शिवसेना कुणाची? निवडणूक आयोगासमोरील सुनावणी 30 जानेवारीपर्यंत स्थगित

96

शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाचे की उद्धव गटाचे यावर सध्या केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. आधी शिंदे गटाने सुनावणी पूर्ण केल्यावर शुक्रवार, २० जानेवारी रोजी ठाकरे गटाची सुनावणी पूर्ण झाली. वकील कपिल सिब्बल आणि त्यानंतर देवदत्त कामत यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली. या युक्तिवादानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने २३ जानेवारीपर्यंत सुनावणी स्थगित केली. त्याच बरोबर दोन्ही गटाच्या वकिलांना थोडक्यात लेखी म्हणणे मांडण्याचा आदेश दिला. 

सोमवारी, 30 जानेवारी रोजी दोन्ही गटांचे लेखी उत्तर मिळाल्यानंतर आयोग पुढील कार्यवाही करणार आहे. ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला, तर शिंदे गटाच्या वतीने महेश जेठमलानी, मनिंदर सिंह यांनी युक्तीवाद केला. जवळपास चार तास चाललेल्या या सुनावणीनंतरही  शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंना मिळणार की शिंदेंना मिळणार? याचा निर्णय होऊच शकला नाही. आजच्या सुनावणीत ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये शाब्दिक चकमक झाली. ठाकरे गटाचे देवदत्त कामत आणि शिंदे गटाचे महेश जेठमलानी यांच्यात शाब्दिक चकमक झाल्यानंतर आयोगाला मध्यस्थी करावी लागली.

(हेही वाचा घाटकोपरमध्ये लव्ह जिहाद, लँड जिहाद, धर्मांतराच्या विरोधात हिंदू उतरणार रस्त्यावर)

काय म्हणाले देवदत्त कामत? 

ठाकरे गटाचे काम आयोगाच्या घटनेनुसारच सुरु आहे. शिंदे शिवसेनेत होते, मग शिवसेना बोगस असे कसे म्हणू शकतात. शिवसेनेची घटना बोगस हा शिंदे गटाचा दावा कोणत्या आधारे? शिंदे गटाची प्रतिनिधी सभाच झाली नाही, सादीक अली केस याठिकाणी लागू होऊ शकत नाही, राजकीय पक्ष म्हणून आमचे संख्याबळ लक्षात घ्या. मुख्य नेतेपद पक्षाच्या घटनेतच नाही, त्यामुळे ते घटनाबाह्य आहे, असे वकील कामत म्हणाले. 

काय म्हणाले महेश जेठमलानी? 

उद्धव ठाकरेंनी मविआ कशी बनवली? युतीचे आश्वासन देऊन मते मिळवली अन् नंतर मतदारांना सोडून दिले. आमच्या संख्येबाबत कोणताही वाद नाही, मुख्य नेतापद हे कायदेशीर आहे. पक्षघटनेचे आम्ही पालन केले आहे. शिंदेंच्या बंडाने  शिवसेनेत फूटच पडली आहे, असे वकील महेश जेठमलानी म्हणाले. 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.