BMC : संपूर्ण स्वच्छता मोहिमेमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट 

229
Bmc : संपूर्ण स्वच्छता मोहिमेमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्गार
Bmc : संपूर्ण स्वच्छता मोहिमेमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्गार
संपूर्ण स्वच्छता मोहीम ही कोणतीही एक संस्था किंवा एकट्या शासनाची मोहीम नसून ही जनतेसाठी सुरु केलेली मोहीम आहे. (BMC) त्यामुळे या चळवळीत स्वयंसेवी संस्था, शाळकरी विद्यार्थी यांच्यासह समाजातील प्रत्येक व्यक्ती व घटकाने सहभागी व्हावे, त्यातून या स्वच्छता मोहिमेला लोकचळवळीचे बळ मिळायला हवे, असा मानस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी व्यक्त केला. स्वच्छता मोहिमेमुळे मुंबई महानगरातील हवेची गुणवत्ता सुधारली, हे या मोहिमेचे यश दाखवणारे प्रतीक आहे. आता मुंबईसोबतच ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी अशा मुंबई प्रदेशातील आसपासच्या शहरांमध्ये स्वच्छता मोहिमेला वेग दिला जात आहे. लवकरच राज्यभरात ही मोहीम विस्तारलेली असेल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी नमूद केले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या मुंबई किनारी रस्ता अर्थात मुंबई कोस्टल रोड प्रकल्पातील जुळा बोगद्याचे काम आता पूर्णत्वास आले आहे. या बोगद्याच्या कामांची पाहणी तसेच महानगरपालिकेच्या वतीने सुरु असलेल्या संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लिनिंग ड्राइव्ह) अंतर्गत कामांची पाहणी दौरा  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आज (दिनांक ७ जानेवारी २०२४)  केला, त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल,मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव तथा प्रधान सचिव (माहिती व जनसंपर्क) ब्रिजेश सिंह, अतिरिक्त महानगररपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सहपोलीस आयुक्त प्रदीप पडवळ, उप आयुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे, उप आयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) (अतिरिक्त कार्यभार) संजोग कबरे, यांच्यासह संबंधित सहायक आयुक्त, खातेप्रमुख आदी मान्यवर या दौऱयास उपस्थित होते.
संपूर्ण स्वच्छता मोहिमेचा एक भाग म्हणून नेताजी सुभाष मार्गावर (मरीन ड्राइव्ह) पदपथ स्वच्छता केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी स्थाानिक नागरिकांना संबोधित केले. या प्रसंगी ते म्हणाले की, मागील काही आठवड्यांपासून सातत्याने मुंबईमध्ये संपूर्ण स्वच्छता मोहीम म्हणजे डीप क्लिनिंग ड्राईव्ह टप्प्या-टप्प्याने व सातत्याने राबविण्यात येत आहे. एकाचवेळी मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी, कामगार तसेच स्थानिक नागरिक देखील या मोहिमेत सहभागी होतात. मोहिमेच्या निमित्ताने लहान-मोठे रस्ते, पदपथ, चौक यांच्यासह नाले, सार्वजनिक प्रसाधनगृहं आदी सर्व ठिकाणी स्वच्छता केली जाते. रस्ते धूळमुक्त करण्यासाठी पाण्याने धुण्यात येतात. तसेच राडारोडा (डेब्रीज) आणि ठिकठिकाणी साचलेला कचरा हटवण्यात येतो. त्याचा परिणाम म्हणजे सार्वजनिक स्वच्छतेमध्ये मोठी सुधारणा झाली आहे, विशेषतः मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारणा होण्यासाठी त्याचा फायदा झाला आहे.
रस्ते स्वच्छ धुतल्याने धूलिकण कमी होवून वायू गुणवत्ता सुधारली आहे. पाणी फवारणी करणाऱ्या मिस्ट मशिन्समुळे हवेतील धूली कणांचे प्रमाण कमी झाले आहे. मुंबईत काही ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांक ३५० वरुन आता २०० पेक्षा देखील कमी झाला आहे. पवई, बोरिवली यासारख्या अनेक ठिकाणी हा निर्देशांक १०० पेक्षा खाली आला आहे. वांद्रे-कुर्ला संकूल सारख्या परिसरांमध्ये वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी सांगितले. मुंबईतील मुख्य रस्त्यांसोबतच अंतर्गत रस्ते स्वच्छ करण्याच्या दृष्टिने प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला करतानाच नियमितपणे राबवलेल्या स्वच्छता मोहिमेचा अधिकाधिक चांगला परिणाम आगामी कालावधीत नक्कीच दिसून येईल, असा विश्वास देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
आजच्या दौऱ्याच्या प्रारंभी, मुख्यमंत्री महोदयांनी मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील दक्षिण दिशेला जाणाऱया भूमिगत बोगद्याची पाहणी केली. बोगद्यामध्ये वायूविजनाकरीता तसेच आग किंवा धूर अशा आपत्कालीन प्रसंगी मदतकारक ठरणारी, अतिशय अद्ययावत ‘सकार्डो वेंटिलेशन’ प्रणाली स्थापन करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बोगद्याची कामे अंतिम टप्प्यात असून ती सर्व दिनांक ३१ जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहेत. तर उत्तर दिशेने जाणाऱया बोगद्याची कामे मे २०२४ अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित आहे. हा बोगदा वाहतुकीसाठी खुला केल्याने वाहतुकीला जलद प्रवासाचा पर्याय मिळेल. मरीन ड्राईव्ह ते वरळी या सुमारे ११ किमी अंतराच्या किनारी रस्ता प्रकल्पामुळे नागरिकांच्या वेळेची आणि वाहनांच्या इंधनाचीही बचत शक्य होईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मुंबई पारबंदर अर्थात शिवडी ते न्हावा शेवा सागरी सेतू प्रकल्पाच्या ठिकाणी चांगली सेवा देण्याच्या उद्दिष्टाने टॅंकरद्वारे पाणी वापरून तो मार्ग देखील धूळमुक्त करण्याच्या सूचनाही दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमूद केले.
मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. मुंबईत स्वच्छतेची जबाबदारी असणाऱ्या स्वच्छता कामगारांच्या माध्यमातूनच मुंबई नगरी स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवणे शक्य आहे. कारण मुंबईतील स्वच्छता कर्मचारी हेच खरे मुंबईचे हिरो आहेत. या स्वच्छता कामगारांच्या ४८ निवासी वसाहतींमध्ये चांगल्या नागरी सेवा-सुविधा देण्यासाठीचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, वाचनालय, प्रसाधनगृह यासारख्या चांगल्या सुविधा स्वच्छता कामगारांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच मुंबई स्वच्छ ठेवणाऱ्या स्वच्छता कामगारांच्या हिताची काळजी शासन आणि प्रशासन घेईल. तर कर्मचाऱयांनी मुंबईसाठी अधिकाधिक चांगले योगदान द्यावे, असे आवाहन देखील मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी केले.
मरीन ड्राईव्हची नियमित स्वच्छता करा- 
मरीन ड्राईव्हला दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक ‘मॉर्निंग वॉक’ साठी येतात. मरीन ड्राईव्हचा परिसर तसेच सुमारे तीन किलोमीटर अंतराचा पदपथ हा नियमितपणे स्वच्छ आणि धूळमुक्त ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिले. त्यावर, प्रत्येक दिवसाआड हा पदपथ स्वच्छ केला जाईल,  आवश्यक संख्येने टॅंकर तैनात करुन, पाण्याने रस्ता व पदपथ धुवून हा परिसर नियमितपणे स्वच्छ करण्यात येईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह यांनी मुख्यमंत्री महोदयांना सांगितले.
दरम्यान, सकाळी मरीन ड्राइव्ह येथील पदपथ व रस्ता स्वच्छता कामांमध्ये सहभाग घेतला, त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी दुपारी पुन्हा या परिसराला भेट देवून पाहणी करणार असल्याचे जाहीर संबोधनातून सांगितले होते. त्यानुसार, नवी मुंबई येथून मुंबईत परतल्यानंतर, मुख्यमंत्री महोदयांनी पुन्हा मरीन ड्राइव्ह येथे भेट देवून स्वच्छता कामे पूर्ण झाल्याची प्रत्यक्ष भेटीतून खातरजमा केली. याप्रसंगी मरीन ड्राइव्ह वर आलेल्या पर्यटकांशी त्यांनी संवाद साधला. पर्यटक व स्थानिक नागरिकांनी मुख्यमंत्री महोदयांसमवेत सेल्फी देखील काढले.
आजच्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आज प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलाजवळील मुंबई किनारी रस्ता (कोस्टल रोड) प्रकल्प स्थळ,  मरीन ड्राईव्ह, बी विभागातील तुकाराम मार्ग येथे स्वच्छता कामांमध्ये सहभाग घेतला. जागोजागी त्यांनी शाळकरी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी मुंबई पारबंदर प्रकल्प येथे रस्ते स्वच्छ मोहिमेत सहभाग घेतला.
हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.