Devendra Fadanvis : पोटदुखी कमी करण्यासाठी म्हणून ‘डॉ. शिंदें’ना आणले; फडणवीसांनी विरोधकांना हाणला टोला   

98

नाशिकमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. चांगले काम केले तरी काहींना पोटदुखी झाल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. पोटदुखीवर उपाय म्हणून डॉ. शिंदेंना आणले असल्याचे फडणवीस म्हणाले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घरात बसणाऱ्यांना जनता घरी बसवेल, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

फडणवीस हे निष्कलंकित असून विरोधकांची वज्रमूठ नव्हे वज्रछूट झाली आहे, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्थमंत्री म्हणून उत्तर महाराष्ट्राला मदत करण्याचे  आश्वासन दिले आहे. नैतिक जबाबदारी घेऊन सरकारमध्ये सहभागी झाल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. तसेच आता सरकार डबल इंजिन नसून तीन इंजिनवाले झाल्याचे अजित पवारांनी म्हणाले.

एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

‘घरी जे बसतात, घरून जे काम करतात, त्यांच्याबद्दल मी काही बोलू इच्छित नाही. शरद पवारांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहून टाकले आहे, त्यामुळे घरी बसणाऱ्यांना जनता घरी बसवून टाकते आणि लोकांमधल्या कार्यकर्त्यांना लोकांमध्ये येण्याची संधी देते. फडणवीस यांच्यावर कलंक लावण्याचं काम काही जण करतात, पण राजकारणातला आणि आमच्या युतीमधला कलंक नाही तर निष्कलंक माणूस म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव अभिमानाने घेतलं पाहिजे, पण मनाचा तेवढा मोठेपणा असावा लागतो, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

(हेही वाचा नाशिकमध्ये अजित पवार यांचं शक्तिप्रदर्शन)

देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा

‘लोकांना लाभ मिळतो म्हणून ते येतात. लोक स्वत: येऊन लाभ घेऊन जातात, तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय आहे? पण आता चिंता करू नका. कोणाच्याही पोटात दुखलं तर त्या पोटदुखीवर औषध देण्याकरता आम्ही डॉक्टर एकनाथ शिंदे आणले आहेत. त्यांच्या पचनी पडलं नाही तरी अजित पवार आहेत, त्यामुळे सगळ्यांची पोटदुखी आहे त्याच्यावरचा उपचार आपण करणार आहोत आणि सामान्य माणसाला त्याचे अधिकारही आपण देणार आहोत’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अजित पवारांचं निधीचं आश्वासन

‘कुठेही जातीपातीचं नात्यागोत्याचं राजकारण न करता कुठल्याही समाजाला, घटकाला वंचित न ठेवता आम्ही सगळे काम करत राहू. राज्याच्या प्रत्येक भागाचा समतोल विकास करण्याकरता मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री कटिबद्ध आहोत. अर्थमंत्री म्हणून कोणत्याही जिल्ह्याला निधी कमी पडू देणार नाही’, असं आश्वासन अजित पवार यांनी या कार्यक्रमातून दिलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.