कसब्यात भाजपचा गड कोसळणार, चिंचवडमध्येही घाम फुटणार; पोटनिवडणुकीच्या निकालावर राऊतांची प्रतिक्रिया

129

पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यामुळे या दोन विधानसभेतील जागा रिक्त झाल्या होत्या. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने १८ जानेवारीला या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली. २७ फेब्रुवारीला या दोन्ही जागांसाठी मतदान झाले असून गुरुवारी, २ मार्चला सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. २० फेऱ्यांपैकी आतापर्यंत कसब्यातील दहाव्या आणि चिंचवडमधील नवव्या फेरीचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये कसब्यात मविआचे रवींद्र धंगेकर आघाडीवर असून भाजपचे हेमंत रासने पिछाडीवर आहेत. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर असून मविआचे नाना काटे पिछाडीवर आहे. याच पार्श्वभूमीवरून बोलत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘कसब्यातील भाजपचा गड कोसळणार असून चिंचवडमध्येही भाजपला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही.’

प्रसार माध्यमांसोबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘ज्या कसब्यात गेले ४० वर्ष भारतीय जनता पक्ष हा फक्त शिवसेनेच्या पाठिंब्याने जिंकून आलेला आहे. आज शिवसेना महाविकास आघाडीची घटक आहे, आणि आम्ही सगळे एकत्र आहोत. आणि त्याचा परिणाम कसब्यात दिसतोय. तसेच चिंचवड मतदारसंघात शेवटपर्यंत भाजपला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. कसब्यातला भाजपचा गड कोसळणार आहे. चिंचवड हा भाजपचा गड नसून तिथे एका कुटुंबाची मक्तेदारी आहे. तिथे पक्षापेक्षा जगताप पॅटर्न चालतो.’

कसब्यातील दहाव्या फेरीअखेरीस कोणाला किती मते?

मविआचे रवींद्र धंगेकर – ३८,२८६ मते – आघाडी
भाजपचे हेमंत रासने – ३४,०२२ मते – पिछाडी

चिंचवडमधील नवव्या फेरीअखेरीस कोणाला किती मते?

भाजपच्या अश्विनी जगताप – ३२,२८८ मते – आघाडी
मविआचे नाना काटे – २५,९२२ मते – पिछाडी
अपक्षाचे राहुल कलाटे – १०,७०५ मते – पिछाडी

(हेही वाचा – उद्धव ठाकरेंना ‘तो’ सल्ला दिला कुणी, ज्याने सर्वोच्च न्यायालयात झाली कोंडी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.