शिवसेनेला पडला भवनांचा विसर!

मुंबईत डबेवाला भवन उभारण्यासाठी मागील चार वर्षांपासून स्थायी समितीच्या अधिकारात तरतूद केली जाते.

82

मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला आपल्याच आश्वासन आणि तरतूद केलेल्या कामांचा विसर पडलेला दिसत आहे. मुंबईत सध्या डबेवाला भवन उभारण्यास झालेल्या मुद्यावरून डबेवाल्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परंतु केवळ डबेवाला भवनच नाही, तर शिवसेनेला रोहिदास भवन आणि कोळी भवनाचाही विसर पडलेला आहे.

१० वर्षांपासून डबेवाला भवन रखडले!

मुंबईत डबेवाला भवन उभारण्यासाठी मागील चार वर्षांपासून स्थायी समितीच्या अधिकारात तरतूद केली जाते. महापालिकेच्या चालू अर्थसंकल्पात यासाठी २१ कोटी रुपयांची तरतूद केली होती. परंतु आजपर्यंत डबेवाला भवन उभारण्याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याने मुंबई डबेवाला संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली. डबेवाले स्वतःच निधी उभारुन डबेवाला भवन उभारतील, असा इशारा त्यांनी दिला. तरीही मागील दहा वर्षांपासून भवनांची केवळ चर्चाच असून प्रत्येक अर्थसंकल्पात ठोक तरतूद करून शिवसेना पक्ष ठराविक समाजाची दिशाभूल करताना दिसत आहे.

(हेही वाचा : देशाच्या हितासाठी हिंदू संघटित आणि बलसंपन्न होणे आवश्यक!)

रोहिदास भवन, आगरी भवनाचा विषयच नाही!

यापूर्वी धारावीत संत रोहिदास भवन बांधण्याची घोषणा झाली होती. परंतु धारावीत आजगायत रोहिदास भवन उभारले गेले नाही. धारावीतील काँग्रेस नगरसेविका गंगा माने यांच्या प्रभागात हे भवन बांधले जाणार होते. परंतु हे भवन उभारण्यास शिवसेनेचे महापालिकेतील नेते तसेच खासदार राहुल शेवाळे यांचे प्रयत्न तोकडे पडताना दिसत आहेत. प्रभादेवीमध्ये केतकी मैदान राजाभाई देसाई मार्गावर आगरी भवन उभारण्यात आले असले तरी दहिसरमधील प्रभाग क्रमांक ७ मध्ये कोळी भवन उभारण्यास अद्यापही यश आलेले नाही. यासाठी २५ लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. तत्कालिन पालकमंत्री विनोद तावडे यांनीही यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु नव्या विकास आराखड्यातील आरक्षण बदलामुळे या भवनाचे काम होवू शकले नाही. मात्र, महापालिकेत व राज्यात सत्ता असूनही शिवसेनेला या आगरी व कोळी भवनाच्या बांधकामाचे आरक्षण बदल करता आलेले नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.