महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाची उच्चस्तरीय चौकशी करा; उद्धव सेनेची राज्यपालांकडे मागणी

129
thackeray group met governor ramesh bais over kharghar incident
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाची उच्चस्तरीय चौकशी करा; उद्धव सेनेची राज्यपालांकडे मागणी

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाची उच्चस्तरीय चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली.

खारघर येथील घटना ही मानवनिर्मित आपत्ती असल्याने राज्य सरकार सत्य परिस्थिती दडविण्याचा प्रयत्न करीत आहे. ही घटना महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारी आहे. त्यामुळे सत्य परिस्थिती जनतेसमोरे येणे आवश्यक आहे. तसेच, भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषींविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यास शासनास निर्देश द्यावेत, अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने राज्यपालांना दिले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार अरविंद सावंत, आमदार अनिल परब, सचिन अहिर, सुनील प्रभू, रवींद्र वायकर, मनीषा कायंदे, रमेश कोरगावकर, विलास पोतनिस, ऋतुजा लटके, सुनील शिंदे, प्रकाश फातर्पेकर, आमश्या पाडवी, नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, जिल्हाप्रमुख बबन पाटील, संपर्क प्रमुख संजय कदम आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.

मागणी काय?

  • खारघर येथे ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना “महाराष्ट्र भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्याच्या कार्यक्रमात उष्माघात आणि चेंगराचेंगरीमुळे १४ श्रीसेवकांचा नाहक जीव गेला.
  • मात्र, सरकारने या दुर्दैवी घटनेनंतर कोणतीही भूमिका अथवा प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. सरकारने जारी केलेल्या आकड्यांबाबत आजही संभ्रम कायम आहे. अद्याप स्थानिक पोलीस ठाण्यात या घटनेबाबत अपमृत्यूची नोंद झाली नाही.
  • महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला १४ कोटी रुपये खर्च करण्यात आला, मात्र कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. या घटनेला जबाबदार ठरलेल्या व नियोजनात निष्काळजीपणा करणाऱ्या स्थानिक वरिष्ठ पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राज्यपालांकडे केल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.
  • दरम्यान, या घटनेबाबत आजच सरकारशी बोलून पावले उचलण्याची ग्वाही राज्यपालांनी दिल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.

(हेही वाचा – पंतप्रधान मोदींवरील उद्धव ठाकरेंच्या एकेरी भाषेतील टीकेवर मुख्यमंत्री शिंदेंचे उत्तर; म्हणाले…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.