BMC : आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त पोहोचले नाले आणि नदीच्या काठावर, अचानक भेटीत काय दिसले?

4210
BMC : आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त पोहोचले नाले आणि नदीच्या काठावर, अचानक भेटीत काय दिसले?

मुंबईतील नालेसफाईच्या कामांबाबत आरोपांचा चिखलफेक सुरु असल्याने अखेर प्रत्यक्षात नालेसफाईचे काम कशाप्रकारे चालले आहे, त्याची सफाई केली जाते किंवा नाही की अधिकारी केवळ कागदावरच सफाईची टक्केवारी दाखवतात याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी हे रस्त्यावर उतरले. गगराणी यांनी अचानक भेट देऊन वाकोला नदी आणि मिठी नदीच्या कामांची पाहणी केली. (BMC)

महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी गुरुवारी वांद्रे-कुर्ला संकुल येथे वाकोला नदीवरील पुलावरून वाकोला नदीतील गाळ काढण्याच्या कामांची पाहणी केली आणि सविस्तर माहिती जाणून घेतली. पन्टून संयंत्रावरील पोकलेन लाँग ब्रूम संयंत्राच्या सहाय्याने या ठिकाणी कामे सुरू होती. नदीच्या वरील दिशेला असलेल्या भारत नगर वसाहतीच्या बाजूने येणारा तरंगता कचरा व गाळ सातत्याने काढला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यावर आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. (BMC)

न्यायालयाकडून आदेश प्राप्त करून बांधकामे हटवा

यानंतर आयुक्त गगराणी यांनी मिठी नदी जंक्शन येथून मिठी नदीतील गाळ उपसा आणि नदी रुंदीकरण, संरक्षक भिंत बांधणी इत्यादी कामांचीही पाहणी केली. या ठिकाणी उत्तर बाजूस एच पूर्व विभागाची हद्द आहे. तर दक्षिण बाजूस एल विभागाची हद्द आहे. दक्षिण बाजूकडील नदीचे रुंदीकरण त्या ठिकाणी असलेल्या बांधकामांविषयीची बाब न्यायप्रविष्ठ असल्याने प्रलंबित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. न्यायालयाकडून याविषयी आदेश प्राप्त करून ही बांधकामे निष्कासित करावीत, पात्र तथा अपात्रता तपासून पुनर्वसनाची कार्यवाही करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी याप्रसंगी दिले. या भेटीप्रसंगी सहआयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उपप्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) (शहर) सचदेव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. (BMC)

(हेही वाचा – Water Cut : वरळी, लोअर परळ, करी रोडमध्ये बिनधास्त पाणी वापराला ब्रेक; आत्तापासूनच पाणी सांभाळून वापरा)

पश्चिम उपनगरातील ‘या’ नाल्यांचीही केली अतिरिक्त आयुक्तांनी पाहणी

दरम्यान, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनीही पश्चिम उपनगरांमध्ये ठिकठिकाणी भेटी देऊन गाळ उपसा कामांची पाहणी केली. वांद्रे पश्चिम येथील एसएनडीटी नाला, अंधेरी पश्चिम येथील रसराज नाला, अंधेरी भुयारी मार्ग, गोरेगाव पश्चिम मधील वालभट नदी, मालाड भुयारी मार्ग, कांदिवली येथे पोईसर नदी, बोरिवली पूर्व येथे रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे कल्वर्ट, दहिसर येथे पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ एस. एन. दुबे रस्त्यावर एमएमआरडीए मार्फत मेट्रो प्रकल्प अंतर्गत पर्जन्य जलवाहिनीची सुरू असलेली कामे इत्यादींची डॉ. शिंदे यांनी पाहणी केली. (BMC)

पर्जन्य जलवाहिनीचे काम चार दिवसांत पूर्ण करा

नाल्यांशेजारी असलेल्या जुन्या भिंती पावसाळ्यानंतर दुरुस्त कराव्यात, जोरदार पावसाप्रसंगी भूयारी मार्गांच्या ठिकाणी पाणी पातळी वाढल्यास वाहतूक पोलिसांशी समन्वय ठेवून वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, रेल्वे प्रशासनाच्या हद्दीतील कल्वर्ट रेल्वेच्या यंत्रणेकडून योग्य रीतीने स्वच्छ करून घ्यावेत, असे निर्देश डॉ. शिंदे यांनी दिले. मेट्रो ९ अंतर्गत दहिसर मध्ये एस. एन. दुबे मार्गावर एमएमआरडीएमार्फत सुरू असलेले पर्जन्य जलवाहिनीचे काम चार दिवसात पूर्ण करण्याची सूचना ही त्यांनी एमएमआरडीए प्रशासनाला केली. (BMC)

उपायुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार, उपायुक्त (परिमंडळ ७) डॉ. भाग्यश्री कापसे, उपायुक्त (परिमंडळ ३) (अतिरिक्त कार्यभार) विश्वास मोटे, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) श्रीधर चौधरी, उपप्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) (पश्चिम उपनगरे) विभास आचरेकर आणि संबंधित अधिकारी या पाहणी प्रसंगी उपस्थित होते. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.