संजय राऊतांवरचा हक्कभंग प्रस्ताव राज्यसभेकडे पाठवणार? हालचालींना वेग

78

विधिमंडळाला ‘चोरमंडळ’ म्हटल्यामुळे खासदार संजय राऊत यांच्यावर दाखल करण्यात आलेला हक्कभंग प्रस्ताव राज्यसभा विशेषाधिकार समितीकडे पाठविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शनिवारी २५ मार्चला विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने शनिवारी सायंकाळपर्यंत राऊतांचे प्रकरण राज्यसभेकडे पाठवले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

विधिमंडळाला ‘चोरमंडळ’ म्हटल्यामुळे राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. विधानसभा सचिवांनी १ मार्चला नोटीस जारी करत त्यांना ४८ तासांची मुदत दिली होती. ही मुदत उलटून जवळपास पाच दिवस लोटल्यानंतर राऊत यांनी विधिमंडळ सचिवांना पत्र लिहीत आणखी आठ दिवसांची मुदतवाढ मागितली. मात्र अद्यापही राऊतांनी हक्कभंग नोटिशीवर लेखी खुलासा पाठविलेला नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी हे प्रकरण विशेष अधिकार समितीकडे वर्ग केले.

परंतु, राऊत हे राज्यसभा सदस्य असल्यामुळे विधिमंडळाद्वारे त्यांच्यावर कारवाई करण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे या प्रकरणात सत्ताधाऱ्यांनी केंद्राची मदत घेण्याची रणनीती आखल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानुसार, शनिवारी २५ मार्चला विधानसभा विशेषाधिकार समिती संबंधित प्रकरण राज्यसभेच्या विशेष अधिकार समितीकडे पाठवणार आहे. त्यानंतर राऊतांना पुन्हा म्हणणे मांडायला वेळ द्यायचा की नाही, हे राज्यसभा समिती ठरवणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा – राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकशाहीला धक्का देणारा; अजित पवारांची प्रतिक्रिया)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.