‘मोदींनी अपमान केला तेव्हा विरोध करणाऱ्या संघटना कुठे होत्या’?

111

मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही, कंपाऊंडरकडून घेतो त्याला जास्त कळते असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर मार्ड संघटनेकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र संजय राऊत यांनी आपल्याकडून डॉक्टरांचा अपमान झाला नसल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लंडनमध्ये जाऊन डॉक्टरांचा अपमान केला तेव्हा विरोध करणाऱ्या संघटना कुठे होत्या? असा सवाल उपस्थित केला.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत 

मला कोणीतरी क्लिप पाठवली. नरेंद्र मोदींनी लंडनला जाऊन डॉक्टरांचा अपमान केला होता. आमच्याकडील डॉक्टर कसे व्यापारी आहेत आणि त्यांन रुग्णसेवेत रस नसून, औषधं विकण्यात आणि पैसै कमावण्यात कसा रस आहे आहे यासंबंधी हे विधान आहे. लंडन येथील डॉक्टरांनी त्यांचा निषेध केला होता, येथील नाही. त्यावेळी येथील संघटनांनी आक्षेप घेतला नाही अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे. तसेच जर कुणाचा गैरसमज झाला असेल तर तो दूर करावा. मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे. माफी मागण्याआधी मी काय बोललो ते समजून घ्या. मी अपमानच केलेला नाही. माझी भूमिका जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रश्नावर होती. बोलण्याच्या ओघात एक शब्द येतो आणि त्यावर अशा पद्धतीने राजकारण होत आहे. हे होऊ नये असे मला वाटते असे देखील राऊत यावेळी म्हणालेत.

डॉक्टर्सनी माझं कौतूक करायला हवं

कंपाऊंडर काही टाकाऊ नसतात. उलट माझं कौतुक केलं पाहिजे. डॉक्टरांनी आपला कंपाऊंडरही ताकदीचा निर्माण केला आहे हे कौतुकास्पद आहे. हे जगात कुठे नाही तर भारतातच आहे. कंपाऊंडरचा सन्मान केला म्हणून इतकं टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही असे देखील राऊत यावेळी म्हणालेत.

जागतिक आरोग्य संघटना राजकीय संघटना झाली

दरम्यान जागतिक आरोग्य संघटना आता राजकीय संघटना झाल्याची टीका देखील संजय राऊत यांनी केली आहे. तसेच करोना काळात डॉक्टर देवदूतासारखं काम करत आहेत असं सांगताना माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही असे देखील ते म्हणालेत. करोनाच्या काळात शिवसेनेच्या अनेक लोकांनी डॉक्टरांविरोधात आंदोलन केलं. तेव्हा त्यांची मी समजूत काढली. अनेकदा मी डॉक्टरांच्या बाजूने उभं राहिलो आहे. मार्डचे अनेक संप आणि मागण्यांबाबत मी भक्कमपणे बाजू मांडली आहे. काही विशिष्ट पक्षांची लोक डॉक्टरांना हाती घेऊन मोहीम चालवत आहेत. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झाला नाही. माझीही ती भावनाही नव्हती. अपमान आणि कोट्यांमधला फरक समजून घेतला पाहिजे असे राऊत यांनी स्पष्टीकरण दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.