Vishnu Shankar Jain : काशी-मथुरा मुक्त करून पुन्हा सनातन धर्माला सोपवण्याची आली वेळ – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

254
काशी-मथुरा मुक्त करणे हा हिंदूंच्या अस्तित्वाचा लढा आहे. पुनर्स्थापनेसाठी या देवता सनातन धर्मियांची वाट पहात आहेत. ‘काशी-मथुरा मुक्त व्हावी’, अशी छत्रपती शिवाजी महाराज यांची इच्छा होती. काशी-मथुरा मुक्त करून पुन्हा सनातन धर्माला ती सोपवण्याची वेळ आली आहे, असे आवाहन काशी विश्‍वेश्‍वर आणि मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमी यांना इस्लामी अतिक्रमणातून मुक्त करण्यासाठी न्यायालयीन लढा देणारे सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन (Vishnu Shankar Jain) यांनी केले.
श्री विघ्नहर गणपति मंदिर देवस्थान, लेण्याद्री गणपति मंदिर देवस्थान, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान, हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ओझर येथे आयोजित ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’मध्ये उपस्थित मंदिरांच्या विश्‍वस्तांना मंदिरांच्या रक्षणासाठी संघर्ष करण्याचे आवाहन करतांना अधिवक्ता जैन बोलत होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते  रमेश शिंदे, अधिवक्ता संदीप जायगुडे आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते  चेतन राजहंस उपस्थित होते. या वेळी अधिवक्ते विष्णु जैन यांचा सत्कार करण्यात आला. श्री विघ्नहर गणपति मंदिर देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे, विश्‍वस्त आनंदराव मांडे आणि भीमाशंकरचे सुरेश कौदरे यांनी अधिवक्ता जैन यांचा सत्कार केला.
या वेळी अधिवक्ता जैन (Vishnu Shankar Jain) म्हणाले, ‘‘मंदिरे पाडून शेकडो वर्षे झाली. त्यावर मुसलमानांनी ‘वजू अदा’ केला, तरीही मंदिरातील देवतेचे अस्तित्व कधीच नष्ट होऊ शकत नाही. मूर्ती तोडल्यामुळे देवतेचे अस्तित्व नष्ट होत नाही. देवता सूक्ष्म रूपाने त्याच ठिकाणी वास करतात. काशी विश्‍वेश्‍वराचे मंदिर तोडून मंदिराच्या भग्नावशेषांवर घुमट बांधून नमाजपठण केले जात आहे. प्राचीन मंदिरावरच ही मशीद उभारण्यात आली आहे. या ठिकाणी असलेल्या श्री श्रृंगारदेवीच्या मंदिराचा दरवाजा बंद करण्यात आला आहे. विविध देवतांची स्थाने असलेल्या ठिकाणी कबरी बांधून हिंदूंना बाहेर काढण्यात आले. सद्य:स्थितीत केवळ वर्षातून एकदा या ठिकाणी हिंदूंना पूजेसाठी प्रवेश दिला जातो. हिंदूंची मंदिरे कह्यात घेण्याचे हे षड्यंत्र आहे. या विरोधात आपला न्यायालयीन लढा चालू आहे. १६ मे २०२२ या दिवशी या ठिकाणी ‘वजू अदा’ करण्यावर न्यायालयाने बंदी घातली आहे. या ठिकाणी केंद्रीय पुरातत्व विभागाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल ११ डिसेंबर या दिवशी न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. काशी विश्‍वेश्‍वर मंदिराच्या अष्टमंडपात सर्व हिंदूंना पुन्हा पूजापाठ करण्याची संधी लवकरच मिळेल.

श्रीकृष्ण जन्मभूमीचे सर्वेक्षणही लवकरच होईल !

अयोध्या येथे श्रीराममंदिर उभारण्याच्या कार्यात केंद्रीय पुरातत्व विभागाने केलेले  सर्वेक्षण महत्त्वाचे ठरले. श्रीकृष्ण जन्मभूमीवरील इस्लामी अतिक्रमण हा आपला राष्ट्रीय प्रश्‍न आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयात याविषयीचा खटला चालू आहे. काशी विश्‍वेश्‍वर मंदिराप्रमाणे श्रीकृष्ण जन्मस्थानाचेही लवकरच केंद्रीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येईल, असा विश्‍वास अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी व्यक्त केला.

‘न्यायमंदिर’ या संकल्पनेचा स्रोत मंदिरातूनच !

‘मंदिर’ हा हिंदु धर्मासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. सद्य:स्थितीत काही लोक मंदिरे आर्थिक व्यवस्थेशी जोडत आहेत. सध्या देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेमध्ये मंदिरांच्या अर्थव्यवस्थेचा वाटा २.३५ टक्के इतकी आहे. आपल्या संस्कृतीमध्ये मंदिरे अर्थकारणासाठी पाहिली जात नाहीत. ‘न्यायव्यवस्थेला ‘न्यायमंदिर’ असे म्हटले जाते; ‘चर्च ऑफ जस्टिस’, असे कुठे म्हटले जात नाही. याचे कारण न्यायाची संकल्पना ही मंदिराशी जोडलेली आहे. ‘मंदिरात न्याय मिळतो’, अशी आपली पूर्वापार चालत असलेली परंपरा आहे. भारताच्या प्रत्येक गावात अशा प्रकारची व्यवस्था आणणे महत्त्वाचे आहे, असे या वेळी अधिवक्ता जैन यांनी म्हटले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.