Vanchit Bahujan Aghadi : वंचित आघाडीचा संयम सुटला; दोन आठवड्यांची मुदत, अन्यथा ४८ जागा लढणार

219
  • सुजित महामुलकर

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) इंडी आघाडीत स्थान द्यावे यासाठी काँग्रेसकडे वारंवार विनवण्या करूनही काँग्रेसने या ‘वंचितांना’ जवळ केले नाही. आता वंचित आघाडीचा संयम सुटत चालला असून येत्या दोन आठवड्यात निर्णय घेतला नाही तर वंचित राज्यातील लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढवणार, असा इशाराच वंचित आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकले यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना दिला. यामुळे काँग्रेसमधील अस्वस्थता वाढली असून निवडणूकीत २०१९ प्रमाणे काँग्रेसला मोठा फटका बसणार असल्याची चर्चा होत आहे.

दिग्गजांना फटका

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत वंचितने (Vanchit Bahujan Aghadi) बहुतांशी मतदार संघात लाखाच्या वर मते खाल्ली होती. त्याचा फटका काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या किमान सात उमेदवारांना बसला त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचाही समावेश आहे. नांदेड, सोलापूर, अकोला, सांगली या मतदार संघांत वंचितने तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती.

पवार, ठाकरेंची शिफारस

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला (Congress) प्रस्ताव देऊन देशपातळीवरील इंडी आघाडीत स्थान द्यावे, अशी मागणी केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शरद पवार (Sharad Pawar) यांनीही जुने वैर विसरुन वंचितला (Vanchit Bahujan Aghadi) इंडी आघाडीत सामावून घ्यावे, अशी शिफारस काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Kharge) यांच्याकडे केली. उद्धव ठाकरे (Thackeray) यांनीही वेळोवेळी आंबेडकर यांच्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली मात्र काँग्रेसने याकडे साफ दुर्लक्ष केले.

स्वतः मागणी न केल्याने काँग्रेसचे दुर्लक्ष

एका काँग्रेस नेत्याच्या माहितीनुसार आंबेडकर यांनी स्वतः पत्र लिहिले नसल्याने काँग्रेसने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर काल गुरुवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्वतःच्या सहिने खरगे, पवार आणि ठाकरे यांना पत्र लिहून आर्जव केले की वंचितला आघाडीत घ्यावे. मात्र तरीही काँग्रेसचा वंचितला सोबत घेण्यास विरोधच असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा Ramanand Sagar : रामायण मालिकेसारखी अजरामर निर्मिती करून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे रामानंद सागर)

आंबेडकर यांचे महाविकास आघाडी नेत्यांना पत्र

“लोकसभेसाठी काँग्रेस, उबाठा, राष्ट्रवादी आणि वंचित यांनी प्रत्येकी १२-१२ जागा लढवाव्या हे सूत्र आम्ही केवळ मविआ व इंडी आघाडीत समावेशासाठीच नाही, तर मविआ अंतर्गत सर्व वाद संपवण्याच्याही दृष्टीने प्रस्तावित केले आहे,” असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. हा फॉर्म्युला केवळ नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पदावरून हटवण्यासाठी महाविकास आघाडी आणि इंडी आघाडीमध्ये सहभागी होण्याची आमची इच्छा आणि स्वारस्य पुन्हा व्यक्त करण्यासाठी नाही, तर जागा वाटपाबद्दल मविआमधील सर्व मतभेद दूर करण्यासाठी सुद्धा प्रस्तावित करण्यात आला असल्याचा पुनरुच्चार त्यांनी पत्रात केला आहे.

अन्यथा ४८ जागा लढणार

याबाबत मोकले यांना विचारले असता ते म्हणाले, “आमची लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत वाट पाहण्याची तयारी आहे, पण दोन आठवड्यात काँग्रेसकडून उत्तर अपेक्षित आहे. अन्यथा आम्ही तयारीला लागून सर्व ४८ जागा लढवणार.”

काँग्रेसला वंचित नकोच

मविआमधील एका नेत्याने सांगितले की काँग्रेसला वंचित (Vanchit Bahujan Aghadi) इंडी आघाडीसोबत नकोच आहे. मात्र ते उघडपणे बोलायचे नाही अशा सूचना आहेत. वंचितला सोबत घेण्यावरील एका प्रश्नाला उत्तर देताना “काय सत्यनारायणाची पूजा आहे का?” असे एका काँग्रेस नेत्याने म्हटले होते. तो नेताही आता वंचितला सोबत घेण्याची भाषा करू लागला आहे, असे या नेत्याने सांगितले. ‘जवळचे नुकसान बघण्यापेक्षा लांबच फायदा जास्त महत्वाचा आहे,’ अशी कॉँग्रेसची भूमिका असल्याचे त्याने पुढे सांगितले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.