भविष्यात एकत्र येण्याचे मार्ग उद्धव-शिंदेंकडून बंद

78

उद्धव ठाकरे यांच्यापासून फारकत घेत एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडली असली तरी, भविष्यात हे दोन्ही नेते एकत्र येतील, अशी आशा प्रत्येक शिवसैनिक बाळगून आहे. मात्र, गेल्या काही दिवसांतील घडामोडींकडे डोळसपणे पाहिल्यास उद्धव आणि शिंदे यांनी एकत्र येण्याचे सर्व मार्ग बंद केल्याचे दिसून येते.

( हेही वाचा : भूमीहीनांना जागा खरेदी करताना मिळणार विशेष सवलत )

उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या दोन मुलाखती आणि त्यानंतर उद्धव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एकनाथ शिंदे यांनी केलेले ट्वीट, दोहोंचा गर्भितार्थ मतभेदांसोबतच मनभेदातील खोल दरी प्रकट करतो. उद्धव मुलाखतीत म्हणाले, ”मी त्यांना त्या वेळेला मुख्यमंत्रीपदी बसवले असते, तरी त्यांनी आणखी वेगळे काहीतरी केले असते; कारण त्यांची भूकच भागत नाही. मुख्यमंत्री पदापाठोपाठ त्यांना शिवसेनाप्रमुख व्हायचे आहे. शिवसेनाप्रमुखांबरोबर स्वतःची तुलना करणे ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे, याला हावरटपणा म्हणतात. सरकार गेले, मुख्यमंत्रीपद गेले याची खंत नाही; पण माझीच माणसे दगाबाज निघाली. मी रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले. काहीजण मी बरा व्हावा म्हणून अभिषेक करत होते, तर काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. देव पाण्यात बुडवून बसलेले लोक आता पक्ष बुडवायला निघाले आहेत”. अशा जहरी शब्दांत केलेली टीका म्हणजे, यापुढे शिंदे आणि त्यांच्या साथीदारांसोबत जायचे नाही, या निर्णयाचेच द्योतक आहे.

बंडखोरीनंतर शिंदे आणि समर्थक आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे जाणिवपूर्वक टाळले. मात्र, उद्धवसेनेकडून नानाविध आरोप होऊ लागल्यानंतर त्यांच्या संयमाचा बांध फुटला. आधी नाव न घेता कोपरखळ्या काढल्या जात होत्या, पण रामदास कदम, सुहास कांदे, शंभुराज देसाई यांनी थेट शाब्दिक बाण सोडण्यास सुरुवात केल्यानंतर शिंदे गटातील इतर आमदारांनीही तशीच भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ‘पक्षप्रमुख’ असा उल्लेख टाळत भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे.

फडणवीस, उदय सामंत, रामदास कदमांचे ट्वीटही चर्चेत

एकनाथ शिंदेंसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीटही दिवसभर चर्चेत राहिले. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना त्यांनीही ‘पक्षप्रमुख’ असा उल्लेख टाळला. याऊलट ‘माजी मुख्यमंत्री’ म्हणत कोपरखळी काढण्याची संधी त्यांनी सोडली नाही. शिवाय उदय सामंत, रामदास कदम यांनीही उद्धव यांना पक्षप्रमुख म्हटलेले नाही. रामदास कदम यांनी तर शुभेच्छा देताना रोषही व्यक्त केला आहे. ते लिहितात, ”मी उद्धव ठाकरेंना माजी मुख्यमंत्री म्हणूनच शुभेच्छा देईन. त्यांनी शरद पवारांचे नेतृत्व सोडून बाळासाहेबांच्या विचारांचे नेतृत्व हाती घेतले असते, तर त्यांना मी निश्चितपणे शिवसेनेचे प्रमुख म्हटले असते. मात्र आज ते बाळासाहेबांचे सुपूत्र म्हणून काम पाहत नाहीत, तर ते शरद पवार यांच्या मांडीवर बसून त्यांच्या विचारांशी सहमत होऊन काम करत आहेत. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी, त्यांच्या विचारांशी गद्दारी, पाठीत खंजिर खुपसण्याचे काम दुर्दैवाने उद्धव ठाकरेंकडून झाले आहे”.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.