श्वेतपत्रिका कधी काढणार?; उद्योगमंत्र्यांच्या घोषणेला महिना उलटला

97
वेदांता-फॉक्सकॉन, टाटा-एअरबससह मोठे पाच प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपयुद्ध रंगले. महाविकास आघाडीने सगळे खापर शिंदे-फडणवीस सरकारवर फोडल्याने, सामान्य जनतेसमोर वस्तुस्थिती मांडण्यासाठी ३० दिवसांत श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. मात्र, घोषणेला महिना उलटूनही श्वेतपत्रिका न काढल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने उद्योग उभारण्यासंदर्भात ना उच्चाधिकार समितीची ना मंत्रिमंडळाच्या उपसमिती बैठक घेतली गेली. पण, राज्यातून प्रकल्प बाहेर गेल्याबद्दल आमची बदनामी केली जात आहे. त्यामुळे आता वादात सापडलेल्या वेदांत-फॉक्सकॉन, टाटा-एअरबससह पाच प्रकल्पांवर पाणी का सोडावे लागले, या मागील सत्य ३० दिवसांमध्ये श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून जनतेसमोर मांडले जाईल, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महिन्याभरापूर्वी केली होती.
मात्र, अद्याप श्वेतपत्रिका प्रसिद्ध न झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक शंकाकुशंका उपस्थित केल्या जात आहेत. यासंदर्भात उद्योग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रियेस नकार दिला.

उदय सामंत यांचा दावा

  • आम्ही सत्तेत आल्यापासून एकही प्रकल्प राज्याबाहेर गेलेला नाही. शिवसेना (शिंदे गट) व भाजपच्या युती सरकारविरोधात नाहक बदनामी केली जात आहे.
  • वेदांतचे प्रमुख अनिल अगरवाल यांनी वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये का नेला, यामागील कारण स्पष्ट केले आहे.
  • हा प्रकल्प स्थापन करण्याआधी वेदांत कंपनीने नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने गुजरातमध्ये प्रकल्पासाठी पोषक वातावरण असल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर हा प्रकल्प राज्याबाहेर गेला.
  • अगरवाल यांनी तत्कालीन सरकारकडे जानेवारीमध्ये प्रकल्पाच्या परवानगीसाठी अर्ज केला होता. पण, राज्य सरकारने जुलैपर्यंत उच्चाधिकार समितीची बैठकही घेतली नव्हती, असा दावा करत उदय सामंत यांनी ठाकरे गटावर टीका केली होती.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.