कोरोनाचा कुठलाही येऊ दे अवतार, बेस्ट कर्मचारी सुरक्षितच राहणार

117

कोरोना काळात देशभरात लॉकडाऊन असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपले कर्तव्य बजावत होते. मुंबईतील बेस्ट कर्मचारी सुद्धा या काळात प्रामाणिकपणे सेवा देत होते. या काळात अनेक बेस्ट कर्मचा-यांना कोरोनाची लागण सुद्धा झाली होती. पण नुकत्याच करण्यात आलेल्या सेरो सर्वेक्षणानुसार 100 टक्के बेस्ट कर्मचा-यांमध्ये कोरोनाशी प्रतिकार करण्यासाठी अँटिबॉडीज विकसित झाल्याचे आढळून आले आहे.

बेस्ट कर्मचा-यांमध्ये अँटिबॉडीज विकसित

मुंबईत कोरोनाचा नवा विषाणू प्रकार आढळून आल्यामुळे, नागरिकांमध्ये कोरोनाशी प्रतिकार करणा-या अँटिबॉडीज किती प्रमाणात आहेत, हे तपासण्यासाठी सेरो सर्वेक्षण करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेकडून नायर रुग्णालयात या सर्वेक्षणांतर्गत चाचण्या करण्यात येत आहेत. यासाठी अत्यावश्यक सेवेतील जवळपास तीन हजार कर्मचा-यांचे नमुने घेण्यात आले. यामध्ये 776 बेस्ट कर्मचा-यांचा समावेश होता. या सर्व बेस्ट कर्मचा-यांमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी पुरेशा अँटिबॉडीज विकसित झाल्याचे आढळून आले आहे.

(हेही वाचाः मोदींकडून सरकारी कर्मचा-यांना आणखी एक खूशखबर)

गंभीर लक्षणे असलेले कर्मचारी सुरक्षित

या सर्व कर्मचा-यांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. इतकंच नाही तर बेस्टच्या ज्या कर्मचा-यांमध्ये कोविडची गंभीर लक्षणे आढळून आली, त्यांच्यामध्ये अँटिबॉडीज जास्त असल्याचे या सर्वेक्षणात समोर आले आहे. 128 कर्मचा-यांना कोरोनाच्या तिस-या लाटेत पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाला होता, त्यांच्यामध्येही पुरेशा अँटिबॉडीज विकसित झाल्या आहेत. दीर्घकालीन आजार असलेल्या सुमारे 24 टक्के म्हणजेच 192 कर्मचा-यांमध्ये देखील या अँटिबॉडीज विकसित झाल्याचे बेस्टचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार सिंघल यांनी सांगितले.

(हेही वाचाः या कारणामुळे हापूसची निर्यात कमी होणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.