Lok Sabha Election 2024 : छत्रपती संभाजी महाराजांच्या मालिकेशिवाय जिंकतील का डॉ. अमोल कोल्हे?

शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात फूट पडल्याने मत विभागणी होणार आहे, मात्र महायुतीचे उमेदवार आढळराव यांना भाजपाचे एक गठ्ठा मते मिळणार आहेत. त्यामुळे या ठिकाणची लढत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

107
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024)  पार्श्वभूमीवर बारामती लोकसभेचा आढावा घेतला, तेव्हा तिथे विजय शिवतारे यांच्यामुळे पवार कुटुंबातील सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोन्ही उमेदवारांची धाकधूक वाढल्याचे दिसून येत आहे. शिरूर मतदार संघातही लोकसभेची निवडणूक रंगणार आहे. येथील निवडणूकही रंगतदार होणार आहे.

२०१९ मध्ये वंचितच्या उमेदवारामुळे आढळरावांचा पराभव 

शिरूर मतदार संघातून (Lok Sabha Election 2024) यंदा महविकास आघाडीने सीटिंग खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित केली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून कोल्हे निवडणूक लढवणार आहेत, तर महायुतीकडून ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडण्यात आली असून येथून अजित पवार यांनी दिलीप मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे येथून शिंदे गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यांचा 26 मार्च रोजी अजित पवार गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे. 2019 च्या निवडणुकीत या ठिकाणी डॉ. कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील अशीच लढत झाली होती. त्यावेळी डॉ. कोल्हे यांना 6 लाख 35 हजार 830 मते मिळाली होती तर आढळराव पाटलांना 5 लाख 77 हजार 347 मते मिळाली होती. म्हणजे 58 हजार 483 मतांनी डॉ. कोल्हे यांनी आढळराव यांचा पराभव केला होता. विशेष म्हणजे या ठिकाणी वंचितच्या राहुल ओहळ यांना 38 हजार 76 मते मिळाली होती, याचा अर्थ आढळराव यांच्या परभवामध्ये वंचित बऱ्यापैकी कारणीभूत होता.

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमुळे डॉ. कोल्हे झालेले विजयी 

या निवडणुकीत डॉ. कोल्हे जायंट किलर ठरले, कारण आढळराव मागील २ टर्म येथील खासदार म्हणून निवडून आले होते. तरीही आढळराव पराभूत का झाले? याला कारण होती झी मराठी वाहिनीवरील छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका, ज्या माध्यमातून डॉ. कोल्हे हे संभाजी महाराज म्हणून घराघरात पोहचले होते, त्यांच्या लोकप्रियतेचा शरद पवारांनी फायदा घेत त्यांना उमेदवारी दिली. पण यंदा चित्र वेगळे आहे. या वेळी निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) डॉ. कोल्हे यांना मतदारांसमोर संभाजी महाराज म्हणून नव्हे तर डॉ. अमोल कोल्हे म्हणून सामोरे जावे लागणार आहे.

यंदाची निवडणूक डॉ. कोल्हेंना सोपी नाही 

मागील ५ वर्षांत कोल्हे मतदार संघात दिसलेच नाही, अशा भावना मतदारांच्या आहेत. त्यामुळे यंदा (Lok Sabha Election 2024) त्यांना मते देताना मतदार त्यांनी केलेल्या कामांचा आढावा घेतील, ज्यात राज्यात बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात म्हणून डॉ. कोल्हे यांनी संसदेत केलेला पाठपुरावा इतकेच मतदारांना स्मरणात आहे. या उलट आढळराव पाटील कायम मतदारांच्या संपर्कात राहिलेले आहेत, त्यांनी मतदारांशी संपर्क तोडला नाही. त्यामुळे मतदार आढळराव पाटलांशी डॉ. कोल्हे यांची तुलना करण्यास तयार नाहीत. यात आणखी एक बाब म्हणजे याही वेळी वंचित स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे, अशा वेळी वंचितच्या मतांचा फटका कुणाला बसतो, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. तसेच यावेळी (Lok Sabha Election 2024) शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात फूट पडल्याने मत विभागणी होणार आहे, मात्र महायुतीचे उमेदवार आढळराव यांना भाजपाचे एक गठ्ठा मते मिळणार आहेत. त्यामुळे या ठिकाणची लढत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.  तरी यंदा डॉ. कोल्हे यांच्या मदतीला छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका मदतीला नसणार आहे, हे इथे आवर्जून नमूद करणे आवश्यक आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.