धारावी प्रकल्पाशी निगडीत ४५ एकर रेल्वेची जागा लवकरच राज्य सरकारला हस्तांतरीत

91

रेल्वेची सुमारे ४५ एकर जागा हस्तांतरित न झाल्याने रखडलेल्या धारावी पुनर्विकासाला आता गती मिळणार आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी दिलेल्या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत, महिन्याभरात रेल्वेची जागा राज्य सरकारला हस्तांतरित करण्याची ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावतीने देण्यात आली आहे. या प्रकरणी पाठपुरावा करणाऱ्या खासदार शेवाळे यांनी ही माहिती दिली आहे. या भेटीच्या वेळी खासदार राहुल शेवाळे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते.

( हेही वाचा : BMC Election : महापालिका निवडणूक प्रभाग आरक्षण लॉटरी सोडत जाहीर; कोणाच्या प्रभागाचे काय आरक्षण जाणून घ्या)

रेल्वेच्या जागेतील कुटुंबांचे पुनर्वसन व्हावे अशी मागणी

रेल्वेच्या हद्दीतील अनेक जागांवर मोठ्याप्रमाणात झोपडपट्ट्या वसलेल्या असून यासर्व झोपडपट्टया शासकीय नियमानुसार पात्र आहेत. मात्र शासकीय नियमानुसार अधिकृत असलेल्या झोपडीधारकांचे पुनर्वसन रेल्वेच्या जागांच्या पुनर्विकासाअभावी होत नाही. परिणामी सर्व रेल्वेच्या जमिनींवरील बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर सर्व खासदारांच्या शिष्टमंडळाने यापूर्वी रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन रेल्वेच्या जागेतील कुटुंबांचे पुनर्वसन व्हावे अशी मागणी केली होती, तसेच रेल्वेच्या जागांवर शासकीय गृहनिर्माण प्रकल्पांना उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी

आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्विकासासाठी रेल्वेची सुमारे ४५ एकर जागा राज्य सरकारला हस्तांतरित केली जाणार होती. त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने रेल्वेला सुमारे ८०० कोटी रुपयांचा निधीही देण्यात आला. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ही हस्तांतरण प्रक्रिया रखडल्याने धारावी पुर्विकास प्रकल्पाला ब्रेक लागला होता. याविषयी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या दक्षिण मध्य मुंबईचे लोकसभा मतदार संघाचे खासदार राहुल शेवाळे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन यावर त्वरित तोडगा काढण्याची विनंती केली. यावेळी महिन्याभरात रेल्वेची जागा राज्य सरकारला हस्तांतरित केली जाईल अशी ग्वाही रेल्वेमंत्र्यांनी दिली असल्याचे खासदार राहुल शेवाळे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.