Voter List : मुंबईत अशक्य वाटणारे आव्हान पेलले; निवडणूक यंत्रणेच्या कामगिरीची राज्यभर चर्चा

105
Voter List : मुंबईत अशक्य वाटणारे आव्हान पेलले; निवडणूक यंत्रणेच्या कामगिरीची राज्यभर चर्चा
Voter List : मुंबईत अशक्य वाटणारे आव्हान पेलले; निवडणूक यंत्रणेच्या कामगिरीची राज्यभर चर्चा
  • विशेष प्रतिनिधी

मुंबईसारख्या वेगाने बदलणाऱ्या महानगरात अचूक मतदार यादी (Voter List) तयार करणे हे निवडणूक यंत्रणेसमोरील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक मानले जाते. झोपडपट्ट्या, उंच निवासी इमारती, पुनर्विकास प्रकल्प, सतत होणारे स्थलांतर, बदलणारे भाडेकरू, नागरिकांची अनुपस्थिती तसेच दुबार आणि मृत मतदारांच्या नोंदींची पडताळणी अशा अनेक अडचणींवर मात करत निवडणूक यंत्रणेने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे.

या मोहिमेत मतदार नोंदणी अधिकारी तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई शहर कृष्णा जाधव (Krishna Jadhav) यांच्या नेतृत्वाखाली सूक्ष्म नियोजन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, नियमित आढावा आणि काटेकोर समन्वयाच्या बळावर संपूर्ण यंत्रणा कार्यरत राहिली. प्रत्येक मतदार नोंदणी अधिकारी, पर्यवेक्षक आणि सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना क्षेत्रनिहाय जबाबदाऱ्या देण्यात आल्या. दैनंदिन प्रगतीचा आढावा, प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा आणि सातत्यपूर्ण क्षेत्रभेटींमुळे मोहिमेला अपेक्षित गती मिळाली.

(हेही वाचा – Amarnath Yatra: जम्मूतील अमरनाथ यात्रेला तात्पुरती स्थगिती, राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षा दलांच्या ताफ्यांची वाहतूकही तात्पुरती थांबवली; कारण?)

या विशेष मोहिमेत एकूण २,५८,५६६ मतदारांची नोंद तपासण्यात आली. त्यापैकी १,९६,२४८ (७५.९० टक्के) मतदारांची पडताळणी पूर्ण झाली असून ६२,३१८ (२४.१० टक्के) प्रकरणे प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे सर्व २,५८,५६६ प्रगणन नमुने संकलित करण्यात आले. या मोहिमेत २६५ मतदारस्तरीय अधिकारी (BLO), ५२ पर्यवेक्षक आणि २६ सहायक मतदार नोंदणी अधिकारी सहभागी झाले. याशिवाय राजकीय पक्षांसोबत पाच समन्वय बैठका घेऊन संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यात आली.

या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना मतदार नोंदणी अधिकारी तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कृष्णा जाधव म्हणाले, “ही कामगिरी संपूर्ण निवडणूक यंत्रणेच्या सामूहिक समर्पणाचे फलित आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, बीएलओ, पर्यवेक्षक, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, अधिकारी-कर्मचारी, नागरिक, गृहनिर्माण संस्था, राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमांच्या सक्रिय सहकार्यामुळेच ही मोहीम यशस्वी झाली. आमचे उद्दिष्ट केवळ लक्ष्य पूर्ण करणे नव्हते, तर मतदार यादी (Voter List) अधिक अचूक, पारदर्शक आणि सर्वसमावेशक बनविणे हे होते.”

या सर्व प्रयत्नांचे फलित म्हणून भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) मोहिमेत भायखळा विधानसभा मतदारसंघाने मुंबई महानगर प्रदेशासह महाराष्ट्रातील सर्व महानगरांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या कामगिरीमुळे निवडणूक व्यवस्थापनातील प्रभावी नियोजन आणि अंमलबजावणीचा भायखळा मतदारसंघ राज्यासाठी आदर्श ठरला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.