“भाकरी ही फिरवावी लागते, नाही तर ती करपते!” शरद पवारांकडून पक्ष संघटनेत बदलाचे संकेत

136
शरद पवार

भाकरी ही फिरवावी लागते. ती जर फिरवली नाही तर ती करपते. त्यामुळे भाकरी फिरवायची वेळ आता आली आहे. माझा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडे पाहण्याचा दृष्टीकोन असा आहे की, यातून दृष्टी असलेल्या कार्यकर्त्यांची फळी आपल्याला महाराष्ट्रात तयार करायची आहे. ही फळी आपण तयार केली, तर महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची ताकद आजच्या तरुणांमध्ये आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. मुंबईत बुधवारी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित युवा मंथन कार्यक्रमात ते बोलत होते. या माध्यमातून लवकरच पक्ष संघटनेत बदलाचे संकेत त्यांनी दिले आहेत.

( हेही वाचा : Apple पाठोपाठ ‘ही’ कंपनीसुद्धा भारतात स्टोअर्स सुरू करण्याच्या तयारीत)

नव्या पिढीला प्रोत्साहित करणार

शरद पवार पुढे म्हणाले, मुंबई शहरात कार्यकर्त्यांची कमतरता नाही. मुंबई ही कार्यकर्त्यांची खाण आहे. मुंबई बदलत आहे पण इथले सामान्य कुटुंब टिकले पाहिजे. गिरणी कामगारांची मुंबई आपण पाहिली आहे. तेव्हा कष्टकरी हा मोठा वर्ग होता. आज तो कष्टकरी दिसत नाही. याठिकाणी असलेल्या गिरण्या गेलेल्या दिसतात. तिथे मोठमोठ्या इमारती दिसतात. तसेच गिरणीत काम करणारा कष्टकरी कुठे आहे ते माहित नाही. या कष्टकरी वर्गाचा शोध घ्यावा लागेल. घाम गाळण्याची संधी त्याला देण्यासाठी चित्र तयार करावे लागेल. तो बदल करण्यासाठी धोरणात बदल करावे लागतील. यासाठी पक्षातर्फे निर्णय घ्यावे लागतील. या प्रक्रियेत नव्या पिढीला प्रोत्साहित करून संधी देऊ. नवीन नेतृत्व तयार करून राज्याचा चेहरा बदलण्यासाठी आमचा युवक पुढे येतोय, असा इतिहास निर्माण करू, असे पवार म्हणाले.

महापालिका निवडणुकीमध्ये युवकांना संधी मिळणार – शरद पवार

पक्ष संघटनेत काम करणाऱ्या युवकांची कशी वर्गवारी करायची ते ठरवा. वरच्या टप्प्यात कोणा-कोणाला आणायचे त्याचा विचार करा. जे अधिक काम करतील, त्यांना उद्या होणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये संघटनेच्या वतीने निवडणूक लढवण्याची संधी दिली जाईल. त्यामधून एक नवीन नेतृत्व तयार केले जाईल. त्यामुळे आता विलंब करून चालणार नाही, भाकरी फिरवायची वेळ आली आहे. ते काम पक्षामध्ये करायचा आग्रह संघटनेतील वरिष्ठ नेत्यांकडे करणार असल्याचे पवारांनी सांगितले.

हेही पहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.