मुंबईत ‘इतके’ नागरिक घाबरले दुसऱ्या डोसला!

६० टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले.

64

मुंबईतील कोविड-१९ विषाणूच्या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या लसीकरणाला चांगल्याप्रकारे प्रतिसाद मिळत आहे. मात्र, मुंबईमध्ये पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसमधील कालावधी संपुष्टात आला तरीही काही नागरिक दुसरा डोस घेण्यास तयार नाहीत. मुंबईत अशाप्रकारे तब्बल ३ लाख लोकांनी कालावधी लोटल्यानंतरही दुसरा डोस घेतला नसल्याची बाब समोर आली असून महापालिकेने याची यादी बनवून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

६० टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले!

मंबईत ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ९१ लाख १५ हजार ६०८ लोकांनी पहिला डोस घेतला, तर ५५ लाख ६४ हजार १६५ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. मुंबईत १८ वर्षांवरील ९२ लाख ३६ हजार ५० लोकांचे लसीकरण होणे अपेक्षित आहे. मात्र, आतापर्यंत पहिला डोस हा जवळपास ९९ टक्के लोकांनी घेतला आहे, तर ६० टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र, मुंबईमध्ये कोविशिल्डच्या पहिल्या डोसनंतर ८४ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो, तर कोव्हॅक्सिनच्या पहिल्या डोसनंतर दुसरा डोस हा २८ दिवसांनी घ्यावा लागतो. त्यामुळे पहिला डोस घेतलेल्या लोकांपैकी सुमारे ३ लाख लोकांचा पहिल्या व दुसऱ्या डोसमधील कालावधी लोटून गेला तरीही त्यांनी दुसरा डोस घेतलेला नाही. त्यामुळे तब्बल ३ लाखांहून अधिक लोकांनी कालावधी लोटून गेल्यानंतर दुसरा डोस घेतला नसल्याची माहिती समोर आली आहे.

(हेही वाचा : शिवाजी पार्कात दिवाळीनिमित्ताने ईदच्या शुभेच्छा!)

फोनवरून संपर्क साधला जाणार

यासंदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना विचारले असता त्यांनी अशाप्रकारे ३ लाख लोकांची दुसऱ्या डोस करता यादी तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे २४ विभाग कार्यालयांमधून यादी तयार करण्यात आली आहे. त्यांचा निवासी पत्ता नसल्याने त्यांच्याकडील मोबाईल क्रमांकाच्या आधारे त्यांच्याशी विभाग कार्यालयांमार्फत संपर्क साधण्यात येत आहे. यामध्ये काही जणांनी जर दुसरा डोस मुंबई बाहेर घेतला असेल, तर त्यांचे नाव यादीतून काढून टाकण्यात येईल. मात्र, याबरोबरच संपूर्ण लसीकरण झालेल्या सोसायटींची माहिती संकलित करताना जर कुणी लस घ्यायचा राहिल्यास त्यांना लस देण्याचाही प्रयत्न होत आहे. यामाध्यमातूनही त्यांचा शोध सुरु आहे. याशिवाय आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून झोपडपट्टयांमधूनही लसीकरण न झालेल्यांचाही शोध घेण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.