वेदांता- फॉक्सकॉनचा राज्य सरकारशी करार झालाच नव्हता; श्वेतपत्रिकेतून उद्योग विभागाची माहिती

93
वेदांता- फॉक्सकॉनचा राज्य सरकारशी करार झालाच नव्हता; श्वेतपत्रिकेतून उद्योग विभागाची माहिती

‘वेदांता फॉक्सकॉन’, ‘टाटा-एअरबस’, ‘संप्रन’ या तीन आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी राज्य सरकार किंवा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाशी कोणताही सामंजस्य करार केलेला नव्हता. त्यामुळे हे प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेले, असे म्हणणे योग्य ठरणार नाही, अशी माहिती उद्योग विभागाने गुरुवारी (३ ऑगस्ट) सादर केलेल्या श्वेतपत्रिकेतून दिली आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गेल्या नोव्हेंबर महिन्यात राज्याबाहेर गेलेल्या उद्योगांसंदर्भात श्वेतपत्रिका काढण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, गुरुवारी ३ ऑगस्ट रोजी सामंत यांनी श्वेतपत्रिका विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सादर केली. या नऊ पानी श्वेतपत्रिकेत चार प्रकल्पांचा उल्लेख करण्यात आला आहे.

“वेदांता उद्योग समूहाने फॉक्सकॉन या तैवानस्थित कंपनीशी भागीदारीत इलेक्ट्रॉनिक व सेमीकंडक्टर डिस्प्ले फैब या क्षेत्रामध्ये सुमारे दीड लाख कोटी रुपये गुंतवणूक करण्याचे ठरवले होते. त्यानुसार ५ जानेवारी २०२२ मध्ये वेदन्तने स्वारस्य (एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट) दर्शवले होते. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी कंपनीचे शिष्टमंडळ तळेगाव येथे स्थळ पाहणी करून आले. १४ मे रोजी कंपनीने उद्योग विभागाकडे अर्ज करून प्रकल्पाचे स्वरूप, गुंतवणूक, रोजगार, आवश्यक पायाभूत सुविधा याबाबत माहिती दिली होती. तसेच कंपनीने शासनाच्या पाठिव्याची विनंती केली होती. वेदान्तने फॉक्सकॉनबरोबर असलेल्या ६०:४० भागिदारीची माहिती दिली”, असे श्वेतपत्रिकेत म्हटले आहे.

(हेही वाचा – BEST Strike : सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत बेस्ट बसच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच)

“१७ मार्च २०२२ रोजी झालेल्या उद्योग विभागाच्या उच्चाधिकारी समितीच्या बैठकीत फॉक्सकॉनसंदर्भात कोणताही विषय अंतर्भूत नव्हता. १५ जुलै २०२२ रोजी नव्या सरकारच्या काळात झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत प्रोत्साहनांबाबत निर्णय घेण्यात आला. २६ जुलै रोजी कंपनीचे मालक अनिल अगरवाल यांना पत्र पाठवून कोणत्या सवलती आणि प्रोत्साहन देणार, याची सविस्तर माहिती देण्यात आली होती. ५ ऑगस्टला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेदांता समूहाचे अगरवाल यांची भेट घेऊन महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले होते. ५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने वेदान्त कंपनीला पत्र पाठवून सामंजस्य करार करण्याची विनंती केली होती, याकडे श्वेतपत्रिकेत लक्ष वेधण्यात आले आहे. फॉक्सकॉन प्रकल्प राज्यात उभारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची जंत्री पाच पानांमध्ये दिल्यावर शेवटी कोणताही सामंजस्य करार झालेला नसल्याने हा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेला, असे म्हणणे योग्य नाही, असे श्वेतपत्रिकेत म्हटले आहे.

भारतीय हवाई दलासाठी सी-२९५ जातीची मालवाह विमाने उत्पादित करणारा २२ हजार कोटींचा एअरबस- टाटा प्रकल्प गुजरातमध्ये बडोदा येथे उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय संरक्षण सचिव अजय कुमार यांनी दिल्लीत २७ ऑक्टोबर २०२२ मध्ये केली होती. एअरबस-टाटा कंपनीने याबाबत महाराष्ट्र शासन अथवा उद्योग विभागाशी कोणताही सामंजस्य करार केला नव्हता, असेही श्वेतपत्रिकेत म्हटले आहे.

अंतराळ व संशोधन क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘संप्रन’ या फ्रेंच कंपनीचा प्रकल्प हैदराबाद येथे सुरू होणार असल्याची घोषणा ५ जुलै २०२२ रोजी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केली होती. या कंपनीने गुंतवणुकीसाठी जागेचा अथवा इतर कोणत्याही सहकार्यासाठी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला नव्हता, असे श्वेतपत्रिकेत नमूद करण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.