शेतकऱ्यांची ‘जगावे की मरावे’ अशी परिस्थिती; तात्काळ मदत जाहीर करा – अजित पवार

89
अवकाळीने ‘जगावे की मरावे’ अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना काय मदत देणार आहे हे तात्काळ जाहीर करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बुधवारी  सभागृह सुरू होताच केली.
गेल्या दोन दिवसांत नाशिक, धुळे, बुलडाणा, पालघर, बीड, जालना, पुणे, अहमदनगर, वाशिम, सोलापूर व राज्यातील इतर भागात अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कापणीला आलेला गहू जमिनदोस्त झाला आहे, आंबा, काजू, द्राक्षे, केळी, संत्रा,‍ लिंबू, पपई, कलिंगड यासारख्या अनेक फळपीकांबरोबरच हरभरा, तूर, मका, वाल, चवळी, पावटा व इतर रब्बी पालेभाज्या यांचेही नुकसान झालेले आहे. वीज अंगावर पडून जनावरे दगावली आहेत, मेंढ्यासुद्धा मृत झाल्या आहेत.
शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे आंबा, काजू सारख्या पिकांचा मोहोर, व संत्रा लिंबू यांची फळे गळल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे. शेतकरी दुहेरी अडचणीत सापडल्याने सरकारने या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी अजित पवार यांनी केली.

संध्याकाळी म्हणणे मांडणार 

गेले तीन दिवस अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी सरकारला घेरल्याचे चित्र सभागृहात पाहायला मिळाले. त्यानंतर, झालेल्या नुकसानीची संपूर्ण आकडेवारी घेऊन याबाबत संध्याकाळपर्यंत सरकारचे म्हणणे मांडेन, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.