‘हिंमत असेल तर महिन्याभरात मुंबई महापालिका निवडणुका घेऊन दाखवा’,उद्धव ठाकरेंचे अमित शहांना आव्हान

78

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील गट प्रमुखांचा मेळावा गोरेगाव येथील नेस्को मैदानात संपन्न झाला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करतानाच भाजप आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांना थेट आव्हान केले आहे. हिंमत असेल तर येत्या एका महिन्यात मुंबई महापालिका आणि विधानसभा निवडणुका लावा, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले आहे.

(हेही वाचाः ‘आयुष्यातील पहिली निवडणूक समजून लढा’, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन)

मर्द अशाच लढाईची वाट बघतात

अलिकडेच केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मुंबईत येऊन मुंबई महापालिका जिंकण्याचा नारा दिला. आता पुढच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री, पंतप्रधान मुंबईत येत आहेत, केंद्रीय यंत्रणा देखील कामाला लागल्या आहेत. आपले गद्दार आणि इतर मुन्नाभाई सगळे मिळून शिवसेनेवर तुटून पडणार आहेत. आमच्या सारखे मर्द अशाच लढाईची वाट बघत असतो.

(हेही वाचाः ‘आम्हाला जमीन दाखवाल तर तुम्हाला असमान दाखवू’, उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात)

त्यामुळे मी आज अमित शहांना आव्हान देतोय की तुमच्या चेल्यांना सांगा की हिंमत असेल तर मुंबई महापालिका निवडणूक महिन्याभरात घेऊन दाखवा आणि त्याहून पुढे हिंमत असेल तर त्याचवेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक देखील लावून दाखवा, असे थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि अमित शहा यांना केले आहे.

तुमचे डावपेच यशस्वी होणार नाहीत

तुम्ही कोणतेही डावपेच खेळा ते यशस्वी होणार नाहीत. आज मुस्लिम,अमराठी माणसं सुद्धा आमच्यासोबत आहेत. कारण कोरोना काळात मी मुख्यमंत्री असताना कुठलाही विचार न करता या सर्वांचे प्राण वाचवले आहेत. त्यांनाही आमचे हिंदुत्व कळले आहे त्यामुळे तोडा,फोडा आणि राज्य करा हे यशस्वी होणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः ‘सध्या बाप पळवणारी अवलाद महाराष्ट्रात फिरतेय’, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.