‘जर भाजपने ही निवडणूक लढवली असती तर…’,पोटनिवडणुकीतील विजयानंतर उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

128

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्वव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा दणदणीत मतांनी विजय झाला आहे. प्रभावी प्रतिस्पर्धी नसल्यामुळे ऋतुजा लटके विजयी होणार यावर निवडणुकीआधीच शिक्कामोर्तब झाले होते. पण आता या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

या निवडणुकीत लटकेंनंतर सर्वाधिक मते ही नोटाला मिळाली आहेत. त्यामुळे त्याबाबत प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

(हेही वाचाः Andheri East Bypoll Election Result: पतीचाही रेकॉर्ड मोडत ऋतुजा लटके विजयी, ‘नोटा’चा कोटाही वाढला)

…तर नोटाची मतं त्यांना मिळाली असती

आमच्या पक्षाचं चिन्ह आणि नाव गोठवलं ते या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोठवण्यात आलं होतं. ज्यांच्या मागणीवरुन हे करण्यात आलं ते या निवडणुकीच्या रिंगणाच्या आसपास देखील फिरकले नाहीत. त्यांच्या कर्त्याकरवित्यांनी देखील अर्ज करुन नंतर निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे त्यांनी जर का ही निवडणूक लढवली असती, तर नोटाला आता जी मतं मिळाली आहेत ती त्यांना मिळाली असती, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.

चिन्हासोबत वृत्तीलाही महत्व

निवडणूक चिन्ह हे महत्वाचं असतं. धनुष्यबाण हे आणचं चिन्ह गोठवलं गेलं. पण चिन्हासोबतच वृत्तीलाही जनता मतदान करत असते. त्यामुळे चिन्ह कोणतंही असलं तरी जनता आमच्यासोबत आहे, हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे, असे स्पष्ट मतही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

(हेही वाचाः ‘अजित पवारांची नाराजी फडणवीसांना माहीत’, नारायण राणेंचं मोठं विधान)

प्रत्येक विजय खेचून आणू

लढाईची सुरुवातच विजयाने झाली आहे. त्यामुळे भविष्यातील लढाईची आपल्याला चिंता नाही. जसा हा विजय आपण खेचून घेतला तसेच यापुढचे विजयही आपण खेचून आणू, असा ठाम विश्वासही यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

लटके यांचा विजय

रविवारी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागत असताना ऋतुजा लटके यांनी शेवटच्या फेरीत 66 हजार 247 मते मिळवली आहेत. तर त्यानंतर सर्वाधिक 12 हजार 776 मते नोटाला मिळाली आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.