शिवाजी पार्क परिसरातील झाडांच्या फांद्यांच्या छाटणीकडे दुर्लक्ष; फिरण्यास येणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका

117
शिवाजी पार्क परिसरातील झाडांच्या फांद्यांच्या छाटणीकडे दुर्लक्ष; फिरण्यास येणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका
शिवाजी पार्क परिसरातील झाडांच्या फांद्यांच्या छाटणीकडे दुर्लक्ष; फिरण्यास येणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका

मुंबईत मान्सून पूर्व तयारीचा भाग म्हणून मुंबईतील रस्त्यालगतच्या सर्व झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, झाडांच्या फांद्यांची छाटणी ही केवळ कंत्राटदाराला आवश्यक तेवढे लाकूड साहित्य मिळेल तिथेच सुरू असल्याचे बोलले जात आहे. दादरमध्ये सध्या अशाप्रकारची झाडांच्या फांद्यांची छाटणी सुरू असून प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसरातील झाडांच्या धोकादायक फांद्या छाटण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केला जात नाही. परिणामी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्कमध्ये फिरण्यास येणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्क परिसरात मोठ्याप्रमाणात उंच उंच झाडे असून त्या झाडांच्या फांद्यांची छाटणी पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक असते. परंतु यातील बहुतांशी झाडांच्या फांद्या वीर सावरकर मार्गावर जात असून काही फांद्या उंचावर असल्याने त्या कापल्या जात नसल्याने त्या फांद्या मृत तथा धोकादायक बनून तुटून पडण्याची शक्यता आहे. मागील तीन दिवसांमध्ये आलेल्या वादळी हवेमुळे येथील अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडण्याचे प्रकार घडले आहेत. या फांद्या अंगावर पडून लोकांना इजा झाली नसली तरी प्रत्यक्षात या फांद्यांमुळे दुघर्टना होता होता वाचली आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच शिवाजी पार्कमधील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळ्यापूर्वीच जर येथील झाडांच्या फांद्या तुटून पडत असेल तर प्रत्यक्षात पावसाळ्यात या फांद्या पडण्याचे प्रकार मोठ्याप्रमाणात घडून याठिकाणी फिरण्यास येणाऱ्या लोकांच्या जीवावर बेतले जाण्याची भीतीही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

(हेही वाचा – Cabinet Decision : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १५०० कोटींची मदत)

सध्या दादर पश्चिमच्या रानडे मार्गावरील झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जात असून शिवाजीपार्क मैदान परिसरात सकाळ आणि संध्याकाळी फिरण्यास येणाऱ्या लोकांसह मोठ्या प्रमाणात पर्यटकही येत असतात. त्यामुळे पावसाळ्यात झाडांच्या मृत फांद्या किंवा धोकादायक फांद्या पडून दुघर्टना होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेच्या उद्यान विभागाने येथील झाडांच्या फांद्यांची छाटणी तातडीने हाती घेणे आवश्यक आहे. परंतु महापालिकेच्या उद्यान विभागाचे याकडे लक्ष नसून कंत्राटदाराकडून ही कामे करूनही घेतले जात नसल्याने शिवाजी पार्कमधील रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, शिवाजी पार्क परिसरातील झाडांच्या फांद्या आता वीर सावरकर मार्गावर पसरल्या गेल्या असून या फांद्यांची छाटणी वेळीच न केल्यास रस्त्यांवर पडून वाहनांचा अपघात होण्याची तसेच वाहनांचे नुकसान होण्याची भीतीही रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.