…तर ‘लालपरी’चे प्रवासी दुरावणार!

96

गेल्या 20-22 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असून अद्याप कर्मचारी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे, या मागणीवर ठाम आहेत. तर एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मिटवण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात 41 टक्क्यांची वाढ होणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर देखील कर्मचाऱ्यांना संप मागे न घेता कामावर रूजू होण्यास नकार दिला. त्यामुळे महामंडळाकडून कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईमुळे आत्तापर्यंत 8 हजार 195 कर्मचारी निलंबित झाले. बऱ्याच दिवसांपासून असलेल्या या संपामुळे एसटी महामंडळाचे आतापर्यंत 439 कोटी 8 लाखांचे नुकसान झाले. यासह एसटीचा संप असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. त्यामुळे नियमित प्रवासीसंख्येतही मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच एसटीची सेवा सुरू झाली नाही तर, एसटीपासून प्रवासी दुरावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोरोनात महामंडळाला आर्थिक फटका

कोरोना महामारी दरम्यान, सगळं ठप्प असताना बराच प्रवाशी वर्ग एसटी बसने प्रवास करत होते. इतकेच नाही तर मुंबई सारख्या शहरात मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असणाऱ्या रेल्वेची वाहतूक सेवा पूर्णतः कोलमडली होती. तेव्हा एसटी ही मुंबईकरांच्या मदतीला धावून आली होती. दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावापूर्वी राज्यभरात एसटीतून रोज 65 लाख नागरिक प्रवास करत होते. त्यातून महामंडळाला रोज 22 कोटींचे उत्पन्न मिळत होते. मात्र कोरोना काळात ते 10 ते 11 कोटींवर आले. त्यामुळे एसटी महामंडळाला आर्थिक फटका बसला.

(हेही वाचा- लसवंत असाल तरच आता रिक्षा-टॅक्सीत मिळणार एन्ट्री!)

…तर लालपरीवरील संकट गडद होणार

कोरोनाचे निर्बंध शिथील होताच पुन्हा जोमाने एसटी धावेल, असे संकेत असतानाच ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आणि एसटीची वाहतूकीला ब्रेक लागला. यामुळे एसटीच्या उत्पन्नात आणि प्रवासीसंख्येत पुन्हा घट झाली आहे. एसटीची प्रवासी वाहतूक सेवा आणि मालवाहतूक बंद असल्याने महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे न घेतल्यास लालपरीवरील संकट अधिक गडद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.