सत्तेच्या व्यसनावर आळा कोण घालणार? मुख्यमंत्र्यांचा सवाल

आपले पोलिस काहीच करत नाही, असे काही नाही. हे चिमूटभर गांजा हुंगत असताना माझ्या पोलिसांनी दीडशे कोटी रुपयांची ड्रग्ज मुंबईत जप्त केली आहे. तुम्ही चिमूटभर गांजा हुंगत आहात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

92

सध्या जो खेळ सुरु आहे वाट्टेल ते करायचे पण मला सत्ता पाहिजे. हे सत्तेचे व्यसनच आहे. अमली पदार्थ हा वेगळा प्रकार आहे. त्याचा नायनाट केलाच पाहिजे. पण सत्तेचे व्यसन हा सुद्धा अमली प्रकारच आहे. अगदी बाजार समित्यांपासून लोकसभेपर्यंत माझ्याच अमल पाहिजे हा सुद्धा एक अंमली प्रकारच आहे. या अमली प्रकाराचा बंदोबस्त कोण करणार?, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बोलताना केला.

महाराष्ट्राचाही बदनामी का करता? 

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना थेट केंद्र सरकारविरोधात दंड थोपाटले. जणू काही संपूर्ण जगात महाराष्ट्रातच गांजा आणि चरसचा व्यापार चालला आहे असे चित्रे चालले आहे. जी आपली संस्कृती आहे तुळशी वृंदावन आहे. हल्ली तुळशी वृंदावनला जाऊन तिकडे चरस आणि गांजांची वृंदावने झालीत की काय असे चित्रे महाराष्ट्राचे जगात निर्माण केले जात आहे. का करत आहात नतद्रष्टपणा? बरे केवळ महाराष्ट्रातच सापडते असे नाही. माझ्याकडे दोन बातम्या आहेत. मुंद्रा अदानी बंदराचा तपास करा हे न्यायालयाने सांगितले आहे. तिथे कोरोडो रुपयांचा अमली पदार्थाचा साठा सापडला आहे. आपले पोलिस काहीच करत नाही, असे काही नाही. हे चिमूटभर गांजा हुंगत असताना माझ्या पोलिसांनी दीडशे कोटी रुपयांची ड्रग्ज मुंबईत जप्त केली आहे. तुम्ही चिमूटभर गांजा हुंगत आहात. हुंगा. कुठे हुंगायचे तिकडे हुंगा. पण माझ्या पोलिसांचे शोर्य कमी नाही. कोणी तरी एक सेलिब्रिटी घ्यायचा आणि गांजा पकडला म्हणून ढोलकी बडवायची, फोटो काढून घ्यायचे हे सुरू आहे, अशी टीका मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.

गांधी आणि सावरकर तरी समजले का?

सावरकर शब्द उच्चारण्याची तुमची लायकी तरी आहे का? गांधी हा शब्द उच्चारण्याची लायकी तरी आहे का? गांधी आणि सावरकर तरी समजले का? असा सवाल करतानाच मी दोन वर्षापूर्वी बोललो होतो. माय मरो आणि गाय जगो हे आमचे हिंदुत्व नाही. त्यावेळी गहजब माजला होता. झुंडबळी झुंडबळी अशी बोंब ठोकली. त्यावेळी मोहन भागवत म्हणाले झुंडबळी घेणारे हे हिंदूच नाहीत. मग हे हिंदुत्व आहे तरी काय? कोणी शिकवायचे? कुणाला शिकवायचे? आणि कोणाकडून शिकायचे? हिंदुत्वाला धोका नाही हे सत्य असेल तर हिंदुत्वाला धोका होता तेव्हा एकच मर्द बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाच्या दुश्मनांसमोर उभा राहिला होता, असेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचा : मी मुख्यमंत्री आहे, असे मला कधीच वाटणार नाही! मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला)

बंगालसारखी जिद्द ठेवा!

हा देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. त्यावेळेला जसा संपूर्ण देश पेटला होता. त्या देशामध्ये महाराष्ट्र लाल, बाल आणि पाल पुढे होता, महाराष्ट्र एक पुढे होता, पंजाब एक पुढे होता आणि पश्चिम बंगाल एक पुढे होता. बंगालने त्यांचे कर्तृत्व दाखवलेले आहे. खरोखर ममतादीदी आणि बंगाली जनतेला मी धन्यवाद देतोय. तुम्ही ती न झुकण्याची जिद्द कायम ठेवलेली आहे. तीच जिद्द आपल्यासुद्धा रगामध्ये आणि रक्तामध्ये आहे ही आपल्याला तयारी ठेवावी लागेल. हर हर महादेव म्हणजे काय असते हे पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्ताला दाखवण्याची वेळ येऊ नये, असे म्हणत त्यांनी एक प्रकारे भाजपला इशारा दिला.

1992-1993 मध्ये कुठे होता?

पण आलीच तर दाखवावेच लागेल. मग हा सत्तापिपासूपणा नाही आहे काय?, वैचारिक लढा ठीक आहे, पण यात कुठला विचार आहे. तोंडामध्ये बोंडक घालून शिवसेनेला बदनाम करणारी लोक बसली असतील. 1992-1993 येथे दंगल झाली तेव्हा येथे कोण होते, बाबरी मशिदीच्या वेळी सगळे गप्प होते, त्यांची छाती थरथरत होती, शिवसेनाप्रमुखांनी जबाबदारी स्वीकारली आणि अभिमानाने सांगितले आम्ही हिंदू आहोत. 92-93 साली शिवसैनिक हे मर्द उतरले नसते तर तुम्ही कुठे असते हे कळलं तरी असतं का?, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.