Malabar Hill Reservoir : मलबार हिलच्या लोकांना पाणी नको, पण झाडे हवी!

207
Malabar Hill Reservoir Reconstruction : दक्षिण मुंबईकरांनो पाणी गाळून आणि उकळून प्या
Malabar Hill Reservoir Reconstruction : दक्षिण मुंबईकरांनो पाणी गाळून आणि उकळून प्या

सचिन धानजी

मलबार हिलमधील ब्रिटिशांच्या काळात केलेल्या जलवितरण प्रणालीचा भाग असलेल्या आणि ज्या ठिकाणच्या जलाशयातून कुलाबा ते ताडदेवपर्यंतच्या भागाला पाणीपुरवठा होतो, त्या मलबार हिल जलाशयाचे आयुर्मान संपले आहे. (Malabar Hill Reservoir) फिरोजशहा मेहता उद्यानातील मलबार हिल जलाशयातून दक्षिण मुंबईतील कुलाबा ते मुंबई सेंट्रलच्या भागातील जनतेला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी १४७.७८ दशलक्ष लिटर क्षमतेची ही साठवण टाकी आहे. ही साठवण टाकी १४० वर्षे जुनी आहे. त्यामुळे या जलाशयाचे स्ट्रक्चरल ऑडिट जुलै २०१७ मध्ये करण्यात आल्यानंतर तांत्रिक सल्लागार डी. डी. कुलकर्णी यांच्यासह आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांच्या मदतीने केलेल्या पाहणी अहवालामध्ये या जलाशयाचे आयुर्मान संपल्याने त्याची पुनर्बांधणी करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. (Malabar Hill Reservoir)

(हेही वाचा – Harbour Railway : आणखी पाच दिवसांचा रात्रकालीन मेगाब्लॉक)

एकूण पाच कप्पे असलेल्या जलाशयाच्या साठवण टाकीच्या बांधकामासाठी टोटल स्टेशन सर्वे झाल्यानंतर जुन्या मलबार हिल जलाशयाच्या पश्चिम दिशेलगत २३ दशलक्ष लिटर क्षमतेचा अतिरिक्त जलाशय बांधण्याचा आणि या भागातील पाण्याचा पुरवठा खंडित होऊ नये म्हणून १४ दशलक्ष लिटर क्षमतेची तात्पुरती साठवणुकीची टाकी बांधण्याचा निर्णय घेत डिसेंबर २०२१ मध्ये निविदा प्रक्रिया अंतिम केली. त्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये यासंबंधीच्या कंत्राटदाराची नियुक्तीही केली; परंतु आता दीड वर्षांनी या जलाशयाच्या कामात खो घालण्याचे काम स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि स्वत:ला पर्यावरणवादी म्हणणाऱ्या व्यक्तींकडून होत आहे. पर्यावरणासाठी नागरिक जागरुक आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. परंतु हे कामही महत्त्वाचे आहे. या अतिरिक्त जलाशयाच्या बांधकामांमध्ये साधारण ९०६ झाडे आहेत. त्यातील फक्त १८९ झाडे कापण्याची गरज असून २०० झाडे ही पुनर्रोपित करता येणारी आहेत. ५१७ झाडांना कुठल्याही प्रकारे हात लावला जाणार नाही. जे उपनगराचे पालकमंत्री आहेत तेच या विभागाचे आमदार आहेत. मग दीड वर्षांपूर्वी या प्रकल्पाचा आराखडा बनवला गेला, तेव्हा जर यात झाडे कापली जाणार हे माहीत होते, तर मग लोढा यांनी जनतेकडून तेव्हाच हरकती व सूचना जाणून घेत त्यांच्या समस्यांचे निराकरण का केले नाही? हा प्रश्न उपस्थित होतो. आज या प्रकल्पाच्या पंपिंग स्टेशनचे काम सुरू झाल्यानंतर प्रत्यक्षात टाकीचे बांधकाम करण्यासाठी जागा मोकळी करण्याचा प्रयत्न सुरू असताना हा विरोध होणे म्हणजे एक प्रकारे हे लोढा यांचे अपयश आहे. (Malabar Hill Reservoir)

प्रकल्प खर्चाच्या तुलनेत दहा पटीने खर्च होण्याची शक्यता

पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिका मुख्यालयात आजवर दोन वेळा या पर्यावरणवादी संस्थांसह व्यक्तींना निमंत्रित करून त्यांचे म्हणणे ऐकण्याचा प्रयत्न केला. त्यांचा या जलाशयाच्या बांधकामाला विरोध आहे. झाडे कापून या जलाशयाचे बांधकाम करू नये. त्यासाठी त्यांनी कोस्टल रोडच्या प्रकल्पातील मोकळी जागा, क्रॉस मैदान, स. का. पाटील उद्यान आदींचे पर्याय सुचवले; परंतु मलबार हिल जलाशयाचे बांधकाम ब्रिटिशांच्या काळात झाले तेव्हाच तेथून दक्षिण मुंबईतील विविध भागांमध्ये पाणीपुरवठ्यासाठीची जलवितरणाची प्रणाली बनवण्यात आली आहे. त्यामुळे अन्य ठिकाणी जलाशय बांधण्याचा विचारच होऊ शकत नाही. जर अन्य ठिकाणी जलाशय बांधण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी संपूर्ण जलवितरण प्रणालीच बदलावी लागेल. त्यानुसार मग सध्या होणाऱ्या सुमारे ७०० कोटी रुपयांच्या प्रकल्प खर्चाच्या तुलनेत दहा पटीने किंवा त्याहून अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. अशावेळी ३८९ झाडे वाचवण्यासाठी या प्रकल्पाचा खर्च वाढवायचा का?

मलबार हिल म्हणजे डोंगराचा भाग आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या ही झाडे निर्माण झाली आहेत. त्यामुळे पर्यावरणवाद्यांचा ही झाडे कापण्याला विरोध असेल, तर संपूर्ण दक्षिण मुंबईला जो पाणीपुरवठा होतो, तो होऊ द्यायचा नाही का? एक वेळ झाडे राहू द्या, पाणी नाही मिळाले तरी चालेल हेच यांचे म्हणणे आहे का? म्हणजे त्यांना पाण्याची गरज नाही आणि तसे जर असेल तर झाडे वाचवण्यासाठी एकप्रकारे पाण्याच्या नावाने लोकांचा जीव घेण्याचा हा प्रकार आहे.

ब्रिटिशांनी नियोजन करत हे जलाशय बनवले होते, पण आज दक्षिण मुंबईतील लोकसंख्या किती पटीने वाढली आहे. त्यातच मलबार हिलच्या परिसरात पाणी नाही आले की आयुक्तांनाही खुर्ची सोडत पळावे लागते. त्यामुळे आज आपल्याला पुरेसे पाणी मिळतेय म्हणून याला विरोध करण्याचा प्रयत्न जर ही मंडळी करत असतील तर या भागातील पाणीपुरवठा अन्य भागांमध्ये कधी तरी कमी दाबाने करून बघा. म्हणजे सर्वसामान्यांचे दु:ख त्यांना कळेल. (Malabar Hill Reservoir)

सामान्य माणसांनी काय करावे?

जे पर्याय हे पर्यावरणस्नेही सुचवत आहेत, त्याचा फायदा भविष्यात टॉवर आणि इमारतींमध्ये राहतात त्यांना होईल; कारण त्यांच्याकडे पाणी जमा करून ठेवण्यासाठी मोठ्या क्षमतेच्या साठवण टाक्या आहेत; पण गिरगाव, मोहम्मद अली रोड, नागपाडा, मुंबादेवी, ताडदेव, कुलाबा, फोर्ट, मुंबई सेंट्रल, चर्चगेट, ग्रँटरोड, मरिन लाईन्स आदी भागांमध्ये आजही जुन्या इमारती, चाळी आहेत. त्यांच्याकडे पाणी जमा करण्यासाठी साठवण टाक्या नाहीत. जे पाणी येते तेवढेच ते जमा करून ठेवतात. त्यामुळे या जुन्या चाळी आणि इमारतींमध्ये पाण्याची समस्या निर्माण होऊ शकेल असे काही निवृत्त जलअभियंत्यांचे म्हणणे आहे. म्हणजे ही उच्चभ्रू मंडळी केवळ स्वत:चाच विचार करत आहेत. मलबार हिलमधील जनतेने आधी लक्षात घ्यावे की, हा पाणीपुरवठा प्रकल्पाचा भाग आहे. आज पाणी नसेल तर आपण जिवंत राहू शकू का? एक वेळ आपल्याकडे पैसा आहे म्हणून आपण मिनरल वॉटर खरेदीही कराल, पण सामान्य माणसांनी काय करावे? बरे विकतचे पाणी प्यायला होईल, इतर वापराचे काय? त्यामुळे काही प्रकरणांमध्ये विरोधाला विरोध करण्याऐवजी महापालिकेला सहकार्य करणे हेच योग्य असते; परंतु कुणाच्या सांगण्यानुसार, आंदोलन करत प्रकल्पाला विरोध करणे हे मुंबईच्या विकासाला बाधा आणण्यासारखेच आहे. मुळात मलबार हिल जलाशय हे १४० वर्षांपूर्वी बांधले गेले आहे, म्हणजे त्यानंतरच त्या ठिकाणी लोकवस्ती आहे. मग आज जे मलबार हिल उभे आहे, त्यात किती झाडे कापली गेली आणि त्या झाडांचे बळी देत बंगले आणि इमारती उभ्या आहेत त्याचे काय? ही मंडळी जर खरंच पर्यावरणवादी असतील, तर झाडे कापून बांधलेल्या इमारतींमध्ये राहताना त्या इमारती तोडा आणि आधी झाडे लावा यासाठी ते आंदोलन करतील का? (Malabar Hill Reservoir)

आपली वाहने पार्क करता येत नाही म्हणून झाडांच्या फांद्या तोडायला लावणाऱ्या येथील जनतेने किमान पाण्याच्या मोठ्या प्रकल्पाला विरोध करून कोस्टल रोडप्रमाणे हसे करून घेऊ नये. कोस्टल रोड प्रकल्पामध्ये टाटा गार्डनच्या बाबतीत अशाच प्रकारे येथील स्थानिकांचा विरोध होता; परंतु डी विभागाचे तत्कालिन सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी येथील स्थानिकांची बैठक घेऊन या प्रकल्पाची माहिती करून दिली आणि हा प्रकल्प दक्षिण मुंबईसह संपूर्ण शहरासाठी कसा आवश्यक आहे तसेच पर्यावरणाचा विचार करून हा प्रकल्प साकारला जात आहे याची माहिती दिल्यानंतर त्यांचा विरोध मावळला होता. त्यामुळे या विभागाचे आमदार व उपनगराचे पालकमंत्री लोढा यांनी डी विभाग कार्यालयातच हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असता तर बरे झाले असते. (Malabar Hill Reservoir)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.