BMC : मुंबई महापालिका आणखी २५०० संगणकांची करणार खरेदी

मागील खरेदीच्या तुलनेत प्रति संगणक १२९० रुपये दर कमी

1675
BMC : मुंबई महापालिका आणखी २५०० संगणकांची करणार खरेदी
  • सचिन धानजी,मुंबई

मुंबई महापालिकेत (BMC) माहिती व तंत्रज्ञान विभागाच्यावतीने यापूर्वी २ हजार संगणकांची खरेदी करण्यात आल्यानंतर आता महापालिकेच्या विविध विभागांसाठी आणखी २५०० संगणकांची केली जाणार आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात प्रती संगणक तीन वर्षांच्या देखभाल दुरुस्तीसह ३४ हजार २५० रुपयांमध्ये खरेदी करण्यात आले होते. पण आता तीन महिन्यात आणखी अडीच हजार संगणक खरेदी केले जात असून त्यात प्रती संगणक ३२,९६० रुपयांमध्ये खरेदी केला जाणार आहे. म्हणजे मागील खरेदी पेक्षा प्रती संगणक १२९० रुपये कमी दर आकारला आहे. त्यामुळे मागील संगणक खरेदीच्या तुलनेत यंदाच्या खरेदीत महापालिकेचा तब्बल ३२ लाख २५ हजार रूपयांची बचत होणार आहे. (BMC)

केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या ई गव्हर्नन्स धोरणानुसार महाअपालिकेत विविध ई गव्हर्नन्स प्रकल्प राबवण्यात येत असून त्यामध्ये संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. ई गव्हर्नन्स प्रकल्पांमध्ये नवीन तंत्रज्ञान व नव कल्पना यांचा वापर करून कामकाजात वापर करण्यासाठी महापालिकेने आयटी व्हिजन २०२५ जाहिर केले आहे. त्यामुळे विविध विभाग, कार्यालये आदींची संगणकांची मागणी पूर्ण करण्यासाठी २ हजार ५०० संगणक खरेदी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने निविदा राबवली आहे. (BMC)

या निविदेत माहिती व तंत्रज्ञान विभागाने तीन वर्षांच्या देखभाल व दुरुस्ती सह ३४ हजार ७९८ प्रती संगणक दर निश्चित केला होता. त्यात ऑनलाईन टेक सपोर्ट आयटी सोल्यूशन या कंपनीने ३२ हजार ९६० रुपये या दरात एक संगणक देवू केला आहे. त्यामुळे या २५०० संगणक खरेदी करता विविध करांसह ९ कोटी ७२ लाख ३२ हजार खर्च केला जाणार आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२३ मध्ये दोन हजार संगणकांसाठी विविध करांसह ८ कोटी ०८ लाख ३० हजार रुपये खर्च केले होते. यासाठी मेसर्स इनमॅक कम्प्युटर्स या कंपनीची नेमणूक करण्यात आली होती. तीन वर्षांच्या हमी कालावधीसह या संगणकांची खरेदी केली होती आणि त्यासाठी प्रति संगणक ३४ हजार २५० रुपये खर्च केले गेले होते. (BMC)

(हेही वाचा – Aged Parents : दोन वेळेच्या जेवणासाठी आई-वडिलांचे पोटच्या मुलांविरोधात ७ लाख खटले)

महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांची बचत

महापालिकेच्या (BMC) विविध विभाग तसेच कार्यालयांना देण्यात आलेल्या संगणकांपैकी बरेच संगणक ५ वर्षापेक्षा जुने व कालबाह्य झाल्याने महापालिकेने विभागांच्या मागणीनुसार ३ हजार नवीन संगणक खरेदी करण्याचा निर्णय सप्टेंबर २०२२मध्ये घेतला होता. त्यानुसार मागवलेल्या निविदेमध्ये महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा एक टक्के अधिक दराने बोली लावत डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्यूशन्स लिमिटेड ही कंपनीने काम मिळवण्याचा प्रयत्न केला होता. पात्र ठरलेल्या या कंपनीकडून प्रति संगणक ८५ हजार ९०४ रुपये दराने एकूण २५ कोटी ४१ लाख रुपये किंमतीत तीन हजार संगणकांची खरेदी केली जाणार होती. त्यामुळे ५० ते ६० हजार रुपयांमध्ये उपलब्ध होणाऱ्या संगणकांची किंमत ८५ हजारांमध्ये खरेदी केल्याने याबाबत सर्वांचाच भुवया उंचावल्या गेल्या होत्या. (BMC)

या संगणक खरेदीच्या किंमतीबाबत भाजपाचे महापालिकेतील माजी पक्षनेते विनोद मिश्रा यांनी यांनी आक्षेप नोंदवला होता, त्यानंतर ही निविदा प्रक्रिया रद्द करून याची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती. या समितीने प्रत्येक विभागाने आपल्या मागणीनुसार विभाग तथा कार्यालयाच्या स्तरावर संगणकाची खरेदी करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर ऑक्टोबर २०२३ मध्ये दोन हजार संगणकांची खरेदी करण्यास मंजुरी मिळाली आणि त्यानुसार या संगणकांची खरेदी करण्यात आली. महापालिका माहिती व तंत्रज्ञान विभागाची धुरा अतिरिक्त आयुक्त आश्विन भिडे आणि संचालक (माहिती व तंत्रज्ञान विभाग) शरद उघडे यांच्याकडे असून जिथे महापालिका ८० ते ८५ हजारात एक संगणक खरेदी करायला निघाली होती, तिथे या संगणक खरेदीच्या प्रक्रियेत सूसुत्रता आणि ८० ते ८५ हजारांवरून थेट प्रति संगणक ३४ हजार रुपये आणि आता दर थेट सुमारे ३३ हजारांवर महापालिकेचे कोट्यवधी रुपयांची बचत केली आहे. त्यामुळे २०२२ च्या खरेदीच्या तुलनेत आता या संगणक खरेदीची दर चक्क निम्म्यावर आणून महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांची बचत केली आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.