- मुंबई प्रतिनिधी
मुंबईने २८ ऑक्टोबर रोजी पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे वळण घेतले असून तब्बल १५७ इलेक्ट्रिक बसेस (Electric Bus) बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (Best)च्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. यामुळे सुमारे तीन लाख प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त होणार आहे. या उपक्रमामुळे मुंबईचे आकाश स्वच्छ, आणि रस्ते हरित ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करणार असल्याची ग्वाही मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली. (BEST Bus)
कुलाबा(Colaba) येथे पार पडलेल्या बेस्टच्या या पर्यावरण स्नेही इलेक्ट्रिक बस लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री आशिष शेलार, मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, सोनिया शेट्टी यांच्यासह बेस्टचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (BEST Bus)
“मुंबईत एकेकाळी ट्राम आणि बग्ग्या धावत होत्या, आज त्या ठिकाणी वातानुकूलित आणि पर्यावरण स्नेही इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व बसेस पर्यावरणपूरक बनवण्याचा आमचा संकल्प आहे. हे केवळ वाहतुकीतील सुधारणा नसून मुंबईच्या विकासाचे हरित वळण असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले, “महायुती सरकार म्हणजे गतिमान सरकार. कुलाब्यातील लोकार्पणा बरोबरच गोरेगाव येथील बसेसचे उद्घाटनही ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. हा फक्त कार्यक्रम नाही, तर वचनपूर्तीचा सोहळा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा – Himachal Pradesh : हिम बिबट्यांची वाढती संख्या; वन्यजीव सर्वेक्षणानुसार संवर्धनाची यशोगाथा)
“पूर्वीच्या सरकारच्या काळात बेस्ट सेवा डबघाईला आली होती, पण महायुती सरकार आल्यावर बेस्टला पुन्हा नवसंजीवनी मिळाली. आधीच्या सरकारने बेस्टला वेस्ट केले, मात्र आम्ही ३ हजार ४०० कोटी रुपये निधी दिला असून यंदा आणखी १ हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
मुंबई महापालिकेचे (BMC) सातत्याने सहकार्य बेस्टला मिळत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आम्ही फक्त कार्यालयात नाही तर रस्त्यावर उतरून काम करतो. महायुती सरकारने मुंबईचा विकास वेगाने पुढे नेण्याचा निर्धार केला आहे.”
ते पुढे म्हणाले, “इलेक्ट्रिक बसेसच्या माध्यमातून प्रदूषणाला आळा बसणार आहे. ही फक्त सुरुवात असून, लवकरच आणखी मोठ्या प्रमाणावर पर्यावरण स्नेही वाहतूक सुविधा निर्माण केल्या जातील. ‘मुंबई वन ॲप’मुळे प्रवाशांना बसचे लाईव्ह लोकेशन, एकाच तिकिटावर विविध सेवा, तसेच दिव्यांग प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध होतील.” (BEST Bus)
“सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नेहमीच नफ्याची नसते, पण ती जनतेच्या सोयीसाठी उत्कृष्ट आणि सुरक्षित बनवणे हेच सरकारचे उद्दिष्ट असल्याने यंदा बेस्ट कर्मचाऱ्यांना महापालिके इतकाच दिवाळी बोनस देण्यात आला आहे.” याकडेही त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. (BEST Bus)
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून जगभरातील लोक येथे येतात. त्यामुळे शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणे आवश्यक आहे, असे सांगतानाच, “मुंबईत काँक्रीट रस्त्यांचे दोन फेज पूर्ण होत आहेत आणि पुढील दीड वर्षांत मुंबई खड्डेमुक्त होईल,” असा ठाम दावा ही त्यांनी यावेळी केला. मात्र त्याचवेळी “मुंबईला विकासाचे मारेकरी नव्हे तर विकासाचे वारकरी हवेत. म्हणूनच आम्ही मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत.” अशा शब्दांत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनाही अप्रत्यक्षपणे टोला लगावला. (BEST Bus)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

