सेनेचा दसरा मेळावा की निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग?

दसरा मेळाव्यात मागील दोन वर्षांत राज्यात आणि मुंबईत केलेल्या कोविड विषयक आणि विकासकामांसाठी महापालिकेने केलेल्या कामांचा आढावा घेत त्यांची चित्रफित दाखवण्यात आली.

79

शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा शुक्रवारी षण्मुखानंद हॉलमध्ये पार पाडला. परंतु हा मेळावा इतर मेळाव्याच्या तुलनेत थोडा वेगळा होता. एक म्हणजे शिवतीर्थावर होणारा हा मेळावा बंदिस्त हॉलमध्ये पार पडला, तर दुसरीकडे इतर कोणत्याही नेत्यांना भाषण करण्याची संधी न देता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच आपले विचार मांडले. परंतु या इतर नेत्यांच्या भाषणाच्या वेळेत राज्यातील आघाडी सरकार म्हणून आणि मुंबई महापलिकेने कोणती कोविड कामे, विकास कामे केली याची चित्रफित दाखवण्यात आली. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास कामाची ही चित्रफित दाखवून एकप्रकारे शिवसेनेने निवडणुकीचे रणशिंगच फुंकले.

कोविड काळातील कामांची माहिती दिली!

दसरा मेळाव्यात मागील दोन वर्षांत राज्यात आणि मुंबईत केलेल्या कोविड विषयक आणि विकास कामांसाठी केलेल्या कामांचा आढावा घेत त्यांची चित्रफित दाखवण्यात आली. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या संकल्पनेतून बनवलेल्या या चित्रफितीत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे शहर वाचवले गेल्याची बाब नमूद करत कोविड काळात बनवण्यात आलेले सहा जंबो कोविड सेंटर, कोविड सेंटर, ऑक्सिजन प्लांट, सेव्हनहिल्स रुग्णालयाची उभारणी, धारावी कोविडला रोखण्यात आलेले यश, जगभरात धारावी पॅटर्नची घेतलेली दखल, कोविड काळातील सुखरुप केलेल्या प्रसुती, डायलिसीसची सुविधा, लसीकरण मोहिमेला दिलेली गती, मोफत जेवणाची व्यवस्था करतानाच आता तिसऱ्या लाटेसाठी सज्ज असल्याचेही नमुद करण्यात आली.

(हेही वाचा : सफाई कामगारांच्या वसाहतींबाबत भाजपाने ‘हा’ केला गंभीर आरोप!)

शिक्षण विभागाची कामे सांगितली!

कोविड बरोबरच आरोग्याबाबत मुंबईकरांना निर्माण करण्यात येणाऱ्या सुविधांचाही उल्लेख केला आहे. ज्यामध्ये पूर्व उपनगरातील पंडित मदन मोहन मालवीय रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणीचे काम सुरु असून कुपर रुग्णालयात कॅथलॅब सुरु केल्याचेही म्हटले आहे. तसेच मधुमेही रुग्णांसाठी सुविधा तसेच २११ आरोग्य केंद्र कार्यान्वित करणे या कामांचाही उल्लेख केला आहे. शिक्षण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप, मुंबई पब्लिक स्कूलची उभारणी, महापालिका शाळांमध्ये केब्रीज बोर्डाचे शिक्षण, मुलांना कौशल्य विकास प्रशिक्षण, आत्मरक्षण प्रशिक्षण, ई-वाचनालये, संगीत अकादमी, मध्यान्ह भोजन आदींचाही उल्लेख केला आहे.

पायाभूत सोयीचा आढावा घेतला

मुंबईत पाण्याचे पुर्नचक्रीकरण, गुंदवली-भांडुप जलबोगदा आदी कामे अधोरेखित करत कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात यश येत असल्याचे दाखवण्यात आले. यामध्ये स्वच्छतागृहांची संख्या वाढली, देवनार डम्पिंग ग्राऊंडमध्ये सुगंधी द्रव्याची फवारणी, सफाई कामगारांना मोठी घरे देण्यासाठी हाती घेतलेली आश्रय योजना, घरोघरचा कचरा गोळा करून स्वच्छता राखण्याचा केला जाणारा प्रयत्न, रात्रीचा उचलला जाणारा कचरा, नरिमन पॉईंट ते दहिसर सागरी मार्ग, घाटकोपर-मानखुर्द जोड रस्ता, एलईडी सिग्नल, चौकांचे एलईडी कपस्टोन, लंडनच्या क्वीनच्या तोडीस तोड देणारे, अशी उपमा भायखळ्यातील राणीबागेला देत, मियावकीच्या माध्यमातून निर्माण केलेली छोटी जंगल, पेंग्वीनमुळे वाढलेले पर्यटक, कांदिवली, विक्रोळीत तयार होणारी तरण तलाव, अंधेरीत तयार झालेले फुटबॉल मैदान, दहिसर भावदेवीतील क्रीडांगण, आरेतील वाचवलेली ६०० एकर जागा, मुंबईतील वृक्षा रोप, वातावरणातील बदलासाठी केला जाणारा प्रयत्न, सागरी जैव विविधतेसाठी केला जाणार प्रयत्न, भांडुप-पांजरापोर सौरऊर्जा प्रकल्प, मुंबईकरांसाठी स्वयंचलित फायर इंजिन, ९० मीटर शिडी, रासायनिक आगीवर नियमंत्रण मिळवण्यासाठी हॅजमेंट वाहन, पाच केंद्रांमध्ये झालेली वाढ, बेस्टच्या ताफ्यातील इलेक्ट्रीक वाहने, ५०० चौरस फुटांच्या घरांना इतर कर वगळता प्रत्यक्ष करात माफी, बीडीडी चाळींचा विकास आदींचा समावेश करत बनवलेल्या या चित्रफितीमधून आम्ही अभिमानाने सांगतो, जे बोलतो, ते करून दाखवतो, असे सांगत आपली मुंबई आणि आपला महाराष्ट्र गतीने पुढे जात असल्याचा संदेश दिला. त्यामुळे एकूणच ही चित्रफित ही आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचाच भाग असून एकप्रकारे आगामी निवडणुकीच्या प्रचाराचेच रणशिंगच शिवसेनेने फुंकल्याची यावरून स्पष्ट होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.