथे हे कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.