BMC : मुंबईतील पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवणार ४७७ पंप

मुंबईत जेव्हा ताशी ५५ मिमी पेक्षा अधिक पाऊस पडतो तसेच समुद्राला या काळात भरती असते, अशावेळी सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असते.

118

पावसाळ्याच्या दिवसांत मुंबईतील सखल भागांमध्ये पूरसदृश्यस्थिती निर्माण होत असल्याने या पाणी साचणाऱ्या ठिकाणी उपसा करणारे एकूण ४७७ पंप मुंबई शहर तसेच उपनगरांमध्ये लावण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईतील पाणी तुंबण्याचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी होणार असल्याचा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

मुंबईत जोरदार पावसाने सखल भागात पाणी साचण्याच्या ठिकाणी  नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाणी उपसा करणारे पंप लावण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिले होते. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पाणी साचणाऱ्या विविध ठिकाणी मिळून ४७७ पंप लावण्याचे काम पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत पूर्ण झाले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाने शहरात विविध कामे मोठ्या स्वरुपात व आव्हानात्मक हाती घेतली होती व ती आता पूर्णही केली आहेत. मुंबईतील नागरिकांना पावसाळ्याच्या कालावधीत दैनंदिन कामांमध्ये तसेच जीवनमानामध्ये कोणताही अडथळा येऊ नये, या उद्देशाने ही कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या सर्व कामांचा परिणाम येत्या पावसाळ्याच्या कालावधीत मुंबईकरांना परिणामकारक स्वरुपात दिसून येईल, असे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी सांगितले.

मुंबईत जेव्हा ताशी ५५ मिमी पेक्षा अधिक पाऊस पडतो तसेच समुद्राला या काळात भरती असते, अशावेळी सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असते. तसेच या पंपाच्या ठिकाणी ऑपरेटर आणि मदतनीस असे मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे. त्यासोबतच पंप गरजेच्या काळात योग्यरीत्या सुरू राहील, याची जबाबदारीही समन्वय अधिकारी म्हणून विभागातील सहायक अभियंत्यावर निश्चित करण्यात आली आहे. तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याच्या सूचनाही वरिष्ठ प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. सखल भागात २४ तास पंप सज्ज राहतील, ही सुध्दा जबाबदारी समन्वय अधिकाऱ्यांवर असणार आहे.

(हेही वाचा BMC : मेहता उद्यान आणि कमला नेहरू पार्कमध्ये म्हातारीचा बुटच नाही तर ‘हे’ असणार आकर्षण…)

मुंबईत गरजेनुसार पंप वेळेत सुरू होतील आणि योग्य पद्धतीने कार्यरत राहतील यासाठीची जबाबदारी विभागीय पातळीवर निश्चित करण्यात आली आहे. तर समन्वय अधिकारी हे आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातील समन्वयकाकडे या पंपच्या कामगिरीची माहिती वेळोवेळी देणार आहेत. त्यामुळे अतिवृष्टीच्या काळात पंपांनी किती तास पाणी उपसा केला यावर लक्ष ठेवणे देखील शक्य होणार आहे, असे उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी सांगितले.

पाणी उपसा करणारे पंप कोणत्या भागात?

मुंबईतील सखल भागात पाणी उपसा करणाऱ्या पंपांमध्ये शहर भागात एकूण १८७ पंप आहेत. पश्चिम उपनगरामध्ये एकूण १६६ पंप आणि पूर्व उपनगरामध्ये एकूण १२४ पंप आहेत. शहर भागात अ विभागात सर्वाधिक २५ पंप आहेत. तर पश्चिम उपनगरात एफ दक्षिण विभागात ३२, एफ पूर्व विभागात ४७ पंप आहेत. तर पश्चिम उपनगरामध्ये एच पूर्व विभागात ५५ पंप आणि एच पश्चिम विभागात २४ पंप आहेत. तर पूर्व उपनगरात विभागात ४८ पंप आणि एम पश्चिम विभागात २१ पंप आहेत.

याठिकाणी लावले पंप

कुलाबा गीता नगर, ओएनजीसी यलो गेट, गोल देऊळ (ग्रॅंट रोड), नाना चौक, हॅंकॉक ब्रीज, जिजामाता उद्यान (भायखळा), एअर फोर्स स्टेशन (कॉटन ग्रीन), सरदार हॉटेल (चिंचपोकळी), जिजामाता नगर (अभ्युदय नगर), परळ पूर्व स्टेशन बाहेर, टाटा मिल कंपाऊंड (परळ), शिंदेवाडी कोर्ट (दादर), हिंदमाता उड्डाणपूलाच्या खालील बाजुला, सेंट झेव्हीयर्स उद्यान (परळ), प्रतिक्षा नगर (सायन), वडाळा अग्निशमन केंदग्र (एंटॉप हिल), दादर टी.टी. बेस्ट वर्कशॉप, भरणी नाका (वडाळा), करी रोड रेल्वे कल्वर्ट, महालक्ष्मी कल्वर्ट, धारावी कोळीवाडा, खार भूयारी मार्ग, साहित्य सहवास (कलानगर), चमडावाडी नाला (वांद्रे), बीकेसी मेट्रो स्टेशन (वांद्रे), गोळीबार आऊटफॉल (हंसबर्ग जंक्शन), विद्यानगरी मेट्रो स्टेशन (कलिना), एअर इंडिया रोड (सांताक्रूझ), भाभा हॉस्पिटल (वांद्रे), मिलन  भूयारी मार्ग, जोगेश्वरी  भूयारी मार्ग, खार  भूयारी मार्ग, टीचर्स कॉलनी (अंधेरी), मोतीलाल नगर (गोरेगाव), मालाड भूयारी मार्ग, पोयसर  भूयारी मार्ग, नॅन्सी कॉलनी, शिंपोली (बोरिवली), दहिसर सबवे, काजुपाडा पाईपलाईन (कुर्ला), कुर्ला स्थानक, टिळक नगर स्थानक, देवनार पशुवधनगृह, पोस्टल कॉलनी (चेंबूर), पंत नगर( घाटकोपर), विद्याविहार स्टेशन, नाहूर रेल्वे स्थानक, हरियाली व्हिलेज (विक्रोळी), केईएम रूग्णालय (परळ), लोकमान्य टिळक रूग्णालय कर्मचारी वसाहत (सायन).

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.