
-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील शीव (सायन) व बेलासिस उड्डाणपुलांच्या कामांना वेग मिळत असून, ही कामे गतीने आणि नियोजनबद्ध रितीने पूर्ण करण्यावर भर द्यावा. रेल्वे प्रशासनासह समन्वय साधत कामांचे सुयोग्य नियोजन करावे. महानगराच्या दळणवळण व्यवस्थेत या पुलांचा मोलाचा वाटा असून, नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे. सर्व कामे निर्धारित मुदतीत पूर्ण होतील, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. १५ डिसेंबर २०२५ पर्यंत बेलासिस आणि ३१ मे २०२६ पर्यंत शीव (सायन) उड्डाणपुलाची कामे पूर्ण झाली पाहिजेत, अशी ठोस कालमर्यादा देखील बांगर यांनी निश्चित केली आहे. (BMC)
शीव पूर्व – पश्चिम भागांना जोडणारा शीव (सायन) उड्डाणपूल आणि ताडदेव ते नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणारा बेलासिस उड्डाणपूल या दोन्ही रेल्वे उड्डाणपुलांच्या पुनर्बांधणीचे काम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी या दोन्ही प्रकल्प कार्यस्थळास सोमवारी २३ जून २०२५ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन प्रगतीचा स्वतंत्रपणे आढावा घेतला. तसेच, २४ जून २०२५ मुंबई महानगरपालिका मुख्यालयात बैठक घेत विविध निर्देश दिले. पोलीस सह आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे, डी विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते, महानगरपालिकेचे प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता (शहर) राजेश मुळे यांच्यासह मध्य रेल्वेचे उप मुख्य अभियंता (निर्माण) रोहित मेहला, सहायक अभियंता (निर्माण) व्ही. व्ही सतिशन यांच्यासह संबंधित अभियंते उपस्थित होते. (BMC)
(हेही वाचा – CM Devendra Fadnavis यांनी थेट आकडेवारी देत राहुल गांधींचा दावा खोडला; म्हणाले, ‘झूठ बोले कौवा काटे…’)
शीव पुलाचे बांधकाम ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित
अभिजीत बांगर म्हणाले की, शीव पुलाच्या दक्षिण बाजूकडील पादचारी पुलाचे काम रेल्वे विभागामार्फत सुरू असून ते ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण केले जाईल. त्यानंतर म्हणजे, ३१ ऑगस्ट २०२५ नंतर मुख्य पुलाच्या दक्षिणेकडील भागाच्या तोडकामास सुरूवात केली जाईल. त्याचवेळी पुलाखालील जुन्या पुलाच्या भिंतीचे तोडकामही सुरू केले जाईल. नोव्हेंबर महिन्यात उत्तर भागातील तर, जानेवारी महिन्यात दक्षिण भागातील तुळ्या स्थापित करण्यात येतील. त्यानंतर रेल्चे हद्दीतील इतर कामे पूर्ण केली जातील. पोहोच मार्गापैकी पश्चिमेकडील पोहोच मार्ग अधिक महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा आहे. पैकी लाल बहादूर शास्त्री मार्गावरील भुयारी मार्ग पूर्णत्वास आला आहे. त्या पोहोच मार्गाचे काम प्राधान्याने पूर्ण केले जाईल. १ ऑक्टोबर २०२५ पासून दुसऱ्या भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात येईल. धारावी आणि लाल बहादूर शास्त्री मार्गाकडे जाणाऱ्या पोहोच रस्त्यांची कामे मार्च २०२६ पर्यंत पूर्ण केली जातील. रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे हद्दीतील कामे १५ मे २०२६ पर्यंत पूर्ण करून संपूर्ण पोहोच मार्ग महानगरपालिकेस उपलब्ध करून दिला जाईल. पूर्वेकडील उर्वरित पोहोच मार्गाचे काम १५ दिवसांत पूर्ण करून शीव उड्डाणपूल दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत, असेही बांगर यांनी नमूद केले. (BMC)
(हेही वाचा – West Bengal सरकारने मोडली हिंदूंची ६०० वर्षांपूर्वीची परंपरा; रथयात्रेतील मेळ्याला नाकारली परवानगी)
बोलासिस पुलाचे बांधकाम १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार
अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर पुढे म्हणाले की, बेलासिस पूल प्रकल्प पूर्णत्वाचा कालावधी एप्रिल २०२६ पर्यंत आहे. मात्र, बेलासिस पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करून डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत वाहतुकीस खुला करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पूल बांधकामास अडथळा ठरणारी १३ बांधकामे हटविण्यासाठी पर्यायी घरांचे वाटप करण्यात आले आहे. बांधकामे हटविण्यासंदर्भातील कार्यवाही विभागीय कार्यालयामार्फत सुरू आहे. पुलानजीकच्या एका गृहनिर्माण संस्थेची सीमाभिंत बाधित होत असून ती मोकळी जागा रस्त्यासाठी आवश्यक आहे. ती जागा उपलब्ध उपलब्ध करून देण्याची कार्यवाही विभागीय कार्यालयामार्फत केली जाणार आहे. रेल्वेच्या तुळ्या येण्यासाठी नियोजनापेक्षा काही प्रमाणात विलंब झाला आहे. सद्स्थितीत लोखंडी तुळ्या प्रकल्पस्थळी आल्या आहेत. ३६ मीटर स्पॅनच्या एकूण १२ तुळ्या स्थापित करावयाच्या आहेत. रेल्वे विभागाकडून खंड मिळाल्यानंतर दोन रात्रींमध्ये प्रत्येकी ६ तुळया स्थापित करण्याची कार्यवाही केली जाईल. तुळया येणे, त्यांची जुळवाजुळव आणि स्थापित करणे आदी कामे १० ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर पश्चिम दिशेच्या पोहोच मार्गातील राहिलेल्या एका खांबाचे काम सुरू करण्यात येईल. १४ सप्टेंबर २०२५ पर्यंत रेल्वे भागातील काँक्रिट टाकण्याच्या कामासह इतर सर्व कामे पूर्ण केली जातील. त्यानंतर, दोन्ही पोहोच मार्गांची कामे हाती घेऊन एकंदरीत १५ डिसेंबर २०२५ पर्यंत पुलाचे संपूर्ण काम पूर्ण होईल, असे नियोजन आहे, असे अभिजीत बांगर यांनी नमूद केले. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
