शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावरील सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) सुनावणी आता येत्या ३० जुलैला होणार आहे. या सुनावणीपूर्वी न्यायालयाने शिवसेना उबाठाला अतिशय कडक शब्दांत फटकारले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने उबाठा गटाच्या नेत्यांद्वारे सार्वजनिक माध्यमांमध्ये केल्या जाणाऱ्या वक्तव्यांवर तीव्र आक्षेप नोंदवला. “सर्वप्रथम तुमच्या लोकांना माध्यमांसमोर जाऊन ‘न्यायालय निर्णय घेत नाही’ अशी बेजबाबदार विधाने करण्यापासून रोखा,” अशा कडक शब्दांत सरन्यायाधीशांनी शिवसेना उबाठा गटाच्या वकिलांना सुनावले. (Supreme Court)
(हेही वाचा – Amravati Reels Trend : अमरावतीत ‘रिल्स’चा नवा व्यावसायिक ट्रेंड; तरुणांना मिळतोय रोजगार )
न्यायालयात घाई आणि बाहेर विधाने खपवून घेणार नाही
शिवसेना उबाठाचे ज्येष्ठ विधीज्ञ देवदत्त कामत यांनी हे प्रकरण गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असल्याचे सांगत न्यायालयाकडे तातडीने वेळ देण्याची आणि संपूर्ण सुनावणी घेण्याची विनंती केली होती. यावर संताप व्यक्त करत न्यायालयाने सांगितले की, एकीकडे तुमचेच वकील न्यायालयात मुदतवाढ किंवा तारखा मागतात आणि दुसरीकडे तुमचे नेते बाहेर जाऊन न्यायालयावर विलंबाचे आरोप करतात, हे वर्तन अजिबात सहन केले जाणार नाही. “आम्ही दररोज सायंकाळी चार वाजेपर्यंत इथे बसून काम करतो, आम्ही रिकामे बसलेलो नाही,” अशा शब्दांत न्यायालयाने आपली नाराजी व्यक्त केली.
(हेही वाचा – Solapur : खड्डेमय रस्त्यांमुळे एसटी बसच्या प्रवासात मोठा अडथळा; प्रवाशांचा प्रवास धोकादायक)
३० जुलै रोजी होणार प्रकरणाची अंतिम सुनावणी
या सुनावणीदरम्यान शिवसेना पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनीही न्यायालयाच्या भूमिकेला पाठिंबा दिला. कोणत्याही पक्षकाराला न्यायालयाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करण्याचा किंवा अशी बेजबाबदार वक्तव्ये करण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी नमूद केले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणातील सर्व प्रलंबित याचिकांवर सविस्तर विचार करण्यासाठी ३० जुलै ही तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या मोठ्या राजकीय संघर्षाचा अंतिम निर्णय आता जुलै महिन्याच्या शेवटी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

