BMC Cleanliness Campaign : मुंबईत रविवारपासून स्वच्छतेसाठी महापालिका राबवणार ‘अशी’ मोहीम

BMC Cleanliness Campaign : मुंबईत रविवारपासून स्वच्छतेसाठी महापालिका राबवणार 'अशी' मोहीम

81
BMC Cleanliness Campaign : मुंबईत रविवारपासून स्वच्छतेसाठी महापालिका राबवणार 'अशी' मोहीम
BMC Cleanliness Campaign : मुंबईत रविवारपासून स्वच्छतेसाठी महापालिका राबवणार 'अशी' मोहीम

केंद्र सरकारने स्वच्छता हीच सेवा (BMC Cleanliness Campaign) या अभियान अंतर्गत, येत्‍या रविवारी म्हणजे १ ऑक्‍टोबर २०२३ रोजी सकाळी १० ते ११ या एक तासाच्या वेळेत लोकसहभागातून स्वच्छतेसाठी श्रमदान उपक्रम आयोजित करण्याच्या सूचना केल्या आहेत. यामध्ये मुंबई पोलिसांचाही संयुक्त सहभाग असणार आहे. त्यानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांनी हा उपक्रम आखून स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, मान्यवरांना त्यामध्ये सहभागासाठी निमंत्रित करावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

केंद्र सरकारच्‍या गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाने  श्रमदानातून ‘स्‍वच्‍छता ही सेवा’ हा उपक्रम राष्ट्रीय पातळीवर आयोजित केला आहे. त्या अनुषंगाने पूर्वतयारीचे निर्देश देण्यासाठी महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी २५ सप्टेंबर २०२३ रोजी बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्‍प) पी. वेलरासू, अतिरिक्‍त आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, मुंबईचे विशेष पोलिस आयुक्‍त देवेन भारती यांच्यासह महानगरपालिकेचे सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सर्व सहायक आयुक्त या बैठकीस उपस्थित होते. (BMC Cleanliness Campaign)

यावेळी महानगरपालिका आयुक्त चहल म्हणाले की,  सकाळी १० वाजता मुंबईतील सर्व ठिकाणी लोकसहभागातून विशेष स्‍वच्‍छता मोहीम श्रमदान करावयाचे आहे. मुंबई पोलीस प्रशासनही यामध्ये संयुक्त सहभागी असतील. सर्व मुंबईकर स्‍थानिक लोकप्रतिनिधी, स्‍थानिक विविध क्षेत्रातील मान्‍यवर, स्‍थानिक कलावंत, उद्योजक यांनाही श्रमदानामध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रित करावे. नागरी संघटना आणि स्वयंसेवक, स्‍वयंसेवी संघटना यांनाही सहभागी करून घ्यावे, अशी सूचना आयुक्‍त चहल यांनी केली. श्रमदानाच्या पूर्वतयारीमध्ये सर्वप्रथम प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये सहायक आयुक्‍तांनी ४ ते ५ ठिकाणे निश्चित करावीत. ती ठिकाणे केंद्र शासनाच्या https://swachhatahiseva.com या संकेतस्‍थळावर अपलोड करावीत, जेणेकरुन नागरिकांना आपल्या नजीकची ठिकाणे या संकेतस्थळावर जावून पाहता येतील व ते श्रमदानात सहभाग घेवू शकतील. स्‍वच्‍छता मोहिमेसाठी आवश्यक यंत्रणा आणि उपकरणे, साहित्य उपलब्‍ध ठेवण्‍याची खबरदारी घ्यावी, त्याअनुषंगाने सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचनाही आयुक्‍तांनी दिल्या.

(हेही वाचा : BMC : अनंत चतुर्दशीसाठी महापालिकेची अशी जय्यत तयारी)

 स्थानिक पोलीस तसेच सदिच्‍छा दूतांशी देखील विभाग कार्यालयांनी संपर्क साधावा आणि त्यांना मोहिमेमध्ये सहभागी करुन घ्यावे. सदिच्छादुतांनी त्यांच्या समाज माध्‍यमांद्वारे श्रमदानातून स्‍वच्‍छता मोहिमेसंदर्भातील आवाहन केल्यास, त्‍याबाबतची छायाचित्रे प्रकाशित केल्यास जनजागृतीला हातभार लागेल, असेही आयुक्त चहल यांनी सांगितले

या उपक्रमात विविध क्षेत्र आणि पार्श्वभूमीचे लोक एकत्रितरित्या येवून एक तासभर ऐच्छिक श्रमदान करतील, यासाठी महानगरपालिका तसेच मुंबई पोलीस प्रशासनाची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची राहणार आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे आणि जबाबदार नागरिक म्हणून एकमेकांना सहभागासाठी प्रेरित करावे, असे आवाहनही मुंबईकरांना उद्देशून चहल यांनी केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.